दिल्लीत नार्को-टेरर नेटवर्क उघडकीस

उल्फा-आय शी संबंध असल्याच्या संशयावरून औषध पुरवठादाराला अटक

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचने आसाम पोलिसांसोबत संयुक्त कारवाई करत अमली पदार्थांच्या तस्करीत सहभागी असलेल्या २७ वर्षीय अपूर्व ठाकूर या तरुणाला दिल्लीतील नरेला परिसरातून ताब्यात घेतले आहे. बंदी घातलेल्या उल्फा-आय या फुटीरतावादी संघटनेशी संशयित संबंध असलेल्या एका आंतरराज्यीय नेटवर्कला तो सायकोट्रॉपिक गोळ्यांचा पुरवठा करत असल्याचा आरोप आहे.

१७ जुलैला आसाम पोलिसांना चराईदेव जिल्ह्यातील धोधर अली रोडवर एका कारमधून साबणाच्या डब्यांमध्ये लपवलेले ४६.११ ग्रॅम हेरॉईन सापडले होते. याप्रकरणी मनोज गोगोई आणि त्यानंतर भास्कर गोगोई यांना अटक करण्यात आली होती. भास्कर गोगोई याच्या मोबाईलची तपासणी केली असता, इंटरनेट व्हॉईस कॉलद्वारे उल्फा-आय या बंदी घातलेल्या संघटनेच्या मृदुतपवन दाहुतिया या संशयित कॅडरशी त्याचे संभाषण झाल्याचे उघड झाले. या तपासात दिल्लीतून आसाममध्ये अमली गोळ्यांचा पुरवठा केला जात असल्याचे निष्पन्न झाले, ज्याचा मुख्य स्रोत अपूर्व ठाकूर हा होता.

अपूर्व ठाकूर याच्या मोबाईल व डिजिटल उपकरणांमधून २०२५ पासूनचे मृदुतपवन दाहुतियासोबतचे संभाषण आणि औषधांच्या खरेदी-विक्रीची पावती जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपूर्व ठाकूर आणि मुख्य संशयित आरोपीच्या पत्नीमध्ये (बॉबी गोगोई) लाखांचे ऑनलाईन आर्थिक व्यवहार झाले असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे. अपूर्व ठाकूर २०१६ मध्ये दिल्लीत आला होता.

२०२२ मध्ये त्याने मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करण्यास सुरुवात केली आणि नंतर कमिशनवर औषधांचा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला होता. दिल्ली न्यायालयाने आरोपीला आसाम पोलिसांच्या स्वाधीन करत ४ दिवसांची ट्रान्सिट रिमांड मंजूर केली आहे. अमली पदार्थांच्या तस्करीतून मिळणारा पैसा दहशतवादी किंवा बेकायदेशीर कृत्यांसाठी वापरला जात होता का, म्हणजेच यामागे ‘नार्को-टेरर’ अँगल आहे का, याचा शोध सध्या तपास यंत्रणा घेत आहेत.