सॅटेलाइट आणि अंतराळातील वस्तूंचा मार्गदर्शक खुणा म्हणून वापर; स्वायत्त तंत्रज्ञानामुळे चंद्र आणि मंगळ मोहिमांसाठी नवी आशा
वॉशिंग्टन : NASA GPS-Free Navigation अंतराळ मोहिमांमध्ये महत्त्वाचा मानला जाणारा जीपीएस सिग्नल नसेल, तर अंतराळयान दिशा कशा शोधणार? या अत्यंत गुंतागुंतीच्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात अमेरिकेची अंतराळ संस्था नासाला यश आले आहे. नासाने केवळ सक्रिय सॅटेलाइट आणि अंतराळात तरंगणाऱ्या कचऱ्याचा लँडमार्क (मार्गदर्शक खुणा) म्हणून वापर करून जीपीएसविना अंतराळात अचूक नेव्हिगेशन करण्याचा जगातील पहिला यशस्वी प्रयोग केला आहे.
तंत्रज्ञानाची कमाल
नासाने आपल्या स्टारलिंक मिशनअंतर्गत अंतराळात पाठवलेल्या चार छोट्या क्युबसॅट्सच्या समूहावर हा प्रयोग केला. यासाठी शास्त्रज्ञांनी फाल्कन नावाचे एक प्रगत स्वायत्त सॉफ्टवेअर वापरले, जे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधून बाहेर पडलेल्या इराड्राइव्ह या स्टार्टअपच्या सहकार्याने विकसित करण्यात आले आहे.
कचऱ्यापासून रस्ता कसा शोधला?
साधारणपणे अंतराळातील कचरा किंवा निकामी झालेले सॅटेलाइट हे सक्रिय उपग्रहांसाठी धोक्याचे मानले जातात. मात्र, नासाच्या इंजिनिअर्सनी या धोक्याचे रूपांतर एका नेव्हिगेशन टूलमध्ये केले. सॅटेलाइटवर बसवलेल्या नेहमीच्या स्टार ट्रॅकर कॅमेऱ्यांचा वापर आजूबाजूने जाणाऱ्या रॉकेट बूस्टर्स, बंद पडलेले उपग्रह आणि धातूच्या तुकड्यांवर लक्ष ठेवण्यासाठी करण्यात आला. सॅटेलाइटच्या कॉम्प्युटरमध्ये अमेरिकेच्या संरक्षण विभागाचा २०,००० पेक्षा जास्त अंतराळ वस्तूंचा डेटाबेस आधीच लोड केलेला होता.
जेव्हा अंतराळातून कचऱ्याचे तुकडे गेले, तेव्हा कॅमेऱ्याने त्यांचे फोटो घेतले आणि डेटाबेसशी तुलना करून सॅटेलाइटने पृथ्वीवरील कोणत्याही रेडिओ लहरी किंवा जीपीएस सिग्नलशिवाय स्वत:चे अचूक स्थान आणि वेग शोधून काढला.
अवघ्या ३ दिवसांत आश्चर्यकारक परिणाम
या प्रयोगादरम्यान, सॅटेलाइटने केवळ स्वत:चा मार्गच शोधला नाही, तर अंतराळात फिरणाऱ्या २०० हून अधिक वस्तूंच्या कक्षांचा डेटा पृथ्वीवरील रडारपेक्षाही अधिक अचूकतेने अपडेट केला. हा संपूर्ण प्रयोग अत्यंत स्वायत्त पद्धतीने पूर्ण झाला.
भविष्यातील मोहिमांसाठी महत्त्व
पृथ्वीच्या कक्षेबाहेर किंवा चंद्र आणि मंगळासारख्या खोल अंतराळात जाताना पृथ्वीचे जीपीएस सिग्नल्स अत्यंत कमकुवत होतात किंवा पूर्णपणे गायब होतात. अशा वेळी अंतराळयानाला दिशा दाखवण्यासाठी हे तंत्रज्ञान मैलाचा दगड ठरणार आहे. या शोधामुळे भविष्यातील अंतराळ यानांना पृथ्वीवरील नियंत्रकांवर अवलंबून न राहता स्वत:चा मार्ग स्वत: शोधणे शक्य होणार आहे.
Read About : AI Economy – एआयमुळे जागतिक अर्थव्यवस्थेत दरी
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.