तेलंगणातील कंपनी सील, मालकाला ठोकल्या बेड्या
Chhatrapati Sambhajinagar hazardous chemical racket छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात घातक रसायन उघड्यावर टाकल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. या रॅकेटचे धागेदोरे थेट तेलंगणा राज्यात असल्याचे समोर आले. संभाजीनगर पोलिसांच्या कारवाईची दखल घेऊन तेलंगणा प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांगारेड्डी जिल्ह्यातील मुनीपल्ली येथील ‘व्हीबीआर ग्रीन एन्व्हायर्नमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीला थेट ‘क्लोजर ऑर्डर’ (कामकाज बंद करण्याचे आदेश) जारी केल असून टाळे ठोकले आहे. कंपनीचा वीजपुरवठा खंडित करून कामकाज तत्काळ थांबवण्यात आले, हे विशेष.
जिल्ह्यातील पळशी, सिल्लोड शहर, फर्दापूर, आळंद, शिवूर आणि तोंडापूर या भागात जून २०२६ मध्ये घातक रसायनांनी भरलेले ड्रम आढळून आले होते. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी तपास सुरू केला. वाहनांची ये-जा, आरोपींचे मोबाइल लोकेशन आणि आर्थिक व्यवहारांची साखळी, रासायनिक ड्रमवरील माहिती आणि उपलब्ध वैज्ञानिक पुरावे यांची सांगड घालून पोलिसांचे एक पथक थेट तेलंगणातील मुनीपल्ली येथे गेले. तिथे व्हीबीआर ग्रीन एन्व्हायर्नमेंट कंपनीत तेच ड्रम आणि बॅच क्रमांक आढळले. पोलिसांनी तत्काळ कंपनीचे मालक वीरेशम भीमैया खरचेला याला बेड्या ठोकल्या.
८० लाखांचा मुद्देमाल जप्त
या कारवाईत पोलिसांनी आतापर्यंत १३ आरोपींना अटक केली आहे. तसेच १,६०१ ड्रममधील तब्बल ३ लाख ५२ हजार लिटर घातक रसायन, ४० टन रासायनिक पावडर, ५० टन रसायनमिश्रित दूषित माती, ३ ट्रक, १ हायड्रा मशीन असा एकूण ८०.३५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तेलंगणा प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
ग्रामीण पोलिसांनी गोळा केलेले सर्व भक्कम पुरावे तेलंगणा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच, याबाबत कारवाईसाठी पत्र दिले. मंडळाने कंपनीची पाहणी केली असता, तिथे उघड्यावर कचरा आणि रासायनिक सांडपाणी (लीचेट) पसरलेले आढळले. पर्यावरणीय नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्याने मंडळाने थेट कंपनीचे कामकाज बंद करण्याचे आदेश दिले. एका राज्याच्या पोलिसांनी केलेल्या तपासावर दुसऱ्या राज्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेली ही मोठी कारवाई ठरली आहे.
पर्यावरणासाठी कारवाई आवश्यक
परराज्यातून घातक रासायनिक साहित्य आणून आपल्या जिल्ह्यात संधी मिळेल तेथे फेकायचे आणि निघून जायचे, असे प्रकार अनेक दिवसांपासून सुरु आहेत. वाळूज भागात त्याला मसिआने प्रचंड विरोध केला होता. पोलिसांची ही कारवाई अत्यंत योग्य असून, अशा विघातक कंपन्यांवर यापुढेही कठोर नजर ठेवणे गरजेचे आहे.
- अर्जुन गायकवाड, उद्योजक तथा अध्यक्ष, मसिआ
अजिंठा डोंगराकडे डम्पिंग लॅण्ड म्हणून बघण्याचा हा प्रयत्न होता
पर्यावरणावर कोसळलेले हे मोठे संकट होते. सुमारे पाच लाख लोकसंख्येला याचा तडाखा बसला असता आणि वन्यजीवनही धोक्यात आले असते. पोलीस प्रशासनाने अत्यंत चोख व अभिनंदननीय कार्यवाही याप्रकरणी केली आहे. अत्यंत घातक बाब म्हणजे अजिंठा डोंगराकडे डम्पिंग लॅण्ड म्हणून बघण्याचा हा प्रयत्न होता, तो प्रशासनाच्या सजगतेमुळे हाणून पाडला गेला याचे पर्यावरणप्रेमी म्हणून कौतुक वाटते.
- डॉ.संतोष पाटील, पर्यावरणवादी तथा तक्रारदार
Read About : RO Water & Vitamin B12 : आरओचे पाणी पिणाऱ्यांमध्ये B12 कमतरतेचा धोका?
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.