‘लोबेरामिसल’ औषधाच्या क्लिनिकल चाचणीत आशादायक निष्कर्ष; स्ट्रोकनंतर उपचाराची प्रभावी वेळ ४८ तासांपर्यंत वाढवण्याचा दावा
बीजिंग : Stroke Treatment Breakthrough स्ट्रोकच्या (मस्तिष्काघात) उपचाराबाबत वैद्यकीय क्षेत्रातून एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. स्ट्रोकमुळे मेंदूच्या होणाऱ्या गंभीर हानीवर मात करण्यासाठी आतापर्यंत असलेला अवघ्या काही तासांचा कालावधी चिनी वैज्ञानिकांनी दोन दिवसांपर्यंत (४८ तास) वाढवून दाखवला आहे. त्यामुळे स्ट्रोकनंतरचा अपंगत्वाचा धोका टळून रुग्ण पूर्णपणे बरे होण्याची शक्यता प्रचंड वाढली आहे.
जेव्हा रक्ताची गुठळी एखाद्या रक्तवाहिनीला (धमनीला) अवरोधित करते, तेव्हा मेंदूच्या पेशी काही मिनिटांतच मृत होऊ लागतात. यामुळे चेहऱ्याचा काही भाग लटकणे, बोलण्यात अडचण येणे आणि गंभीर प्रकरणांमध्ये अर्धांगवायू किंवा मृत्यू ओढवणे यांसारखी आरोग्याची आणीबाणी निर्माण होऊ शकते. अशा स्थितीत गुठळी विरघळवणारी औषधे किंवा शस्त्रक्रिया यांसारखे तातडीचे उपचार जास्तीत जास्त सहा तासांच्या आत देणे आवश्यक असते. मात्र, चीनी शास्त्रज्ञांनी शोधलेल्या औषधामुळे या उपचारांचा कालावधी ४८ तासांपर्यंत वाढणार आहे.
‘जर्नल ऑफ द अमेरिकन मेडिकल असोसिएशन’मध्ये १० सप्टेंबर रोजी प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, ‘लोबेरामिसल’ या औषधाच्या क्लिनिकल चाचणीतून असे दिसून आले आहे की, उपचारांसाठीचा हा कालावधी ४८ तासांपर्यंत वाढवता येऊ शकतो. स्ट्रोकनंतर दोन दिवसांच्या आत ज्या रुग्णांना शिरेवाटे लोबेरामिसल देण्यात आले, त्यापैकी ७० टक्के रुग्णांनी आपली दैनंदिन कामे स्वतंत्रपणे करण्याची क्षमता पुन्हा मिळवली; हे प्रमाण प्रमाणित उपचारांच्या तुलनेत १३ टक्क्यांनी अधिक होते. हे औषध मेंदूतील ऑक्सिजनचा वापर आणि सूज कमी करते. ज्यामुळे रक्तपुरवठा खंडित झाल्याने दुखावलेल्या परंतु जिवंत असलेल्या पेशींना नष्ट होण्यापासून संरक्षण मिळते.
चीनमधील प्रमुख न्यूरोलॉजिस्ट वांग योंगजुन यांच्या नेतृत्वाखालील संशोधन पथकाच्या मते, हे रुग्ण अवघ्या तीन महिन्यांत कोणत्याही गंभीर अपंगत्वाशिवाय आपल्या दैनंदिन जीवनात परतण्यास सक्षम झाले. या शोधनिबंधाचे सह-लेखक असलेले वांग हे बीजिंग टियानतान हॉस्पिटलचे (जे कॅपिटल मेडिकल युनिव्हर्सिटीशी संलग्न आहे) उपाध्यक्ष आणि तेथील न्यूरोलॉजी सेंटरचे संचालक आहेत.
अशी पार पडली चाचणी
बीजिंग टियानतान हॉस्पिटलचे उपाध्यक्ष आणि नामांकित मज्जातंतूशास्त्रज्ञ डॉ. वांग याँगजुन यांच्या नेतृत्वाखाली ३२ रुग्णालयांमधील ९९८ रुग्णांवर ही चाचणी घेण्यात आली. रुग्णांच्या एका गटाला १० दिवस ‘लोबेरामिसल’चे इंजेक्शन दिले गेले, तर दुसऱ्या गटाला ‘प्लासिबो’ देण्यात आले. ९० दिवसांनंतर, औषध घेतलेल्या ५०२ पैकी ३५० रुग्णांनी पूर्ण कार्यक्षमता मिळवली, जी नेहमीच्या उपचारांपेक्षा तब्बल १३.४ टक्क्यांनी जास्त आहे. या औषधाचे कोणतेही गंभीर दुष्परिणाम आढळलेले नाहीत.
Read About : Normal Pressure Hydrocephalus : नॉर्मल प्रेशर हायड्रोसेफॅलसचा आजार जेष्ठांमध्ये वाढता
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.