Paracetamol Liver Damage : योग्य मात्रेत घेतल्यास लाभ अन्यथा यकृताचे मोठे नुकसान
Paracetamol Liver Damage वॉशिंग्टन : ताप आला की पॅरासिटामॉल हे औषध ठरलेले. बालकांपासून ज्येष्ठापर्यंत सर्वांना ते दिले जाते. आयुष्यात एकदाही हे औषध न घेतलेला माणूस विरळाच. मात्र, त्याची डॉक्टरांनी ठरवून दिलेल्या मात्रेपेक्षा जास्त मात्रा झाली तर यकृताला हानी पोहोचू शकते, असा इशारा एका आघाडीच्या फार्मासिस्टने दिला आहे.
डोकेदुखीपासून तापापर्यंत अनेक आजारांसाठी हे औषध दररोज लाखो रुग्ण घेतात. योग्यरित्या घेतल्यास ते सुरक्षित आहे. मात्र, डॉक्टरांनी शिफारस केलेल्या मात्रेपेक्षा ते अधिक घेतल्यास यकृताचे कायमचे नुकसान होऊ शकते, असे किंग्स्टन विद्यापीठातील फार्मासिस्ट आणि संशोधन सहायक दिपर कामदार यांनी सांगितले. या औषधाची मात्रा थोडीही जास्त झाली किंवा दारूसोबत त्याचे सेवन केले तर तुमच्या यकृताची कधीही न भरून येणारी हानी होऊ शकते. तुम्हाला नियमितपणे वेदना कमी करण्याची पॅरासिटामॉलची आवश्यकता असल्यास डॉक्टरांनी शिफारस केलेल्या मात्रेतच त्याचे सेवन करा, असेही त्या म्हणाल्या.
नेमका धोका कसा उत्पन्न होतो?
यकृतात पॅरासिटामॉलवर होणाऱ्या प्रक्रियेतून धोका उत्पन्न होतो. यकृतात या औषधाचे विघटन होते तेव्हा एनएपीक्यूआय नावाचे विषारी उप-उत्पादन तयार होते. खरे तर शरीरातील ग्लूटाथिओन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संरक्षणात्मक पदार्थाद्वारे ते निष्क्रिय केले जाते. परंतु पॅरासिटामॉलचा जास्त डोस घेतला असल्यास ग्लूटाथिओन अपुरे पडते आणि एनएपीक्यूआय जमा होऊन यकृताच्या पेशींवर हल्ला करते. यामुळे यकृताची हानी होते. कधीकधी ही हानी एवढी जास्त असते की ते निकामीही होऊ शकते.
यकृताच्या आजारात वाढ
गेल्या दोन दशकांत यकृताचा आजार होण्याचे प्रमाण ४० टक्क्यांनी वाढले असून, या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूंतही चौपट वाढ झाली आहे. यकृतामध्ये जास्त चरबी जमा झाल्यामुळे अवयवाला सूज येऊ शकते. यकृत आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात अनेकदा कोणतीही लक्षणे नसतात. परंतु जसजसे तो पुढे सरकतो तसतसे विविध लक्षणे दिसू लागतात. यात थकवा, कावीळ, पोटदुखी, पाय आणि घोट्यांना सूज यांचा समावेश आहे. उपचार न केल्यास, शेवटच्या टप्प्यातील यकृत रोग होऊ शकतो, ज्याला ‘सिरोसिस’ असे म्हणतात. यकृत विषारी पदार्थ फिल्टर करण्यासह रक्त प्रवाह नियंत्रित करते. जेव्हा ते अयशस्वी होते तेव्हा गुंतागुंत निर्माण होते, ज्यामुळे मृत्यू होऊ शकतो.
Read About : Mobile Phone Radiation : उशीखाली मोबाईल ठेवून झोपणे घातक
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.