तृणमूल काँग्रेसच्या नाव-चिन्ह वादावर सुप्रीम कोर्टाचे निर्देश
नवी दिल्ली – TMC Symbol Row तृणमूल काँग्रेस पक्षाचे नाव आणि अधिकृत निवडणूक चिन्हावरून सुरू असलेल्या वादावर आज सुप्रीम कोर्टाने दोन्ही प्रतिस्पर्धी गटांना निवडणूक आयोगासमोर आपली बाजू मांडण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली आहे. तसेच, ही सुनावणी पूर्ण झाल्यानंतर पुढील ३ महिन्यांच्या आत या वादावर अंतिम निर्णय घेण्याचे निर्देश न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण आदेश दिला.
ममता बॅनर्जी यांची सर्वोच्च न्यायालयात धाव
केंद्रीय निवडणूक आयोगाने १७ सप्टेंबर रोजी आगामी पोटनिवडणुकांचा हवाला देत तृणमूल काँग्रेसची मूळ ओळख आणि चिन्ह निलंबित केले होते, तसेच दोन्ही गटांना वेगळी नावे व चिन्हे दिली होती. या निर्णयाविरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी १८ सप्टेंबर रोजी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.
पोटनिवडणुकांसाठी तात्पुरती व्यवस्था
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, आगामी नंदीग्राम आणि रेजिनगर पोटनिवडणुकीसाठी ममता बॅनर्जी यांच्या गटाला ‘ममता अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस’ हे नाव आणि ‘फुटबॉल खेळाडू’ हे चिन्ह देण्यात आले आहे. तर, अरूप रॉय आणि ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील दुसऱ्या प्रतिस्पर्धी गटाला ‘डेमोक्रेटिक तृणमूल काँग्रेस’ म्हणून मान्यता देत ‘लिफाफा’ हे चिन्ह आवंटित करण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, पक्षांतर्गत वाद तीव्र झाल्यामुळे ‘निवडणूक चिन्ह (आरक्षण आणि वाटप) आदेश, १९६८’ च्या पॅरा १५ अंतर्गत या प्रकरणाची सविस्तर सुनावणी घेणे आवश्यक आहे. कोर्टाच्या आजच्या आदेशामुळे आता दोन्ही गटांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महिनाभराचा वेळ मिळाला आहे.
Read About : UPI Payment New Rules : यूपीआयने पेट्रोल-डिझेल भरता? 15 ऑक्टोबरनंतर बदलू शकते पेमेंटची पद्धत
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.