जि.प.चा २० कोटींच्या उमेद मॉलचा प्रस्ताव शासनाकडे; महिला बचतगटांना आर्थिक बळ मिळण्याची आशा
Umed Mall Chhatrapati Sambhajinagar छत्रपती संभाजीनगर : ग्रामीण भागातील महिलांनी कष्टाने तयार केलेल्या उत्पादनांना आता मोठी बाजारपेठ मिळणार आहे. महिला बचतगटांच्या उत्पादनांची शहरात थेट विक्री व्हावी, त्यांना योग्य मोबदला मिळावा आणि ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळावी, या उद्देशाने जिल्हा परिषदेने ‘उमेद मॉल’ उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. या मॉलसाठी बांधकाम आणि फर्निचरकरिता २० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद प्रस्तावित आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (उमेद) ग्रामीण महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने पुढाकार घेतला आहे. राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल उभारणीस मंजुरी देण्यात आली असून, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा प्रस्तावही शासनाकडे पाठविण्यात आला आहे. प्रस्तावित उमेद मॉलमध्ये ग्रामीण महिलांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांच्या विक्रीसाठी स्वतंत्र आणि आकर्षक दालने असतील.
- पारंपरिक वस्तू, स्थानिक खाद्यपदार्थ आणि घरगुती उत्पादनांना येथे स्थान मिळणार आहे.
- उत्पादनांचे आकर्षक पॅकेजिंग करण्यासाठीही मदत उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
- त्यामुळे केवळ उत्पादननिर्मितीपुरते मर्यादित न राहता महिलांना विपणन आणि विक्रीची संधी मिळू शकते.
- प्रस्तावानुसार, मॉलमध्ये ५० चारचाकी आणि १०० दुचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था असेल.
- तळमजल्यावर माल साठविण्यासाठी गोदामाची सुविधा प्रस्तावित आहे.
तळमजल्यावरील ३० टक्के जागा व्यावसायिक वापरासाठी भाडेतत्त्वावर देण्याचे नियोजन असून, उर्वरित जागा आणि पहिल्या मजल्यावर महिला बचतगटांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी ‘डी-मार्ट’च्या धर्तीवर व्यवस्था करण्याची संकल्पना आहे. दुसऱ्या मजल्यावर ग्राहकांसाठी खाद्य विभाग उभारण्याचेही नियोजन आहे.
घाटी रुग्णालयासमोरील जागेवर उभारणीचे नियोजन
शहरातील घाटी रुग्णालयासमोर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या रस्त्यालगत असलेल्या जागेवर हा मॉल उभारण्याचे प्रस्तावित आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील या ठिकाणामुळे ग्राहकांना खरेदीसाठी पोहोचणे सोयीचे ठरू शकते. मॉल प्रत्यक्षात साकारल्यास ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना शहरातील ग्राहकांपर्यंत थेट पोहोचण्याची संधी उपलब्ध होईल.
अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्तावाची तयारी
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रस्तावाची तयारी करण्यात आली. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता किरण धनके, शाखा अभियंता शुभम शिंदे, जिल्हा व्यवस्थापक विक्रम सरगर आणि विपणन विभागाचे जिल्हा व्यवस्थापक सचिन सोनवणे यांनी यासाठी काम केले. वास्तुविशारद विष्णू कुंजर यांच्या माध्यमातून प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करण्यात आला आहे.
Read About : LPG Price Hike – व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 60 ते 71 रुपयांपर्यंत वाढ
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.