स्वामी आहेत 3,300 कोटींच्या व्यावसायिक साम्राज्याचे मालक
चेन्नई : Arvind Swamy Business Journey : तमिळ चित्रपटसृष्टीतील ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेते अरविंद स्वामी यांचा प्रवास अतिशय रंजक आणि प्रेरणादायी राहिला आहे. ‘रोजा’ आणि ‘बॉम्बे’ सारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे अरविंद स्वामी यांनी अभिनयापासून दूर जात एक यशस्वी उद्योजक म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली. त्यांची कंपनी ‘टॅलेंट मॅक्सिमस इंडिया’चे मूल्य २०२२ मध्ये सुमारे ३,३०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. एवढे मोठे साम्राज्य उभे करूनही ते स्वत:ला एक ‘वाईट व्यवसायिक ‘ का मानतात, याचा खुलासा त्यांनी नुकत्याच एका पॉडकास्ट मुलाखतीत केला आहे.
अरविंद स्वामी यांना लहानपणी डॉक्टर बनण्याची इच्छा होती. ‘अपोलो हॉस्पिटल्स’चे संस्थापक डॉ. प्रताप सी. रेड्डी हे त्यांच्या कुटुंबातील होते आणि त्यांच्याकडूनच त्यांना प्रेरणा मिळाली होती. मात्र, त्यांचे वडील आणि उद्योगपती व्ही. डी. स्वामी यांची इच्छा होती की त्यांनी व्यवसायात यावे. वडिलांच्या सांगण्यावरून त्यांनी बी.कॉम केले आणि अमेरिकेत ‘मास्टर इन इंटरनॅशनल बिझनेस’चे शिक्षण घेण्यासाठी गेले, परंतु कौटुंबिक कारणामुळे त्यांना अभ्यास अपूर्ण सोडून भारतात परत यावे लागले.
त्यांनी मणिरत्नम यांच्या १९९१ मधील ‘थलापती’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले आणि १९९२ मधील ‘रोजा’ चित्रपटाने त्यांना रातोरात स्टार बनवले. परंतु, त्यांना कधीही ‘स्टार’ बनण्यात रस नव्हता, तर त्यांना चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेत आणि शिकण्यात रस होता.
व्यापारात पाऊल आणि भयानक अपघात
२००० च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांनी चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला आणि व्यावसायिक जगतात पाऊल ठेवले. त्यांनी ग्लोबल आउटसोर्सिंग व्यवसाय आणि स्टील निर्यातीची कंपनी सांभाळली. याच काळात मध्यांतरानंतर एका भीषण अपघातात त्यांच्या पाठीचा कणा दुखावला गेला आणि त्यांचा पाय पॅरालाईज्ड (लुळा) झाला.
सलग ४ ते ५ वर्षे उपचार घेतल्यानंतर ते पुन्हा आपल्या पायावर उभे राहिले. मणिरत्नम यांच्याच ‘कदल’ (२०१३) चित्रपटातून त्यांनी दमदार पुनरागमन केले. त्यानंतर ‘थनी ओरुवन’, ‘ध्रुव’, ‘थलायवी’ आणि ‘आयसी ८१४ : द कंधार हायजॅक’ यांसारख्या कलाकृतींमध्ये त्यांनी उत्कृष्ट भूमिका साकारल्या.
स्वत:ला ‘वाईट व्यवसायिक ‘ का म्हणतात?
पॉडकास्टमध्ये बोलताना अरविंद स्वामी यांनी सांगितले की, त्यांना फक्त नफा कमावण्यासाठी व्यवसाय करणे आवडत नाही. ‘माझ्यासाठी कोणत्याही समस्येवर उपाय शोधणे महत्त्वाचे असते. एकदा तो प्रश्न सुटला की, तो व्यवसाय चालवण्यासाठी इतर लोक असतात आणि मी पुढच्या समस्येच्या सोल्यूशनकडे वळतो. दैनंदिन कामकाज किंवा केवळ नफा कमावण्यासाठी व्यवसाय कसा करावा हे मला माहीत नाही. या अर्थाने मी एक ‘वाईट व्यवसायिक ‘ आहे.’
तसेच, ते व्यवसायात कर्ज घेण्याच्या विरोधात आहेत. व्यवसाय मोठा करण्यासाठी प्रचंड कर्ज घेण्याच्या आजच्या ट्रेंडपासून ते दूर राहतात आणि शक्यतो कर्ज टाळण्यावर किंवा कमी ठेवण्यावर त्यांचा भर असतो. सध्या ते त्यांचा मुलगा रुद्र याच्यासोबत एआय तंत्रज्ञानावर आधारित व्हेंचर वरही काम करत आहेत.
Read About : Honey Singh Summons – हनी सिंगच्या अडचणी वाढणार? १६ ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.