Ad Advertisement Ad Advertisement

Samruddhi Mahamarg Bus Accident – काळीज हादरवणारी ती काळरात्र… कठडा तुटला असता तर सगळेच मेलो असतो!

समृद्धीवरील जखमी प्रवाशांनी सांगितली थरारक आपबिती; ट्रॅव्हल्स चालकावर नशेचा आरोप

छत्रपती संभाजीनगर : Samruddhi Mahamarg Bus Accident मध्यरात्री १.१० ची वेळ… सर्व प्रवासी गाढ झोपेत असतानाच नागपूरहून मुंबईकडे निघालेल्या चाणक्य ट्रॅव्हल्सला भीषण अपघात झाला आणि एकच आक्रोश कानी आला. या दुर्घटनेत दोन प्रवासी ठार, तर ३० हून अधिक जण जखमी झाले. बस ज्या पुलाच्या कठड्यावर आदळली, त्याच्या बाजूलाच खोल खाई होती. कठडा तुटून बस खाली कोसळली असती, तर आम्ही सगळेच मेलो असतो. ती काळरात्र आठवली तरी अंगावर काटा येतो, अशी थरारक आपबिती घाटी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या जखमी प्रवाशांनी सांगितली. यावेळी काही प्रवाशांनी चालक नशेत असल्याचा गंभीर आरोप प्रवाशांनी केला.

रोड हिप्नोटिझम, अतिवेग, अपुरी झोप, सलग अनेक तासांचे ड्रायव्हिंग आणि रात्री-पहाटेचा मानसिक थकवा यामुळे समृद्धी महामार्गावर जीवघेण्या अपघातांची मालिका सुरूच आहे. महामार्ग अपघातमुक्त करण्यासाठी प्रशासन उपाययोजना सुरू असल्याचे सांगत असले, तरी अपघातांचा आलेख कमी होण्याऐवजी वाढतच असल्याने राज्य सरकारसमोरील आव्हान गंभीर बनले आहे.

कुटुंबाचा पोषणकर्ता गेला; घाटीत नातेवाईकांचा टाहो

मृत रघुनंदन सांगडे हा आई छाया आणि भाचा आदित्य सावद यांच्यासह मांगूळ येथून बसमध्ये बसला होता. छाया व नातू आदित्य मागील सीटवर, तर रघुनंदन केबिनमध्ये बसला होता. या अपघातात रघुनंदनचा दुर्दैवी मृत्यू झाला. चार वर्षांपूर्वीच त्याचा भाऊ कृष्णा याचे निधन झाले होते. दोन्ही तरुण मुले काळाने हिरावून घेतल्याने वृद्धापकाळात छाया यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबाचा एकमेव पोषणकर्ता गेल्याने संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले असून, नातेवाईकांनी घाटीत एकच टाहो फोडला.

चालक तीन तासांपासून सलग चालवित होता बस

नागपूरहून निघालेली बस अंदाजे ५ वाजेच्या सुमारास यवतमाळला होती. तेथील प्रवासी घेऊन रात्री १० ते सव्वादहा वाजता मालेगाव (जि. वाशिम) तालुक्यातील एका ढाब्यावर जेवणासाठी बस थांबविली होती. तेथे २० मिनिटे थांबल्यानंतर प्रवीण राजेकर हा सलग तीन तासांपासून बस चालवित होता. मध्यरात्री १.१० वाजेच्या सुमारास त्याला डुलकी लागताच हा अपघात झाला, असे प्रवाशांनी सांगितले.

शहर, ग्रामीण अन् महामार्ग पोलिसांची तातडीची मदत

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांसह शहर पोलिसांच्या गस्तीवरील दोन्ही वाहनांतील पथकांनी आणि कर्तव्यावरील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले, अशी माहिती पोलीस निरीक्षक स्वाती केदार यांनी दिली. तसेच फुलंब्री पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी तथा प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक डॉ. सोनाली पाईकराव, उपनिरीक्षक सुग्रीव चाटे, राम बारहाते, अंमलदार लालचंद नागलोत आणि अंकुश बागल यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले. याप्रकरणी चालक प्रवीण राजेकर याच्याविरुद्ध फुलंब्री ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

आतापर्यंत सुमारे ८२ खासगी ट्रॅव्हल्सची तपासणी करण्यात आली असून, नियमभंग करणाऱ्या ३६ ट्रॅव्हल्सवर कारवाई केली आहे. या मोहिमेत जादा भाडे आकारणी, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक, मद्यप्राशन करून वाहन चालवणे, अवैध पार्सल वाहतूक, अग्निशमन यंत्रणा व आवश्यक कागदपत्रांची काटेकोर तपासणी केली जात आहे.

  • विजय काठोळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, छत्रपती संभाजीनगर
  • ट्रॅव्हल्सच्या केबिनमध्ये १० प्रवासी होते. ११ वा चालक होता. आणखी प्रवासी भेटला असता तर त्यालाही बसविण्याची चालकाची तयारी होती. आम्हाला चालक बाकड्याखाली बसा, असे म्हणत होता. जर आम्ही त्याखाली बसतो असतो आणि हा अपघात झाला असता तर नक्की मेलो असतो. तो चालक नशेत वाटत होता.
    – देवानंद राठोड, जखमी प्रवासी
सर्व जखमींवर घाटीत उपचार

अर्जुन पंडित खडसे (खडी, ता. पुसद), करण खडसे (पुसद, जि. यवतमाळ), फारुख मोहम्मद अजीज (वसंतनगर, पुसद), देवानंद नथ्थुसिंग राठोड (माळोणी, ता. आर्णी), शिवानी ऊर्फ शिवनेरी अंकुश राठोड व नंदिनी राठोड (आर्णी, जि. यवतमाळ), गयबाई मासोळकर (पोफाळी, ता. उमरखेड), केशव दाभाडे, लीला दाभाडे व कुणाल दाभाडे (अंजूर, भिवंडी), रेखा अतुल लोने, खुशी लोने, सुरक्षिता लोने व ओम लोने (सर्व रा. वसई, जि. पालघर), रमेश दत्तात्रय ढोबळे, निलेश ढोबळे, उद्धव बोडकर व शरद पाईकराव (सर्व रा. ठाणे), कृष्णा बोधनकर (मुलुंड, मुंबई), प्रसिद्ध वाकुळे (मुंबई), अरुणा बोधलकर (कल्याण),

वंदना ताकले (छत्रपती संभाजीनगर), वैभव होळकर (दिग्रस), भूरन विनायक व वंदना राठोड (यवतमाळ), सुमित व विशाल सिरसाठ (वाशिम) आणि अनुराधा परदेशी, आरती बोधनकर, दिव्या जाधव, अजय वाघू भामुळकर (पातोडा, जि. हिंगोली), शुभम सुरेश वंजारी (कवडापूर तांडा, ता. पुसद), केशव मुकुंद दाभाडे (अंजूर, भिवंडी), अन्नपूर्णा पंडित खडसे (हुंडी, ता. पुसद), दत्ता सुभाष जाधव (सावंगी, ता. पुसद), छाया दत्ता सांगडे (पश्चिम मुंबई), वंदना विनोद जाधव व जयकुमार संजय खंडारे (दोघे रा. पुसद).

Read About: Mohammad Mazeen Fraud Case – महिलांचे शोषण करणाऱ्या माझीनला दुबईत पाकिस्तानीचा गंडा

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.