Ad Advertisement Ad Advertisement

John Haller khaki : भारतातील खाकी कपड्याचा जनक जॉन हॉलर

John Haller khaki : आज भारतीय पोलीस म्हटले की डोळ्यांसमोर उभा राहतो तो खाकी गणवेश. सैन्य, पोलीस, वनविभाग, टपाल खाते अशा अनेक सरकारी यंत्रणांच्या गणवेशात खाकीने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. मात्र, या साध्या दिसणाऱ्या रंगामागे दक्षिण भारताशी जोडलेला एक रंजक आणि अनेक पदरी इतिहास आहे. खाकीचा लष्करी वापर भारतात ब्रिटिश काळात सुरू झाला असला, तरी मंगलोरच्या बासेल मिशनच्या कापड उद्योगाने खाकी रंगाच्या टिकाऊ कापडाला दिलेली चालना पुढे अत्यंत महत्त्वाची ठरली.

१६ व्या शतकापासून विविध युरोपिय देशांतील ख्रिश्चन मिशनरी भारतात येत होते. पुढे १९ व्या शतकात ब्रिटन, अमेरिका, जर्मनी आणि इतर युरोपिय देशांतील मिशनऱ्यांनी भारतात आपले कार्य विस्तारले. त्यामध्ये स्वित्झर्लंडमधील बासेल मिशनचा दक्षिण भारतातील प्रभाव विशेष उल्लेखनीय ठरला. बासेल मिशनची स्थापना स्वित्झर्लंडमधील बासेल शहरात १८१५ साली झाली. या मिशनच्या कार्यात जर्मनांचा मोठा सहभाग असल्यामुळे भारतात त्याचा उल्लेख अनेकदा ‘जर्मन मिशन’ म्हणूनही केला जात असे.

मिशनचे पहिले तीन मिशनरी ३० ऑक्टोबर १८३४ रोजी मंगलोरला पोहोचले, असा उपलब्ध ऐतिहासिक संदर्भ सांगतो. पुढे मंगलोर हे बासेल मिशनच्या दक्षिण भारतातील प्रमुख केंद्रांपैकी एक बनले. मुलकी, उडुपी, धारवाड, हुबळी, कुर्ग, कारकल, होन्नावर आणि शिमोगा या भागात मिशनचे धर्मप्रसाराबरोबरच शिक्षण, मुद्रण, शेती, हस्तव्यवसाय आणि उद्योग यांनाही मिशनने प्रोत्साहन दिले. मंगलोर टाइल्स, मुद्रणालय, विणकाम, कापड उद्योग आणि विविध हस्तव्यवसाय यामुळे या प्रदेशाच्या आर्थिक-सामाजिक जीवनावर त्याचा ठसा उमटला.

बासेल मिशनने १८४४ च्या सुमारास मंगलोरमध्ये विणकाम उद्योग सुरू केला. मात्र, स्थानिक हातमागांना युरोपिय गिरण्यांशी स्पर्धा करणे कठीण जात होते, त्यामुळे कापडनिर्मितीत तांत्रिक सुधारणा करण्याची गरज निर्माण झाली. याच पार्श्वभूमीवर १८५१ मध्ये जॉन हॉलर नावाचा युरोपिय विणकर मंगलोरला आला. त्याने बालमट्टा येथील बासेल मिशनच्या विणकाम केंद्रात नवीन यंत्रे, हातमाग आणि रंगकामाची पद्धत विकसित करण्यास सुरुवात केली. उपलब्ध नोंदीनुसार त्याने २१ युरोपिय पद्धतीच्या हातमागांसह स्वतंत्र रंगकामाची व्यवस्था उभारली. पुढे या उद्योगाचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. तत्पूर्वी खाकीचा लष्करी वापर भारतात सुरू झाला होता. १८४६ मध्ये लेफ्टनंट हॅरी लम्सडेन यांनी पेशावर येथे Queen’s Own Corps of Guides ही तुकडी उभारली. त्यांच्या सैनिकांसाठी स्थानिक वातावरणात मिसळणारा, हालचालीस सोयीचा पोशाख वापरण्यात आला. पांढऱ्या कापडावर चिखलाचा वापर करून मातीसारखा रंग आणण्याची पद्धत वापरली गेली. या धुळकट-मातकट रंगासाठी ‘खाकी’ हा शब्द रूढ झाला. ब्रिटनच्या National Army Museu च्या नोंदीनुसार Corps of Guides हे खाकी गणवेश स्वीकारणारे पहिले लष्करी दल मानले जाते.

‘खाकी’ हा शब्द फारसीतील ‘खाक’ म्हणजे धूळ किंवा माती या शब्दापासून आलेला आहे, त्यामुळे खाकी म्हणजे धुळीचा किंवा मातीसारखा रंग, म्हणूनच जॉन हॉलरने खाकीचा शोध शून्यातून लावला असे म्हणणे ऐतिहासिकदृष्ट्या अचूक ठरणार नाही. मात्र, मंगलोरमध्ये स्थानिक घटकांपासून टिकाऊ खाकी रंग विकसित करून त्याचे कापड उत्पादन करण्याचे काम हॉलरने केले. दक्षिण कर्नाटकात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या स्थानिक वनस्पतीजन्य पदार्थांचा वापर हॉलरने रंग निर्मितीसाठी केला. काही ऐतिहासिक नोंदींमध्ये काजूच्या टरफलातील तेलाचा, तर काही ठिकाणी काजूवर्गीय झाडाच्या सालीचा उल्लेख आढळतो. या स्थानिक घटकांपासून तयार केलेला रंग कापडावर वापरला गेला. १८६० मध्ये प्रसिद्ध झालेल्या जर्मन Evangelical Mission च्या अहवालात हॉलरच्या खाकी रंगाला त्याच्या टिकाऊपणामुळे लष्करी वर्तुळात ओळख मिळाल्याचा उल्लेख असल्याचे संशोधनात आढळते.

खाकीच्या या प्रवासात ब्रिटिश सैन्याची गरज आणि भारतातील प्रयोग यांचा संगम झाला. वायव्य सरहद्दीवर खाकीचा वापर आधीच सुरू झाला होता. १८५७ च्या भारतीय उठावाच्या काळातही अनेक ब्रिटिश सैनिकांनी पांढरे पोशाख स्थानिक उपलब्ध रंगांनी रंगवून वापरले. नंतर ब्रिटिश सैन्याला आधुनिक युद्धातील बदल जाणवू लागले. रायफलची अचूकता वाढत होती, धूररहित दारूगोळ्याचा वापर सुरू झाला होता आणि युद्धभूमीवर सैनिकांची दृश्यमानता कमी ठेवणे महत्त्वाचे बनले होते. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात खाकीचा वापर ब्रिटिश सैन्यात अधिकाधिक वाढत गेला. अखेर १९०२ मध्ये ब्रिटिश सैन्यासाठी गणवेशासाठी खाकीचा वापर करण्यास सुरुवात झाली.

सैन्याप्रमाणेच पोलिसांच्या गणवेशातही खाकीचा वापर वाढत गेला. १८६१ च्या Police Act नंतर भारतीय पोलीस दलाची रचना आणि नियम अधिक औपचारिक झाले. या कायद्याच्या कलम १२ अंतर्गत पोलीस दलाच्या संघटनात्मक बाबी तसेच शस्त्रे, साहित्य आणि इतर आवश्यक बाबींविषयी नियम करण्याचा अधिकार पोलीस महासंचालकांना देण्यात आला. भारतातील सर्व पोलीस दलांनी एकाच वेळी खाकी स्वीकारली तरी बंगाल पोलिसांनी आपला पांढरा गणवेश कायम ठेवला.

स्वातंत्र्यानंतरही खाकीची परंपरा भारतीय पोलीस दलात कायम राहिली. महाराष्ट्रात मात्र मुंबई पोलिसांचा गणवेश दीर्घकाळ वेगळा होता. मुंबई पोलिसांच्या गडद निळ्या गणवेशाची स्वतंत्र ओळख होती. लोकप्रिय संस्कृतीतही या गणवेशाचे दर्शन घडले. पुढे १९८१ मध्ये महाराष्ट्रातील पोलिसांच्या गणवेशात बदल करण्यात आला आणि खाकी व फुल पँटचा वापर सर्वसाधारण करण्यात आला. त्यानंतर आज दिसणारा खाकी पोशाख महाराष्ट्र पोलिसांची ओळख बनला. पहिल्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश सैनिक खाकी गणवेशात रणांगणावर उतरले, त्यामुळे खाकी हा रंग आधुनिक सैनिकाचा प्रतीकात्मक पोशाख बनत गेला. ब्रिटिश सैन्याच्या अनुभवातून जगातील अनेक सैन्यांनी पुढे मातीसारख्या, कमी उठावदार रंगाचा स्वीकार केला.

मंगलोर आणि बासेल मिशनच्या या औद्योगिक वारशाची दखल भारतीय टपाल विभागानेही घेतली. ३० ऑक्टोबर २०२२ रोजी मंगलोर येथे खाकीचा शोध आणि मंगलोर खादी या विषयांवर विशेष टपाल तिकीट प्रसिद्ध करण्यात आले. बासेल मिशनचा इतिहास केवळ खाकी, मंगलोर टाइल्स किंवा कापड उद्योगापुरता मर्यादित नाही. या मिशनने दक्षिण भारतात धर्मप्रसाराबरोबर शिक्षण, मुद्रण, तांत्रिक प्रशिक्षण, उद्योग आणि रोजगारनिर्मितीच्या क्षेत्रातही काम केले. त्याचवेळी मिशनरी कार्यामुळे दक्षिण भारतातील धार्मिक-सामाजिक संरचनेवर झालेले परिणाम हा स्वतंत्र आणि गुंतागुंतीचा ऐतिहासिक विषय आहे. धर्मप्रसार, सामाजिक बदल, स्थानिक समाजाशी निर्माण झालेले संबंध आणि ख्रिस्ती समाजाचा विस्तार या सर्वांचा अभ्यास त्या काळाच्या व्यापक राजकीय आणि वसाहतवादी संदर्भात करणे आवश्यक आहे.

आज एखादा पोलीस अधिकारी खाकी गणवेशात रस्त्यावर उभा असतो, तेव्हा त्या रंगामागे केवळ ब्रिटिश सैन्याचा इतिहास नसतो. त्यात भारतातील १९ व्या शतकातील युद्धनीती, स्थानिक रंगनिर्मितीच्या पद्धती, पेशावरच्या सरहद्दीवरील लष्करी प्रयोग, मंगलोरमध्ये बासेल मिशनचा कापड उद्योग आणि जॉन हॉलरच्या खाकीच्या निर्मितीची एक कथा दडलेली आहे, म्हणूनच खाकीची कहाणी ‘एका जर्मन मिशनरीने शोधलेला रंग’ एवढी सरळ नाही. ती भारतात घडलेल्या अनेक प्रयोगांची, स्थानिक साधनसंपत्तीची आणि वसाहतवादी काळातील तंत्रज्ञानाच्या देवाणघेवाणीची कथा आहे.

सतीश कदम
संपर्क : ९४२२६५००४४

Read About : Tower of London : टॉवर ऑफ लंडन
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.