Ad Advertisement Ad Advertisement

Triple Murder – पती-पत्नीने मिळून केल्या तीन महिलांच्या हत्या; ड्रममध्ये सिमेंट भरून पुरला होता मृतदेह

चार वर्षांनंतर तिहेरी हत्याकांडाचा पर्दाफाश

अहमदाबाद (गुजरात): Triple Murder गुजरातमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक गुन्हेगारी घटना उघडकीस आली असून, एका दाम्पत्याने गेल्या चार वर्षांत तब्बल तीन महिलांची निर्घृण हत्या केल्याचे उघड झाले. त्यांनी ड्रममध्ये सिमेंट भरून मृतदेह पुरला होता.

असा झाला धक्कादायक प्रकरणाचा उलगडा

सुरत कोसंबा पोलीस आणि गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत या तिहेरी हत्याकांडात आरोपी पती माधवदास आणि त्याची पत्नी उर्मिला यांना अटक केली आहे. मूळचे सुरतचे असलेले हे जोडपे गुन्ह्यानंतर अहमदाबादच्या वालथेरा गावात राहायला गेले होते. मात्र, गेल्या ९ महिन्यांपासून पत्नी उर्मिला पैसे, दागिने आणि मुलाला घेऊन वेगळी राहत असल्यामुळे माधवदास तिच्यावर प्रचंड रागावला होता. पत्नीला आणि तिच्या चुलत भावाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी त्याने पोलिसांसमोर एक बनावट कथा रचली; परंतु गुन्हे शाखेने कसून तपास केला असता, माधवदास स्वतःच या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले.

सिमेंटच्या ड्रममध्ये मृतदेह पुरला

आरोपींनी २०२२ मध्ये उर्मिलाची आजी शांताबेन वसावा (वय ७० वर्षे) यांची घरात एकट्या असताना हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी मृतदेह एका ड्रममध्ये ठेवला आणि त्यात तीन पोती सिमेंट व पाणी भरून ते घट्ट केले. तीन महिन्यांनंतर संधी मिळताच त्यांनी घराच्या अंगणात खड्डा खणून तो ड्रम पुरला आणि त्यावर स्लॅब बसवला. पोलिसांनी घटनास्थळावरून या वृद्ध महिलेचे सांगाडे आणि अवशेष जप्त केले आहेत.

इतर दोन नातेवाईक महिलांचीही केली हत्या

तपासादरम्यान आरोपींनी शांताबेन व्यतिरिक्त आणखी दोन महिलांचा गळा दाबून जीव घेतल्याची कबुली दिली आहे.

१. भगवती वसावा (उर्मिलाची बहीण): भगवती हिला टीबीचा आजार होता. आजारपणाला कंटाळून या दोघांनी उशीने तोंड दाबून तिची हत्या केली व मृतदेह दफन केला.

२. मंजुलाबेन साधू (माधवदासची आई): माधवदासच्या आईला पॅरालिसिस (पक्षाघात) झाला होता. आजारपणामुळे आरोपींनी उशीने गळा दाबून त्यांचीही हत्या केली व समाज आणि नातेवाईकांना संशय येऊ नये म्हणून त्यांच्या मृतदेहावर रितीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार केले.
पती-पत्नीमधील वादा मुळे तब्बल ४ वर्षांनंतर या क्रूर गुन्ह्याचा पर्दाफाश झाला असून पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

Read About : Cryonics Mumbai Case – भविष्यात जिवंत होण्याच्या आशेने मुंबईतील कुटुंबाने 4 वर्षे मृतदेह ठेवला फ्रीझरमध्ये
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.