Ad Advertisement Ad Advertisement

Digital Arrest Scam दिल्लीत वृद्धेची ‘डिजिटल अरेस्ट’मधून सुटका!

सायबर पोलिसांची कामगिरी : १४ लाखांच्या संशयास्पद व्यवहारातून दुसऱ्या घटनेची उकल

Digital Arrest Scam छत्रपती संभाजीनगर : शहरातील ७४ वर्षीय वृद्धेला ‘डिजिटल अरेस्ट’ करून ३ कोटी ८० हजार रुपयांना लुटल्याच्या प्रकरणाचा तपास करताना सायबर पोलिसांना दिल्लीतील आणखी एका वृद्धेची सुरू असलेली ‘डिजिटल अरेस्ट’ उघड करण्यात यश आले. फसवणुकीच्या रकमेचा आर्थिक माग काढताना एका बँक खात्यात दिसलेल्या १४ लाख रुपयांच्या नव्या व्यवहारामुळे हा प्रकार समोर आला.

संभाजीनगर शहर सायबर पोलीस आणि महाराष्ट्र सायबरने दिलेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी तातडीने धाव घेत वृद्धेची सुटका केली. तोपर्यंत सायबर गुन्हेगारांनी त्या वृद्धेकडून २९ लाख रुपये उकळले होते.

१८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यान छत्रपती संभाजीनगरातील व्यंकटेशनगर येथील ७४ वर्षीय वृद्धेला डिजिटल अरेस्ट करून ३ कोटी ८० हजार रुपये लुटले होते. हे प्रकरण समोर येताच सायबर पोलिसांनी एकूण रकमेपैकी ८९ लाख रुपये ज्या खात्यांमध्ये वळते झाले होते, त्याचा ‘मनी ट्रेल’ (आर्थिक माग) शोधायला सुरुवात केली. यातील एका खात्याची तपासणी सुरू असतानाच, त्यात युको बँकेतून ‘आरटीजीएस’द्वारे १४ लाख रुपयांची नवीन रक्कम जमा झाल्याची एन्ट्री दिसून आली.

हा प्रकार संशयास्पद वाटल्याने सायबर ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक गणेश गिरी, महाराष्ट्र सायबरचे तांत्रिक विश्लेषक कृष्णा खंडेलवाल, अंमलदार ज्योती भोरे, अमोल सोनटक्के आणि सचिन कदम यांनी तत्काळ पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना ही माहिती दिली.

त्यांनी महाराष्ट्र सायबरच्या अधिकाऱ्यांना हे प्रकरण कळविले. त्यानंतर तातडीने संबंधित युको बँक खात्याची ‘केवायसी’ तपासली असता, ती रक्कम दिल्लीतील एका वृद्ध महिलेच्या खात्यातून आल्याचे स्पष्ट झाले. ही महिलादेखील त्याच सायबर टोळीच्या जाळ्यात अडकल्याचा संशय बळावल्याने महाराष्ट्र सायबरने तात्काळ दिल्ली पोलिसांशी संपर्क साधून तांत्रिक माहिती दिली.

दिल्लीत सुरू होती ‘लाईव्ह डिजिटल अरेस्ट’

महाराष्ट्र सायबर पोलिसांच्या सूचनेवरून दिल्ली पोलिसांनी तातडीने संबंधित वृद्धेचे घर गाठले असता, तिथे समोर सायबर गुन्हेगारांकडून वृद्धेची ‘डिजिटल अरेस्ट’ सुरू असल्याचे ‘लाईव्ह’ चित्र दिसले. समोर खऱ्या पोलिसांना पाहून मोबाइलमध्ये दिसणारे पोलिसच घरी आले की काय?, असा समज झाल्यामुळे वृद्धा प्रचंड भेदरली. मात्र, दिल्ली पोलिसांनी समयसुचकता राखून तिची सुटका केली. समुपदेशन करून तिची भीती दूर केली. मात्र, तोपर्यंत भामट्यांनी या वृद्धेकडून २९ लाख रुपये उकळले होते, पण पोलिसांमुळे तिची मोठी रक्कम वाचली, हे तितकेच खरे.

१,६५९ ‘म्यूल’ खात्यांचे जाळे; ७२५ खाते’फ्रीज’

पोलिसांच्या तपासात सायबर गुन्हेगारांच्या ‘म्यूल अकाउंट’चे मोठे जाळे समोर आले आहे. ३ कोटी ८० हजार रुपये फिरविण्यासाठी गुन्हेगारांनी देशभरातील तब्बल १ हजार ६५९ बँक खाती वापरल्याचे तांत्रिक विश्लेषणात समोर आले. विशेष म्हणजे, कोट्यवधी लुटल्यानंतर या सर्व खात्यांमध्ये काही रुपयांपासून ते लाखांपर्यंतची रक्कम वळती केलेली आहे. हा मनी ट्रेल जुळविताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागते. आतापर्यंत पोलिसांनी देशभरातील ७२५ बँक खाती गोठवली असून, सुमारे ५५ लाख रुपयांची रक्कम ‘फ्रीज’ केले आहेत.

Read About : AI Economy – एआयमुळे जागतिक अर्थव्यवस्थेत दरी
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.