९० किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत उझबेकिस्तानच्या खेळाडूकडून पराभव; प्रिया घनघसलाही कांस्यपदक
आयची-नागोया : Asian Games 2026 : आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय बॉक्सर कपिल पोखरिया याला पुरुषांच्या ९० किलो वजनी गटात कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. बुधवारी झालेल्या उपांत्य फेरीत उझबेकिस्तानच्या तुराबेक खबीबुल्लाएव्हने कपिलचा ४-१ असा पराभव केला. दुसरीकडे, भारताची अनुभवी बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेनने महिलांच्या ७५ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
कपिलचा उपांत्य फेरीत पराभव
कपिलविरुद्धच्या लढतीत उझबेकिस्तानच्या तुराबेकने सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. पहिल्या फेरीत त्याने ५-० अशी बाजी मारली. दुसऱ्या फेरीतही ४-१ असा निर्णय त्याच्या बाजूने लागला. अखेर पंचांच्या विभाजित निर्णयात तुराबेक विजयी ठरला आणि कपिलला कांस्यपदक मिळाले. तुराबेक हा सध्याचा जागतिक विजेता असून, २०२२ मधील हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेतही त्याने कांस्यपदक जिंकले होते.
प्रिया घनघसलाही कांस्यपदक
भारताची राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती बॉक्सर प्रिया घनघस हिला महिलांच्या ६० किलो वजनी गटात कांस्यपदक मिळाले. उपांत्य फेरीत चीनच्या यांग चेंग्यूने तिचा पराभव केला.
पहिल्या फेरीत दोन्ही खेळाडूंमध्ये चुरस पाहायला मिळाली. प्रिया प्रतिहल्ल्यांमधून गुण मिळवण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, पंचांनी ३-२ असा निर्णय यांगच्या बाजूने दिला. दुसऱ्या फेरीत यांगने ४-१ अशी आघाडी घेतली. अखेरच्या फेरीतही चीनच्या बॉक्सरने बचावात्मक खेळ करत आघाडी कायम ठेवली आणि ४-१ असा निर्णय मिळवला.
लोव्हलिना बोर्गोहेन अंतिम फेरीत
- भारतासाठी दिलासादायक कामगिरी करत लोव्हलिना बोर्गोहेनने महिलांच्या ७५ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत तिने कझाकिस्तानच्या नताल्या बोगदानोव्हाचा ३-२ असा पराभव केला.
- पहिल्या फेरीत बोगदानोव्हाने ३-२ असा निर्णय मिळवत आघाडी घेतली. मात्र, दुसऱ्या फेरीत लोव्हलिनाने आक्रमकता वाढवली आणि प्रभावी ठोसे लगावत ५-० असा निर्णय आपल्या बाजूने मिळवला. तिसऱ्या फेरीत कझाकिस्तानच्या खेळाडूने दबाव वाढवला; पण लोव्हलिनाने बचाव आणि प्रतिहल्ल्यांच्या जोरावर सामना जिंकला.
- अंतिम फेरीत लोव्हलिनासमोर सुवर्णपदकासाठी लढण्याची संधी असेल.
Read About : Asian Games 2026 – साहिल-जाधव, कुशल-गणेशची चीनवर मात; कंपाउंड तिरंदाजीत भारताला तिसरे सुवर्ण
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.