शस्त्रक्रिया आणि रेडिएशनशिवाय निदानाचा दावा; एआय व थर्मल सेन्सर्सवर आधारित वेअरेबल उपकरण अंतिम क्लिनिकल चाचणीच्या टप्प्यात
नवी दिल्ली : Breast Cancer Detection स्तनाचा कर्करोग शोधण्यासाठी सध्या शस्त्रक्रिया किंवा क्ष-किरण (एक्स-रे) चाचण्यांचा उपयोग करण्यात येतो. या दोन्ही पद्धतींच्या मर्यादा लक्षात घेता नव्या तंत्रज्ञानाचा शोध सुरू होता. लॉडर्स मार्क इंडस्ट्रीज लिमिटेडने (एलएमआयएल) स्तनाच्या कर्करोगाचा छडा लावणारे शरीरावर परिधान करण्यायोग्य उपकरण विकसित करून हा शोध पूर्णत्वास नेला आहे.
अत्यंत अचूक थर्मल सेन्सर्स आणि एआय आधारित तापमान मॅपिंगचा समावेश असलेले हे तंत्रज्ञान शस्त्रक्रिया किंवा रेडिएशनचा वापर न करता स्तनाच्या कर्करोगाशी संबंधित असामान्यतेचा छडा लावते. अचूकता आणि मानकांशी सुसंगता तपासण्यासाठी त्याच्या अनेक चाचण्या करण्यात आल्या आहेत. आता पेशींच्या पातळीवर कर्करोगाचा शोध घेण्यासाठी दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या पुढच्या वर्षी जानेवारीत सुरू होत असून, यात ९८ टक्के अचूकतेचे लक्ष ठेवण्यात आले आहे. या चाचण्या भारत, अमेरिका, युरोप आणि ब्रिटनमध्ये होणार आहेत. यासाठी एलएमआयएलने ‘सेंटर फॉर मटेरियल्स फॉर इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी’ (सी-एमईटी)चे सहकार्य घेतले आहे. या उपकरणाला मान्यता आणि ओळख मिळाल्यानंतर ते स्तन कर्करोग निदानाच्या क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणू शकते हे ओळखून वैद्यकीय उपकरण क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी या चाचण्यांत सहभागी होण्यात रस दाखवला आहे.
पहिल्या टप्प्यातील भारतातील चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. या चाचण्यांदरम्यान तंत्रज्ञानाच्या अचूकतेची खात्री पटली असून, एका समितीने आता कंपनीला अंतिम क्लिनिकल चाचण्या घेण्यास मंजूरी मिळाली आहे. या तंत्रज्ञानात स्तनाच्या कर्करोगाशी संबंधित असामान्यता सुरुवातीच्या टप्प्यावरच ओखळण्याची क्षमता असल्याचे या समितीचे मत आहे. तथापि, समितीचे हे मत अंतिम चाचण्यांच्या निष्कर्षाच्या अधीन आहे.
भारतासाठी उपयुक्त तंत्रज्ञान
हे तंत्रज्ञान प्रगत थर्मल सेन्सर्स आणि एआय आधारित विश्लेषणाचा वापर करून त्या भागातील तापमानात होणारे असामान्य बदल व त्यांचा पॅटर्न याच्याआधारे रोगाच्या उपस्थितीचा संकेत देते. हे उपकरण बॅटरीवर चालणारे असल्याने त्याचा वापर वीजपुरवठा मर्यादित असलेल्या किंवा वीज नसलेल्या भागातही करता येऊ शकतो. या वैशिष्ठ्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रे, दुर्गम गावे आणि आरोग्य सुविधांचा अभाव असलेल्या क्षेत्रांपर्यंत स्तनाच्या कर्करोग तपासणीची सुविधा पोहोचविता येणार आहे. त्यामुळे भारतासाठी हे तंत्रज्ञान खूप उपयुक्त ठरणार आहे. सध्या भारतात या तंत्रज्ञानाचे नियामक मुल्यांकन सुरू असून, यशस्वी अंतिम क्लिनिकल चाचणी आणि आवश्यक नियामक मंजूरीनंतर हे तंत्रज्ञान एप्रिल २०२७ पर्यंत बाजारात आणण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
- दरवर्षी ३० लाख रुग्णांची भर पडणार
- स्तनाचा कर्करोग हे जागतिक स्तरावर आरोग्यापुढील एक मोठे आव्हान राहिले आहे. २०२४ मध्ये जगभरात २४ लाख महिलांना या आजाराचे निदान झाले असून, ६ लाख ९४ हजार महिलांचा मृत्यू झाला आहे. इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरच्या अंदाजानुसार २०४० पर्यंत दरवर्षी ३० लाखांहून अधिक प्रकरणे आढळण्याची शक्यता आहे.
Read About : Vulture Parenting : पिल्लांच्या संगोपनासाठी विशेष काळजी घेणारा पक्षी
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.