पती-पत्नीसह दोन वर्षांच्या चिमुकल्याचा समावेश; दौलताबाद हद्दीत भीषण अपघात
दौलताबाद : Samruddhi Expressway Accident समृद्धी महामार्गावर भरधाव कारने समोरील कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीसह त्यांच्या दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. ही दुर्घटना शुक्रवारी (दि. २६) दुपारी दौलताबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत चॅनल क्रमांक ४४९.५ जवळ घडली.
या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. मृतांमध्ये कारचालक प्रतीक रामकिसन जगदाळे (३२), पत्नी प्रिया प्रतीक जगदाळे (३१) आणि मुलगा रुद्रांश (२) यांचा समावेश आहे. तिघेही जालना येथील लालरेजानगर, पिंपळा बंगला येथील रहिवासी असून सध्या मुळशी, जिल्हा पुणे येथे राहत होते.
नियंत्रण सुटल्याने कंटेनरला धडक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीजे २१ वाय ३३६२ क्रमांकाचा कंटेनर सुरतहून सेलमच्या दिशेने जात होता. संगप्पा यमगर (३२) हा कंटेनर चालवत होता. त्याचवेळी एमएच १२ वायएस १०२८ क्रमांकाची कार नाशिकहून जालन्याकडे जात होती.
चॅनल क्रमांक ४४९.५ जवळ कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कार समोरून जाणाऱ्या कंटेनरला पाठीमागून वेगाने जाऊन धडकली. धडक इतकी भीषण होती की कारचे मोठे नुकसान झाले आणि त्यातील तिघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला.
महामार्ग सुरक्षा पथकाची तातडीने मदत
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग सुरक्षा पर्यवेक्षक कृष्णा बडे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पथकाने तातडीने बॅरिकेडिंग करून वाहतूक सुरळीत केली.
कारमध्ये अडकलेल्या मृतदेहांना क्यूआरव्ही पथकाच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. त्यानंतर मृतदेह घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले.
या घटनेची दौलताबाद पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, अंमलदार विठ्ठल खंडागळे पुढील तपास करीत आहेत.
Greater Noida Bus Fire : स्लीपर बसला अचानक आग कशी लागली? 9 प्रवाशांचा मृत्यू
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.