SpaceX च्या रॉकेट तंत्रज्ञानावर आधारित थ्रस्टर्स आणि खास सक्शन सिस्टीमचे प्रात्यक्षिक; टेस्लाचे २०२८ पर्यंत उत्पादन सुरू करण्याचे लक्ष्य.
ऑस्टिन (अमेरिका) : Tesla Roadster Flying Car ऑटोमोबाईल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील क्रांती घडवत इलेक्ट्रिक वाहन निर्माती कंपनी ‘टेस्ला’ने गुरुवारी आपल्या अत्यंत बहुप्रतिक्षित नव्या ‘रोडस्टर’ कारचे भव्य अनावरण केले. टेक्सास येथील ‘स्पेस-एक्स’ चाचणी केंद्रावर पार पडलेल्या या कार्यक्रमात या कारने हवेत झेप घेत चक्क कोलांटी उडी मारून दाखवली. हे पाहून उपस्थित आवाक् झाले नसते तरच नवल.
या प्रात्यक्षिकादरम्यान कारने रॅम्पवरून हवेत झेप घेत हवेतच कलाबाजी केली आणि एका सेकंदापेक्षा कमी वेळात (० ते ६० मैल प्रतितास) वेग पकडून दाखवला. ”भविष्यात उडणाऱ्या गाड्या असतील, हे आता खरे सिद्ध झाले आहे,” अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया टेस्ला आणि स्पेस-एक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) एलॉन मस्क यांनी या वेळी दिली.
कार प्रत्यक्षात हवेत कशी उडते?
टेस्लाने दिलेल्या माहितीनुसार, ‘रोडस्टर’ कारची रचना भौतिकशास्त्र आणि इंजिनिअरिंगच्या मर्यादांना आव्हान देणारी आहे.
- मल्टी-मोड सक्शन सिस्टीम : या कारमध्ये खास पंखे आणि ग्राउंड सीलिंग सिस्टीम आहे, जी कारच्या खालची हवा खेचून घेते. यामुळे कार स्थिर असतानाही छताला किंवा उतरणीला उलटी चिकटून राहू शकते.
- कोल्ड-गॅस थ्रस्टर्स : या कारमध्ये पारंपरिक रॉकेटसारखे कोणतेही ज्वलनशील इंधन किंवा आगीचा वापर केला जात नाही. त्याऐवजी स्पेस-एक्सच्या रॉकेट तंत्रज्ञानावर आधारित अति-उच्च दाबाचे ‘कोल्ड-गॅस थ्रस्टर्स’ कारमध्ये बसवण्यात आले आहेत. हे थ्रस्टर्स हवेत कारचे संतुलन राखण्यास आणि सूक्ष्म हालचाली नियंत्रित करण्यास मदत करतात. थ्रस्टचा दाब खालील दिशेने सोडल्यास कार वरच्या दिशेने ढकलली जाते.
यात सुमारे २५० ते २६० किलोग्राम वजनाची संकुचित हवा (कम्प्रेसड् गॅस) आणि उच्च दाबाचा गॅस विशेष दाबाखाली साठवून ठेवलेला असतो. कारमध्ये जवळपास १० नोझल्स असतात, ज्यांच्या माध्यमातून हा गॅस तीव्र वेगाने बाहेर सोडला जातो. - न्यूटनचा गतीचा तिसरा नियम : हे संपूर्ण तंत्र न्यूटनच्या प्रत्येक कृतीला विरुद्ध आणि समान प्रतिक्रिया होते, या तिसऱ्या नियमावर काम करते. जेव्हा व्हॉल्व्ह उघडला जातो, तेव्हा संकुचित गॅस नोझलधून अत्यंत वेगाने बाहेर फेकला जातो. यामुळे त्याच्या विरुद्ध दिशेने एक प्रचंड शक्ती निर्माण होते, जी कारला हवेत वर उचलण्यास किंवा इच्छित दिशेने ढकलण्यास मदत करते. अचूक वेळेवर सोडलेल्या हवेच्या झोतामुळे कारचे हवेतील संतुलन राखले जाते आणि सुरक्षित लँडिंग शक्य होते. (अंतराळात उपग्रह फिरवण्यासाठीही अशाच प्रणालीचा वापर केला जातो).
- कमालीचा वेग : नेहमीच्या वाहनांची मर्यादा टायर्सच्या पकडीवर (टायर ग्रिप) असते. मात्र, रोडस्टरची थ्रस्टर सिस्टीम नेहमीच्या टायर्सपेक्षा चौपट-पाच पट जास्त ताकद निर्माण करते, ज्यामुळे १ सेकंदापेक्षा कमी वेळात ही कार ० ते ६० मैल वेग पकडते.
पारंपरिक रॉकेट इंजिनांचा वापर का केला नाही?
पारंपरिक रॉकेट इंधन ज्वलनशील आणि अत्यंत उष्ण असतात, जे रस्त्यावर चालणाऱ्या कारसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतात. याउलट, ‘कोल्ड-गॅस’ सिस्टीममध्ये ज्वलन होत नसल्याने ती तुलनेने सुरक्षित असते. मात्र, यात हवेचा साठा मर्यादित असल्यामुळे ही कार विमान किंवा हेलिकॉप्टरप्रमाणे सतत हवेत उडू शकत नाही. हे केवळ काही सेकंदांचे नियंत्रित प्रात्यक्षिक आहे.
२०२८ पर्यंत उत्पादनाचे लक्ष्य
हे मॉडेल सध्या सर्वसामान्य रस्त्यांवर चालवण्यासाठी मंजूर केलेले नाही. टेस्लाची ही ‘रोडस्टर’ कार म्हणजे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग आणि अंतराळ तंत्रज्ञानाचा एक अनोखा संगम आहे. ही कार प्रत्यक्षात पूर्णवेळ उडणारे वाहन नसली, तरी अंतराळातील तंत्रज्ञान पृथ्वीवरील कारवर कसे लागू करता येते, याचा हा एक क्रांतिकारी प्रयोग ठरला आहे. कंपनीने याचे उत्पादन २०२८ पर्यंत सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
Read About: Japan MMX Mission : मंगळाच्या चंद्रावरून माती आणणार जपान; 2031 मध्ये नमुने पृथ्वीवर
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.