Josef Mengele : वैद्यकीय व्यवसाय हा उदात्त मानला जातो. आज त्याला काहीसे बाजारू स्वरूप आले असले तरी रणांगणावर, नैसर्गिक आपत्तीत, भयंकर साथींच्या वेळी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रुग्णांच्या सेवेसाठी झटणारा डॉक्टर आपल्यासाठी देवासमान असतो. पण, देवच दानव झाला तर? आपल्या व्यवसायाला काळिमा फासणारा असा डॉक्टर हिटलरच्या नाझी फौजेत होता. त्याचे नाव जोसेफ मेंगेले.
मानववंशशास्त्राचे शिक्षण घेऊन डॉक्टरेट मिळवणारा जोसेफ मेंगेले याने आपल्या प्रबंधात माणसाच्या जबड्याच्या खालच्या भागावरून त्याचा वंश कळतो असे मांडले होते. दुर्दैवाने त्याचे पुढचे संशोधन हिटलरने मांडलेले आर्यन वंशाचे तथाकथित श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी केले गेले. दुसऱ्या महायुद्धात जगाला लोटणारा हिटलर याला आपल्या आर्यन असण्याचा एवढा दुराभिमान होता की अन्य लोक जगण्याच्या लायकीचे नाहीत, फक्त शुद्ध आर्यन लोकांनाच जगण्याचा अधिकार आहे,त्यासाठी इतरांना मारून टाकावे किंवा त्यांच्यातील धडधाकट माणसांनाच फक्त गुलामांसारखे राबवण्यासाठी जिवंत ठेवावे, अशा त्याच्या आज्ञा होत्या. त्यावेळी जर्मनीच्या ताब्यात असलेल्या पोलंड देशात यासाठी कॅम्प उघडण्यात आले. यात प्रामुख्याने राजकीय विरोधक, ज्यू, रोमानी आणि रशियन कैद्यांना आणून त्यांची छाननी होई. वृद्ध, अशक्त, गरोदर स्त्रिया आणि मुले यांची विषारी गॅस चेंबरमध्ये त्वरेने हत्या केली जाई. पोलंडमधील ‘ऑस्वीच’ कॅम्पमध्ये किमान अकरा लाख माणसांचा बळी घेतला गेला. यातून सुदैवाने वाचलेल्या लोकांनी सांगितलेल्या कहाण्या अंगावर काटा आणणाऱ्या आहेत. जोसेफ मेंगेले या डॉक्टरचा यात कसा हात होता हे पाहू.
१९११ मध्ये एका शेतकी औजारे बनवणाऱ्या कारखानदार कार्लच्या घरात जोसेफचा जन्म झाला. आपला धंदा वाढवण्यासाठी कार्लने नाझी पक्ष आणि हिटलरच्या कट्टर समर्थकांचा एस. एस. गटात प्रवेश केला. यातून त्याला माल ने-आण करणाऱ्या रेल्वे डब्यांच्या ऑर्डर्स मिळू लागल्या. श्रीमंत कार्लचा मुलगा जोसेफ अभ्यासात हुशार होता. १९३० साली इंटर परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या जोसेफने वैद्यकीय शिक्षण घेत १९३५ साली डॉक्टरेट मिळवली. दरम्यान, तो ज्या विद्यार्थी संघटनेत सामील झाला ती नाझी पक्षात विलीन झाली आणि तो नाझी आणि दोन वर्षांत एसएस या बेबंद वागणुकीचा परवाना देणाऱ्या संघटनेचा सभासद झाला.
१९३७ पासून तो व्हर्च्युअर या वंशशास्त्रज्ञाचा मदतनीस झाला. त्याच्या कामाने प्रभावित झालेल्या व्हर्च्युअरने कॅम्पमध्ये येणाऱ्या कैद्यांची वंशशुद्धता तपासण्यासाठी त्याची शिफारस केली. ते काम मिळाल्याने पुढे जोसेफला रोज शेकड्यांनी येणाऱ्या कैद्यांची तपासणी करण्याची संधी मिळाली. धडधाकट व्यक्ती सोडून तो इतरांना त्वरित मारण्यासाठी पाठवत असे. त्याचबरोबर जुळ्या तसेच ओठ, हनुवटी यात दोष असणाऱ्या व्यक्तींमध्ये अनुवंशिकतेने हे घडले आहे का यावरील संशोधनासाठी अश्या व्यक्ती बाजूला काढून घेत असे. इतरांना लगेच मरणाला सामोरे जावे लागत असताना प्रयोगासाठी बाजूला काढलेल्यांचे मरण काही दिवस टळत असे. अन्य शाखांतील संशोधन करणाऱ्या डॉक्टरांनाही डोळे, लिव्हर वगैरे अवयव काढून निर्दय मेंगेले पाठवत असे. सर्वसाधारणपणे जे प्रयोग गिनीपिग्जवर केले जातात, ते मरणप्राय वेदना देणारे अत्याचारी प्रयोग जिवंत माणसांवर तो करत असे. या अघोरी प्रयोगातील बहुतेक सर्व व्यक्ती मृत्युमुखी पडत असत, ज्यांच्याबद्दल मेंगेले याला काडीचीही सहानुभूती वाटत नसे. त्याच्या या निर्दयपणामुळे त्याला ‘मृत्यूदूत’ असे नाव पडले.
१९४४ सालच्या शेवटापर्यंत हा अत्याचार चालू होता. १९४५ च्या सुरुवातीला रशियन फौज ऑस्वीचवर ताबा मिळवणार हे दिसू लागल्यावर तेथील सर्व कागदपत्रे नष्ट करण्यात आली. संशोधन कागद एका नर्सच्या ताब्यात देऊन एसएसचा गणवेश टाकून मेंगेले साध्या लष्करी डॉक्टरच्या भूमिकेत वावरू लागला. फेब्रुवारी १९४५ नंतर मेंगेले आधी झेकोस्लोवाकिया आणि पश्चिमेकडे स्थलांतरित होऊ लागला, तेव्हा अमेरिकन लष्कराकडून त्याला अटक झाली. पण, त्याच्या क्रूर कृत्यांची माहिती त्यांना नसल्याने त्याची जुलै १९४५ मध्ये सुटका झाली. त्यानंतर त्याने नाव बदलले आणि जर्मनी सोडली. या काळात तो युरोपात दिसल्याचे नंतर आढळून आले. अगणित वेळा त्याने नावे बदलली. १७ एप्रिल १९४९ रोजी रेड क्रॉसकडून हेल्मुट ग्रेगर नावाने पासपोर्ट मिळवून तो दक्षिण अमेरिकेत अर्जेंटिना येथे गेला. येथे अनेक नाझी ओळख बदलून रहात होते. त्याने लायसन्स नसताना डॉक्टरकीसुद्धा केली. एका गर्भपात शस्त्रक्रियेत तरुणी मरण पावल्यावर धोका ओळखून तो पॅराग्वे देशात वारंवार जाऊ लागला. तेथे त्याने नागरिकत्वही मिळवले, जे पुढे जाऊन १९७९ मध्ये रद्द झाले. पहिल्या बायकोबरोबर १९५४ साली त्याचा घटस्फोट झाला होता. नंतर त्याने दुसरे लग्न केले.
१९५६ साली आपल्या रॉफ या मुलाला भेटल्यानंतर २१ वर्षांनी त्यांची पुनर्भेट झाली. वडिलांचा कारखाना चालू होता. त्यातील उत्पादनांचा विक्रेता बनून तो जागोजागी फिरत होता. छुप्या मार्गाने वडिलांकडून होणाऱ्या मदतीने त्याने काही कंपन्यांत भागीदारी तसेच राहण्यासाठी जागाही खरेदी केल्या. त्याचे सततचे ओळख आणि जागा बदलणे चालू असताना इस्रायली शिकारी त्याच्या मागावर होते. त्याच्याशी संबंधितांच्या घरांच्या झडत्या घेण्यात आल्या, पण माग राहू न देण्याच्या चतुराईमुळे ते त्याच्यापर्यंत जिवंतपणी पोहचू शकले नाहीत. एका मित्राकडे राहायला गेलेला असताना फेब्रुवारी १९७९ मध्ये पोहताना पक्षाघाताचा दुसरा झटका येऊन तो बुडून दगावला. त्याचे शव गरहार्ड नावाने पुरण्यात आले. १९८५ पर्यंत तो जिवंत असावा असा समज होता, पण खात्रीची खबर मिळाल्याने अखेर त्याचे शव जून १९८५ मध्ये उकरले गेले. अवशेषांची तपासणी होऊन १९९२ मध्ये डीएनएचा पक्का रिपोर्ट येऊन शव मेंगेलेचेच असल्याचे जाहीर करण्यात आले.
श्रीराम बापट
संपर्क : ९८१९९७८१३९
Read About : Assam Crime : आसामचा अमानुष असामी
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.