Ad Advertisement Ad Advertisement

Orbital refueling technology in India – आता अंतराळात फिरता ‘इंधन पंप’!

भारतीय स्टार्ट-अपचा अनोखा प्रयोग : इंधनाअभावी निष्क्रिय झालेल्या उपग्रहांना मिळणार नवसंजीवनी

नवी दिल्ली : Orbital refueling technology in India – अंतराळ संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत एक अत्यंत क्रांतिकारी आणि ऐतिहासिक पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. देशातील ‘आॅर्बिटएआयडी एरोस्पेस’ या स्पेस स्टार्ट-अपचे अंतराळात फिरणाºया उपग्रहांमध्ये इंधन भरण्याच्या तंत्रज्ञानावर काम सुरू असून, यासाठीचा त्यांचा ‘आयुसॅट-१ए’ हा विशेष उपग्रह आगामी नोव्हेंबर महिन्यात अवकाशात झेपावणार आहे.
या प्रयोगामुळे भविष्यात अंतराळातच उपग्रहांची डागडुजी आणि त्यात इंधन भरण्याची व्यावसायिक सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. ‘आॅर्बिटएआयडी एरोस्पेस’चे संस्थापक आणि सीईओ शक्तीकुमार आर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० किलो वजनाचा ‘आयुसॅट-१ए’ हा उपग्रह आता तयार झाला आहे. पुढील आठवड्यात त्याच्या अंतिम चाचण्या पार पडतील आणि त्यानंतर तो प्रक्षेपणासाठी श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्रात पाठवला जाईल. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) ‘स्मॉल सॅटेलाइट लाँच व्हेईकल’ रॉकेटद्वारे त्याचे प्रक्षेपण होईल. ‘आयुसॅट-१ए’द्वारे उपग्रहांचे अंतराळात एकमेकांशी अचूक जोडले जाणे आणि सुरक्षित इंधन हस्तांतरण तंत्रज्ञानाची पडताळणी केली जाईल.

‘ऑर्बिटल रिफ्युएलिंग’ काय आहे ?

ही संकल्पना अगदी सोप्या शब्दांत सांगायची तर, हा अंतराळातील फिरता ‘पेट्रोल (इंधन) पंप’ आहे. आजवरची वस्तुस्थिती अशी आहे की, जेव्हा एखाद्या उपग्रहातील इंधन संपते, तेव्हा तो पूर्णपणे निकामी होतो. त्यानंतर त्याला अंतराळात कचरा म्हणून तसेच सोडून द्यावे लागते किंवा त्याच्या जागी कोट्यवधी रुपये खर्च करून नवीन उपग्रह पाठवावा लागतो. मात्र, या नव्या आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे इंधन संपलेल्या जुन्या उपग्रहाजवळ दुसरा ‘सर्व्हिस उपग्रह’ जाऊन त्यात पुन्हा इंधन भरू शकेल. यामुळे संबंधित उपग्रहाचे आयुष्य वाढेल आणि नवीन उपग्रह बनवणे आणि ते अंतराळात पाठवण्याचा अवाढव्य खर्च मोठ्या प्रमाणावर वाचेल.

अपयशातून शिकत मोठी झेप

शक्तीकुमार यांनी स्पष्ट केले की, जरी यापूर्वीच्या एका मोहिमेत रॉकेटमधील तांत्रिक बिघाडामुळे ही चाचणी पूर्ण होऊ शकली नव्हती, तरीही कंपनीने आपले प्रयत्न थांबवलेले नाहीत. उलट, त्या अनुभवातून शिकून कंपनीने आपले काम अधिक जोमाने सुरू ठेवले आहे. याच मालिकेतील पुढचा टप्पा म्हणून कंपनीने २०२७ च्या पहिल्या तिमाहीत आणखी एक अत्यंत महत्त्वाची मोहीम आखली आहे. यामध्ये ‘चेझर’ आणि ‘टार्गेट’ नावाचे दोन उपग्रह अवकाशात पाठवले जातील. हे दोन्ही उपग्रह अवकाशात एकमेकांच्या जवळ आणणे, जोडणे आणि त्यात प्रत्यक्ष इंधन भरण्याची चाचणी घेतली जाईल. या आगामी मोहिमा भारताच्या अंतराळ उद्योगासाठी मैलाचा दगड ठरणार आहेत.

Read About : AI Economy – एआयमुळे जागतिक अर्थव्यवस्थेत दरी
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.