Ad Advertisement Ad Advertisement

Alzheimer Research : अल्झायमरवरील 99 टक्के औषधांच्या मानवी चाचण्या निष्फळ

उंदरांवर यशस्वी ठरणारी औषधे माणसांवर अपयशी; मानवी मेंदूची गुंतागुंत आणि जनुकांचे जाळे उपचार संशोधनासमोरील मोठे आव्हान

नवी दिल्ली : Alzheimer Research स्मरणशक्तीचा नाश करणाऱ्या अल्झायमर गंभीर आजारावर जागतिक पातळीवर सुरू असलेले कोट्यवधी डॉलर्सचे संशोधन एका मोठ्या पेचात अडकले आहे. प्रयोगशाळेत उंदरांवर शंभर टक्के यशस्वी ठरणारी औषधे प्रत्यक्ष माणसांवर मात्र सपशेल अपयशी ठरत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गेल्या वीस वर्षांतील आकडेवारीनुसार, अल्झायमरवरील तब्बल ९९ टक्के मानवी चाचण्या अपयशी ठरल्या आहेत. मानवी मेंदूची अथांग गुंतागुंत आणि प्रयोगशाळेतील प्राण्यांच्या शारीरिक मर्यादांमुळे हा उपचार शोधणे कठीण बनले आहे.

एकाच वेळी अनेक शत्रूंचा हल्ला

अल्झायमर हा केवळ एक स्वतंत्र आजार नसून, तो अनेक लक्षणांचा समूह म्हणजेच एक सिंड्रोम आहे, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या आजारात मानवी मेंदूमध्ये एकाच वेळी अनेक बिघाड होतात. त्यात प्रथिनांचे थर साचणे (प्लाक्स आणि टँगल्स), मेंदूतील पेशींना सूज येणे (दाह) आणि मुख्य चेतापेशी मृत होणे अशा प्रक्रिया एकाच वेळी सुरू असतात. केवळ मेंदूतील ब्लॉक किंवा प्रथिनांचे थर साफ केले म्हणजे रुग्ण बरा होईल असे होत नाही. कारण तोपर्यंत इतर घटकांमुळे मेंदूचे मोठे नुकसान झालेले असते.

कृत्रिम बायॉलॉजी विरुद्ध मानवी मेंदू

संशोधनासाठी शास्त्रज्ञ उंदीर, गांडूळ किंवा फळमाशांचा वापर करतात. उंदराच्या मेंदूत जनुकीय बदल करून शास्त्रज्ञ मानवासारखे प्रथिनांचे थर तयार करतात आणि त्यावर औषधांचा प्रयोग करतात. प्रयोगशाळेतील उंदराची स्मरणशक्ती या औषधांमुळे नक्कीच सुधारते परंतु माणसाचा मेंदू उंदरापेक्षा कैक पटीने जटिल आहे. माणसाच्या मेंदूत वयोमानानुसार जे हजारो सूक्ष्म बदल आणि उत्परिवर्तने होतात, त्याची नक्कल प्रयोगशाळेतील उंदराच्या शरीरात करणे अशक्य आहे.

जनुकांचे क्लिष्ट जाळे

अल्झायमरच्या आनुवंशिकतेचा अभ्यास करताना कोणत्याही एका जनुका वर बोट ठेवता येत नाही. या आजारासाठी सर्वात धोकादायक मानले जाणारे एपीओई४ हे जनुक शरीरात नसले, तरीही अनेक रुग्णांना अल्झायमर होतो. कारण, शेकडो लहान जनुके एकत्र येऊन माणसाच्या शरीरात हा धोका निर्माण करतात. एवढी मोठी आणि गुंतागुंतीची मानवी जनुकीय साखळी उंदराच्या लहान शरीरात उभी करणे विज्ञानाला अद्याप तरी शक्य झालेले नाही. गेल्या काही दशकांत या आजाराच्या उपचारांवर जगभरात प्रचंड पैसा आणि बुद्धिमत्ता खर्च झाली आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते, एखादी लस किंवा एकच गोळी शोधून अल्झायमर पूर्णपणे बरा होईल या विचारातच मोठी चूक आहे.

Read About : Sawan Barwal Asian Games 2026 : सावन बरवालच्या ऐतिहासिक रौप्याचे राष्ट्रपती मुर्मूंकडून कौतुक
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.