Ad Advertisement Ad Advertisement

Britannia history : ब्रिटानिया – १३४ वर्षांची बिस्कीटमय साथ

Britannia history : एकाचवेळी अनेक उत्पादनं समान लोकप्रियतेने पुढे नेणं कोणत्याही उद्योग समूहासाठी कठीण गोष्ट. पण, हे शिवधनुष्य पेलणारा ब्रँड म्हणजे ब्रिटानिया. बिस्कीटस्, ब्रेड आणि डेअरी उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या १३४ वर्ष जुन्या या ब्रँडची ही गोष्ट.

गुड डे, मारीगोल्ड, टायगर, न्यूट्री चॉईस, मिल्क बिकिज, बर्बन, जिमजॅम, फिफ्टी फिफ्टी, लिटील हार्टस्, नाईस या बिस्किटांच्या यादीवरून एकवार नजर जरी फिरवली तरीसुद्धा ब्रिटानियाचं कार्यकर्तृत्व लक्षात यावं. अनेकांची सकाळ ब्रिटानियाच्या ब्रेडने साजरी होते. ही कंपनी १८९२ मध्ये ब्रिटिश व्यावसायिकांच्या एका गटाने २९५ रुपयांच्या गुंतवणुकीसह स्थापन केली. सुरुवातीला मध्य कोलकाता येथील एका छोट्याशा घरात बिस्किटांचे उत्पादन केले जात होते. त्यानंतर ही कंपनी गुप्ता बंधूंनी, विशेषत: वकील नलिनचंद्र गुप्ता यांनी ताब्यात घेतली आणि व्ही. एस. ब्रदर्स या नावाने तिचा कारभार सुरू ठेवला. १९१८ मध्ये कोलकात्यातील इंग्लिश व्यावसायिक सी. एच. होम्स यांना भागीदार म्हणून घेण्यात आले आणि ‘द ब्रिटानिया बिस्किट कंपनी लिमिटेड’ या कंपनीची स्थापना झाली. १९२४ मध्ये मुंबईत कंपनीचा कारखाना सुरू करण्यात आला. पुढे पीक फ्रिन्स या कंपनीने बीबीकोमधील नियंत्रक हिस्सा विकत घेतला.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश भारतीय सरकारला ब्रिटिश सैनिकांसाठी बिस्किटांचा सातत्यपूर्ण पुरवठा आवश्यक होता. ब्रिटानिया बिस्कीट कंपनीने अनेक वर्षे ब्रिटिश सैन्याला बिस्किटांचा पुरवठा केला. काही काळ तर सैन्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कंपनीने आपल्या उत्पादन क्षमतेपैकी तब्बल ९५ टक्के उत्पादन लष्करासाठी राखून ठेवले होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात बिस्किटांना मोठी मागणी निर्माण झाली आणि त्याचा कंपनीच्या विक्रीवर सकारात्मक परिणाम झाला. १९७९ मध्ये कंपनीचे नाव बदलून सध्याचे ‘ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेड’ असे करण्यात आले.

१९८० साली केरळमधील व्यावसायिक राजन पिलाई यांनी ब्रिटानिया कंपनी विकत घेतली. त्याकाळात त्यांना ‘बिस्कीट किंग’ संबोधलं जाई. सध्या या ग्रुपची मालकी वाडिया ग्रुपकडे आहे. ब्रिटानियाच्या यशाचा विचार केला तर या ब्रँडने किमतीच्या बाबतीत स्पर्धा उत्तम हाताळलेली दिसते. ब्रिटानिया आपल्या उत्पादनांना घाऊक स्वरूपात विकण्याचा प्रयत्न करते. उत्पादनांची किंमत कमी ठेवणं त्यामुळे त्यांना शक्य होते. कुटुंबासाठीच्या मोठ्या फॅमिली पॅकची युक्ती ब्रिटानियाने उत्तम राबवली आहे. ब्रिटानियाच्या उत्पादनांच्या किमती स्पर्धकांच्या, विशेषत: पार्लेच्या किमतींशी स्पर्धा करतात. दोन्हींच्या किमती जवळपास सारख्या दिसतात.

ब्रिटानिया विविध प्रकारच्या उत्पादनांद्वारे मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसह वेगवेगळ वयोगटातील ग्राहकांच्या गरजा पूर्ण करते. जसं की, ब्रिटानिया टायगर कमी उत्पन्न असलेल्या ग्राहकांना लक्षात घेऊन कमी किंमत आकारतं. ब्रिटानिया मारी गोल्ड कुटुंबांना लक्ष्य करतं, तर ट्रीट फ्रूट रोल्स हे विशेष प्रसंगांना साजरं करतं. १९८९ साली ब्रिटानिया कंपनीने आणलेलं बटर काजू, बदाम अशा अफलातून मिश्रणाचं ‘गुड डे’ शब्दश: अनेकांचा दिवस ‘गुड डे’ करतं. याशिवाय ब्रिटानिया ‘लिटील हार्टस्’ आणि ‘फिफ्टी फिफ्टी’ यांनीही भारतीय चवीचा ताबा घेतलेला दिसतो.

ब्रिटानिया समूहाचं एकच ध्येय आढळतं, दर तिसरा भारतीय ब्रिटानिया ग्राहक असेल. ‘इट हेल्थी थिंक बेटर’ ही टॅग लाईन आणून बिस्किटासारख्या मूळच्या अरबट चरबट गोष्टीला आरोग्यदायी बनवण्याची हमी हा ब्रँड घेतो. या निरोगी जीवनाला समोर ठेवत आणि भारतीयांचं आहाराबाबतीत सजग होणं लक्षात घेऊन ब्रिटानियाने २००७ मध्ये भारतातील पहिलं नो ॲडेड शुगर बिस्कीट ‘न्युट्रीचॉईस’ आणलं होतं. आपल्या उत्पादनातून ८५०० टन इतकं चरबीचे (फॅट्स) प्रमाण कमी करत ब्रिटानिया ही भारतातील पहिली ‘झिरो ट्रान्स फॅट्स’ कंपनी ठरली होती.

काळासोबत भारतीयांच्या चवीतला बदल टिपण्याचा प्रयत्न ब्रिटानियाने नेहमीच केला, त्यामुळेच पाच लाख आउटलेटमधून भारतातील ५०%हून अधिक घरांत ब्रिटानिया पोहचलं आहे. त्याशिवाय जगभरातील ६० देशांत ब्रिटानिया उत्पादनं निर्यात होतात. ‘टेस्ट ॲण्ड ट्रस्ट’ हे ब्रिटानियाचंं सूत्र आहे आणि त्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेलेली दिसते. ३०० सर्वांत विश्वसनीय ब्रँड्सच्या यादीत फोर्ब्ज मासिकाने ब्रिटानियाचा समावेश केलेला दिसतो. काही ब्रँडची टॅग लाईन आपल्या मुखी बसलेली असते. तसा ब्रिटानिया जाहिरातीमधला तो चिरपरिचित स्वर आपल्या कानी रुळला आहे. ‘टिंग टिंग टिंग टिडींग’ असं काही ऐकलं की, हा ‘ब्रँड ब्रिटानिया’ ही खुणगाठ पक्की होते. बिस्कीटनामक पदार्थ अपरिचित असण्याच्या काळात सुरू झालेला हा ब्रँड १३४ वर्ष आपल्या आयुष्यात ‘नाईस’ क्षणांची पेरणी करत, आपलं ‘लिटील हार्ट’ जिंकत आपला प्रत्येक दिवस ‘गुड डे’ बनवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आयुष्य ‘फिफ्टी फिफ्टी’ नाही १००% ‘गोल्ड’ होतं हे नक्की!

रश्मी वारंग
rjrashmiwarang@gmail.com

Read About : Barbara McClintock – एक होती नकुशी!

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.