Ad Advertisement Ad Advertisement

Majalgaon accident case -माजलगाव अपघात प्रकरण; अल्पवयीन चालकासह वडीलही आरोपी

तिघांवर गुन्हा दाखल; एक जण अटकेत

माजलगाव Majalgaon accident case : शहराजवळील केसापुरी वसाहतीजवळ भरधाव क्रेटा कारच्या धडकेत पती-पत्नीचा मृत्यू झालेल्या अपघात प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. अल्पवयीन चालकासह त्याचे वडील संभाजी नाईकनवरे यांच्याविरुद्ध सहआरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संभाजी नाईकनवरे यांना अटक केली आहे. यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या तीन झाली आहे.

शुक्रवारी माजलगाव-गेवराई रोडवरील डक पेट्रोल पंपासमोरील राष्ट्रीय महामार्गावर प्रल्हाद गायकवाड व त्यांची पत्नी सुनीता गायकवाड हे दुचाकीवरून पाहुण्याच्या श्राद्धाच्या कार्यक्रमावरून माजलगावकडे येत होते. यावेळी शहराकडून भरधाव आलेल्या क्रेटा कारने त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात प्रल्हाद गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी सुनीता गायकवाड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी रोहित प्रल्हाद गायकवाड यांच्या फिर्यादीवरून सुरुवातीला चालक म्हणून दीपक मेंडके यांच्या अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढील तपासात कार चालवणारा मुलगा अल्पवयीन असल्याचे समोर आल्यानंतर त्याच्यासह वडील संभाजी नाईकनवरे यांनाही सहआरोपी करण्यात आले.

पोलिसांनी संभाजी नाईकनवरे यांना अटक केली असून, या प्रकरणात आता तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. अपघातातील तिसऱ्या आरोपीच्या समावेशामुळे प्रकरणाची व्याप्ती वाढली असून, यातील अन्य आरोपींच्या भूमिकेसह अपघाताच्या कारणांचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल कोळी करीत आहेत.

परप्रांतीय मजुराची गळफास घेवून आत्महत्या

केज : रोजगारासाठी उत्तर प्रदेशातून बीड जिल्ह्यात आलेल्या २३ वर्षीय तरुण मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील नांदूरघाट परिसरात रविवारी (दि.२३) उघडकीस आली. वाघेबाभुळगाव शिवारात लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. फैजान मोहम्मद असे मृत तरुणाचे नाव असून, तो टोरंटो कंपनीच्या पवन ऊर्जा प्रकल्पात मजूर म्हणून काम करत होता. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

घटनास्थळी नागरिकांची गर्दी

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळच्या सुमारास नांदूरघाटजवळील वाघेबाभुळगाव शिवारात ही घटना समोर आली. फैजान मोहम्मद (वय २३, रा. उत्तर प्रदेश) याने शिवारातील एका लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. ही माहिती परिसरात पसरताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली. घटनेची माहिती मिळताच नांदूरघाट पोलीस दूरक्षेत्राच पोहेकॉ. राजू वंजारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.

फैजान मोहम्मद याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. कामाच्या ठिकाणी काही अडचण होती का, वैयक्तिक किंवा कौटुंबिक कारणातून त्याने हे पाऊल उचलले का, याचा तपास पोलीस करत आहेत. त्याच्या सहकाऱ्यांकडूनही माहिती घेतली जात आहे.

Read About : Henry Nicholls Century Against India- न्यूझीलंडची 5 गडी गमावून 243 धावांपर्यंत मजल

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.