अमेरिका आणि यूएईमध्ये आयफोनच्या किमती तुलनेने कमी; कर, आयात शुल्क आणि घटकांच्या आयातीमुळे भारतात फोन महाग
नवी दिल्ली : iPhone 18 Price Comparison ॲपलच्या नवीन आयफोनची क्रेझ जगभर असली, तरी सर्वात स्वस्त आणि सर्वोत्तम डील्स अजूनही अमेरिकेबाहेर मिळालेल्या नाहीत. काउंटरपॉईंट रिसर्च या मार्केट इंटेलिजन्स फर्मनुसार, नवीन आयफोन १८ प्रो आणि १८ प्रो मॅक्स च्या किमती अमेरिकेच्या तुलनेत जगातील इतर सर्व प्रमुख बाजारपेठांमध्ये जास्त असतील.
कोणत्या देशात काय परिस्थिती आहे?
अमेरिकेत सर्वात स्वस्त : नवीन आयफोन लॉन्चसाठी अमेरिका ही जगातील सर्वात स्वस्त बाजारपेठ आहे. येथे फोनवर अतिरिक्त आयात शुल्क नसल्याने किमती सर्वात कमी असतात.
युनायटेड अरब अमिराती दुसरे सर्वात स्वस्त ठिकाण : आयफोनसाठी दुबई/युएई ही जगातील दुसरी सर्वात स्वस्त बाजारपेठ आहे. येथे केवळ ५ टक्के व्हॅल्यू-डेड टॅक्स आहे आणि इतर कोणतेही कर नाहीत. यामुळे केवळ आयफोनच नाही, तर इतर ब्रँडचे फोनही येथे स्वस्त मिळतात.
तुर्कीत जगात सर्वात महाग फोन : स्थानिक करांमुळे तुर्कीमध्ये नवीन आयफोन मॉडेलच्या किमती जगात सर्वाधिक आहेत. येथे आयफोन खरेदी करण्यासाठी अमेरिकेच्या तुलनेत जवळपास दुप्पट किंमत मोजावी लागते.
भारतात ३० ते ४० टक्के महाग : भारत ही ॲपलसाठी जगातील चौथी सर्वात मोठी बाजारपेठ आणि उत्पादनाचे दुसरे सर्वात मोठे केंद्र आहे. तरीही भारतात आयफोनच्या किमती अमेरिकेपेक्षा ३० ते ४० टक्के ते जास्त आहेत.
भारतात आयफोन महाग असण्याची कारणे
१. आयात शुल्क आणि जीएसटी : ॲपलने चीनवरील आपले अवलंबित्व कमी करण्यासाठी भारतात उत्पादन वाढवले आहे. सध्या जगातील एकूण उत्पादनापैकी २५ टक्के आयफोन भारतात बनतात. मात्र, नवीन फोल्डेबल मॉडेल डीयुओ सध्या भारतात बनवले जात नाही. परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या या मॉडेल्सवर पूर्ण आयात शुल्क, जीएसटी आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचा फटका बसतो, ज्यामुळे किमती वाढतात.
२. घटकांची आयात : भारतात बनणारे आयफोन हे प्रामुख्याने फक्त असेंबल (एकत्रित) केले जातात. एकूण इलेक्ट्रॉनिक सुट्या भागांपैकी केवळ १८ ते २० टक्के भाग भारतात तयार होतात, तर उर्वरित सर्व भाग परदेशातून मागवावे लागतात, ज्यावर मोठा कर लागतो. प्रो मॉडेल्ससाठी ही आयात आणखी जास्त आहे.
३. जुन्या मॉडेल्सच्या किमतीत वाढ : चिप्सच्या तुटवड्यामुळे जूनमध्ये ॲपलने जुन्या मॉडेल्सच्या किमती वाढवल्या होत्या. ९ सप्टेंबरच्या लॉन्च इव्हेंटनंतर, जुन्या मॉडेल्सच्या किमती अमेरिकेत २१ टक्क्यांनी, तर भारतात थेट ४१ टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत.
चीन आणि कोरियामध्ये किमती कमी का?
चीन आणि दक्षिण कोरियामध्ये करांचे दर वेगळे असण्यासोबतच तेथील स्थानिक बाजारपेठेतील तीव्र स्पर्धा कारणीभूत आहे. चीन आणि कोरियामधील बलाढ्य कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी ॲपलला तिथे किमती नियंत्रणात ठेवाव्या लागतात.
Read About : Whatsapp new rules – 1 ऑक्टोबरपासून व्यावसायिक मेसेजसाठी मोजावे लागणार शुल्क
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.