Ad Advertisement Ad Advertisement

Agricultural Research Projects in Marathwada- शेतकऱ्यांच्या बांधावर उतरणार नवे तंत्रज्ञान; बदलणार मराठवाड्याची शेती

८५० लाखांच्या ११ प्रकल्पांतून वनामकृविची राष्ट्रीय झेप : डिजिटल शेती, नॅनो खत ते गोगलगाय नियंत्रणाचा शेतकऱ्यांना थेट फायदा

परभणी Agricultural Research Projects in Marathwada : शेतकऱ्यांच्या शेतात थेट उतरणारे तंत्रज्ञान, कमी खर्चात अधिक उत्पादन आणि शाश्वत शेती – याच ध्येयाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने राष्ट्रीय स्तरावर मोठी झेप घेतली आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर), विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डीएसटी), नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) व अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन (एएनआरएफ) यांच्या आर्थिक सहकार्यातून मंजूर झालेल्या ८५०.७३ लाख रुपयांच्या ११ महत्त्वपूर्ण संशोधन प्रकल्पांचा प्रारंभ गुरूवारी (दि.१९) उत्साहात पार पडला. या निमित्ताने संशोधक व विद्यार्थ्यांसाठी दोन विशेष व्याख्यानांचेही आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. इंद्र मणि होते. प्रमुख पाहुणे म्हणून एमसीएईआरचे महासंचालक राहुल रंजन महिवाल उपस्थित होते. यावेळी राहुल रंजन महिवाल यांनी हे ११ प्रकल्प म्हणजे केवळ निधीचे यश नाही, तर विद्यापीठावर देशाने दाखवलेल्या विश्वासाची पावती आहे. निधीचा योग्य वापर आणि त्यातून शेतकऱ्यांना होणारा प्रत्यक्ष लाभ हेच खरे यश असेल. सोयाबीन, कापूस, तूर या पिकांच्या सुधारित जातींवर विद्यापीठाचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.

तूर, मूग, स्वीट ज्वारी, सूर्यफूल या पिकांच्या संशोधनासाठी २०० लाख, कापूस उत्पादकता अभियानासाठी ५५.०१ लाख, तूर जातींसाठी ३३ लाख रुपये मिळाले. डिजिटल कृषी तंत्रज्ञान उत्कृष्टता केंद्रासाठी सर्वाधिक ४१८ लाख रुपये मंजूर झाले आहेत. शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या आफ्रिकन गोगलगायीच्या नियंत्रणासाठी ६३.८७ लाख, नॅनो खतांसाठी १४.३६ लाख, पीक हवामान दिनदर्शिका व स्वयंचलित सल्ल्यासाठी ३२.४९ लाख आणि रोगप्रतिकारशक्ती संशोधनासाठी ३४ लाख रुपये मिळाले आहेत. या कार्यक्रमप्रसंगी डॉ. एन. रघुराम यांनी पोषकद्रव्य प्रदूषण व शाश्वत व्यवस्थापनावर, तर डॉ. प्रकाश गंगाशेट्टी यांनी स्पीड ब्रीडिंग व प्रिसिजन फिनोटायपिंगवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, विस्तार संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्यासह शास्त्रज्ञ, अधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.

बायोमिक्स मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत पोहोचवणार

यावेळी पीएम-प्रणाममधून रासायनिक खतांचा वापर कमी करणार. बायोमिक्ससारखी जैविक उत्पादने आता मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत पोहोचवणार. आयसीएआर ‘अ’ श्रेणी आणि आयआयआरएफमध्ये महाराष्ट्रात प्रथम क्रमांक हीच आमची ताकद आहे. आता फक्त औपचारिकता नको, तर प्रामाणिक, नियोजनबद्ध काम हवे असल्याचे कुलगुरू डॉ. इंद्र मणि यांनी सांगितले.

बायोमिक्स म्हणजे काय ?

बायोमिक्स हे एक वनामकृवि विकसित केलेले उपयुक्त जैविकांचे मिश्रण असून ते निरनिराळ्या उपयुक्त बुरशी आणि जीवाणूंपासून वनस्पती रोगशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी द्वारा तयार केलेले आहे. यामध्ये चौदा विविध पिक आणि जमिनीस उपयुक्त सूक्ष्मजीव असून त्यांचे कार्य वेगवेगळे आहे. हे एकच जैविक मिश्रण किड व रोग नियंत्रणासाठी तसेच पिकास अन्नद्रव्याची उपलब्धता होण्यासाठी आणि एकूण उत्पादन व उत्पादनाचा दर्जा सुधारण्यासाठी फायदेशीर आहे.

बायोमिक्सची उपलब्धता आणि वापर

हे मिश्रण वनस्पती रोगशास्त्र विभाग, कृषि महाविद्यालय, परभणी व विद्यापीठाच्या काही संशोधन केंद्रांवर भुकटी व विद्राव्य स्वरुपात उपलब्ध आहे. या जैविक मिश्रणाच्या वापराने शेतकऱ्यांना अनेक पिकांच्या जमिनीतून उद्भवणाऱ्या रोगांवर तसेच अनेक प्रकारच्या किडींवर नियंत्रण मिळवता आले आहे. या जैविकाच्या वापराने रोगनियंत्रणासोबत किडनियंत्रण, अन्नद्रव्याची उपलब्धता इ. फायदे होऊन पिकांचे उत्पादन वाढत आहे. तसेच रोग व किडींच्या नियंत्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या कीटकनाशक, बुरशीनाशक इ. वर होणाऱ्या खर्चात बचत होत आहे.

Read About: Cyber Movie 2026 – नोकरीच्या शोधात गेले अन सायबर गुन्ह्यांच्या जाळ्यात अडकले

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.