नेपाळमधील मालकाची वाट पाहणाऱ्या श्वानाची मन हेलावणारी गोष्ट !
काठमांडू : नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापूर आणि भूस्खलनाने हाहाकार माजवला असून, हजारो कुटुंबे बेघर झाली आहेत. या भीषण आपत्तीमध्ये केवळ मानवी जिवितहानीच झाली नाही, तर मूक जनावरांच्या दु:खाची आणि असीम निष्ठेची काळीज पिळवटून टाकणारी चित्रे समोर येत आहेत. त्रिशुली बाजार भागातील एका काळी-पांढरी छटा असलेल्या श्वानाची गोष्ट सध्या संपूर्ण जगात चर्चेचा आणि अस्वस्थतेचा विषय बनली आहे.
त्रिशुली बाजार येथील पुराच्या तडाख्यात लागोपाठ चार घरे वाहून गेली. जिथे कधी राहते घर होते, तिथे आज फक्त गाळ आणि दगड उरले आहेत. मात्र, गळ्यात पट्टा असलेला हा श्वान आपले घर उद्ध्वस्त झाले तरी ती जागा सोडायला तयार नाही.
बचाव पथके, जेसीबी आणि अवजड यंत्रसामग्री मलबे हटवण्याचे काम करत असताना मोठ्या आवाजानेही तो तिथून हलत नाही. तो आपल्या घराच्या उंबरठ्याच्या मर्यादेबाहेर जाण्यास ठाम नकार देत आहे.
मदत कर्मचाऱ्यांनी त्याला बिस्किटे आणि खाद्यपदार्थ देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. स्थानिक लोकांनी सांगितले की, त्याचे मालक कुठे गेले हे त्याला समजत नाहीये, तो फक्त ते परत येईपर्यंत वाट पाहत आहे.
हजारो नागरिक अद्याप बेपत्ता
महापुरामुळे अनेक रस्ते, पूल आणि जलविद्युत प्रकल्प उद्ध्वस्त झाले आहेत, ज्यामुळे शोध आणि बचाव कार्यात मोठा अडथळा येत आहे. ढिगाऱ्याखाली दाबल्या गेलेल्या आणि वाहून गेलेल्या नागरिकांचा शोध घेणे बचाव दलांसाठी जीवघेणे ठरत आहे. पूर ओसरल्यानंतरही चिखल, खचलेल्या टेकड्या आणि तुटलेले अवशेष यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये मृत्यूचे भय कायम आहे.
