Urban Storms and Heavy Rainfall : अलीकडच्या काळात ‘असा’ अनुभव आपल्याला दर पावसाळ्यात येतो. म्हणजे असं की सारं काही शांत असताना अचानक सोसाट्याचे वारे वाहू लागतात. त्या वाऱ्याचा वेग वाढतो. वादळ म्हणावं अशी परिस्थिती निर्माण होते आणि मग धुवांधार पाऊस सुरू होतो. सगळ्यांची तारांबळ उडवून देतो. गेल्या काही वर्षांत मोठाल्या शहरांतून असा अनुभव वारंवार येऊ लागला आहे. विशेष म्हणजे हे भारतातच नाही तर अनेक ठिकाणी अनुभवास येत आहे, त्यामुळंच असं होण्यामागच्या कारणांचा अभ्यास करण्याचं ठरलं. त्यानुसार अमेरिकेतल्या टेक्सास या राज्यातल्या विविध शहरांमध्ये आलेल्या ४० हजार वादळवाऱ्यांचा आणि त्यापाठोपाठ पडणाऱ्या जोरदार पावसाचा अभ्यास करण्यात आला.
यातून असं दिसून आलं की शहराचा एकंदर परिसर कसा आहे, त्यामध्ये किती उंच इमारती आहेत, त्या इमारती एकमेकींना खेटून उभ्या आहेत की त्यांच्यामध्ये व्यवस्थित अंतर आहे, शहरात असणारे रस्ते, त्यावरची गर्दी, झाडं, बागा या साऱ्या गोष्टींच्या एकत्रित परिणामाचं दृश्यस्वरूप म्हणजे तिथं येणारी विविध वादळं आणि ती वादळं घेऊन येणारा पाऊस!
अमेरिकेतल्या या शहरांमध्ये वादळी वारे वाहत असतात अणि पाऊस कोसळत असतो, तेव्हा त्यांच्या आसपासच्या भागात मात्र त्याच्या अगदी पुसट खुणा दिसतात. म्हणजे तिथं वारे वाहतात, पण ती वादळं नसतात; पाऊस पडतो, पण तो ‘कोसळत’ नसतो. असं का होतं? तर ते शहराच्या एकंदर परिसरामुळं, असं या अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. या नव्या अभ्यासामुळं शहरी भागात पडणाऱ्या पावसाचं आणि विशेषत: तो घेऊन येणाऱ्या वादळीवाऱ्यांचं भाकीत अधिक अचूकतेनं करता येऊ शकेल, असा विश्वास संशोधकांना वाटतो आहे. या अभ्यासासाठी जलहवामानशास्त्रज्ञ (हायड्रोक्लायमॅटॉलॉजिस्ट) झिनझिन सुई आणि त्यांचे सहकारी यांनी गेल्या २३ वर्षांच्या वादळीवाऱ्यांची रडारच्या मदतीनं जमा केलेली माहिती गोळा करून प्रत्येक वादळीवाऱ्याचं आणि त्यासोबत आलेल्या पावसाचं विश्लेषण केलं. इथं हे स्पष्ट केलं पाहिजे की, जलहवामानशास्त्रज्ञ हे हवामानात होत असलेल्या बदलांमुळं पावसाचं प्रमाण आणि उपलब्ध होणारं एकंदर पाणी यावर काय परिणाम होतो याचा वेध घेतात. तसंच पूर किंवा दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींंबाबत भाकीत करतात. वातावरणातील पाण्याचं बाष्पीभवन, तयार होणारे ढग आणि पडणारा पाऊस यांचा जमिनीवर उपलब्ध असलेल्या पाण्याशी असणारा संबंध तपासतात.
झिनझिन सुई यांना माहितीचा मिळालेला साठा हा उपयुक्त होता; कारण तो रडारनं जमा केलेला होता. सुई सांगतात, रडार हे वादळीवाऱ्याचा आणि पावसाचा त्रिमितीय नकाशा बनवू शकतात, त्यामुळं वादळाचं आणि त्यापाठोपाठ कोसळणाऱ्या पावसाचं एकंदर स्वरूप काय आहे ते स्पष्टपणं समजू शकतं. आमच्या असं लक्षात आलं की, थोडा काळच टिकणारी आणि एखाद्या विशिष्ट शहरावरच घोंघावणारी वादळं पुन:पुन्हा तिथं निर्माण होतात आणि त्या वादळांमुळं तिथं भरपूर पाऊस पडतो. हा अनुभव शहरवासीयांना रात्रीच्या वेळेस आणि सोमवार ते शुक्रवार या कामकाजाच्या दिवसात येण्याची संभाव्यता अधिक असते. याचं कारण शहरातील हवा कितपत तापली आहे त्यावर सारं अवलंबून असतं. सर्वसाधारणपणं शहरांतील हवा ही त्यांच्या आसपासच्या भागातल्या हवेपेक्षा जास्त गरम झालेली असते. याचं कारण शहरातल्या काँक्रीटच्या इमारती, काँक्रीटचे रस्ते सूर्याकडून येणारी उष्णता शोषून घेऊन साठवून ठेवतात. विविध कारखाने, उद्योग, वाहनं यांमधून बाहेर पडणारा धूर यांचे कण हवेतलं प्रदूषण वाढवतात. यामुळं ढग तयार व्हायला हातभार लागू शकतो. हे ढग वादळं निर्माण करतात, असं या संशोधकांचं म्हणणं आहे.
अगदी गारेगार हवेचा पट्टा जेव्हा उष्ण हवा असलेल्या भागात घुसतो, तेव्हा ‘थंड-आघाडीचं वादळ’ (कोल्ड-फ्रंट स्टॉर्म्स) तयार होतं. हे वादळ शहरात घुसतं तेव्हा त्याचा जोर कमी होतो. याचं संभाव्य कारण सांगताना संशोधक म्हणतात, हे वादळ शहरात शिरतं तेव्हा तिथल्या उंच इमारती, त्या परिसरातील गरम हवेमुळं तापलेल्या असतात. त्यांच्यातून उष्णता बाहेर पडत असते. ती उष्णता ‘थंड-आघाडीच्या वादळा’त मिसळते, त्या वादळाला शांत करते. शहरात कोसळणारा पाऊस हा सर्वसाधारणपणं उष्णकटिबंधीय प्रणालीतून आलेला असतो. ही वादळं समुद्रावर तयार होतात. चक्रीवादळंही तशीच तयार होतात. ती शहरांमध्ये घुसली तर तेथील एकंदर रचनेमुळं त्या वादळाच्या एकूण स्वरूपात फरक पडू शकतो. असं का होतं याचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही. उष्णकटिबंधीय प्रणालीतून निर्माण झालेलं वादळ जो पाऊस घेऊन येतो तो बराच काळ कोसळत राहतो, त्यामुळं पूर येतात; तर शहराच्या भागात किंवा त्याच्या जवळच्या भागात निर्माण झालेलं वादळ जो पाऊस घेऊन येतो, त्यानं अचानक पूरपरिस्थिती निर्माण होण्याची संभाव्यता अधिक असते, असं संशोधक म्हणतात.
आता पृथ्वीवरचं एकंदरच हवामान फार झपाट्यांनं बदलत आहे. ऋतुचक्रंही पालटत आहे. विविध शहरांमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याचा अनुभव जगभरच वारंवार येत आहे. यंदा आतापर्यंत जगभरात ८१ उष्णकटिबंधीय चक्रीवादळं वेगवेगळ्या ठिकाणी धडकली आहेत, त्यामुळं ४२५ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि १४ अब्ज अमेरिकी डॉलर्सपेक्षा जास्त आर्थिक नुकसान झालं आहे. यंदाच्या वर्षाच्या अखेरीला हिंदी महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र यामध्ये चक्रीवादळं तयार होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. चक्रीवादळ म्हणजे वातावरणातील एखाद्या विशिष्ट ठिकाणी हवेचा दाब आसपासच्या काही किमी परिसरापेक्षा कमी किंवा जास्त झाल्यानं दिसून येणारे वातावरणातील बदल. हे बदल विलक्षण वेगानं घडतात, त्यामध्ये वाऱ्याची प्रचंड ताकदही सामावलेली असते. बहुतेक चक्रीवादळांचा केंद्रबिंदू समुद्रावरच सुरू होतो. चक्रीवादळ बहुधा आपल्यासोबत धुंवाधार पाऊसही घेऊन येतं. चक्रीवादळ ४०० ते ६०० किमी परिसरात पसरलेलं असतं, त्यामुळं त्या सर्व भागांतील ढग त्यामध्ये ओढले जातात. या ढगांचं एकत्रिकरण होताच त्यातील बाष्पही एकत्र येतं. त्यापासून पाऊस पडेल असे मोठाले बाष्पकण तयार होतात आणि पाऊस पडतो. आधुनिक विज्ञानामुळं आता चक्रीवादळांचं भाकीत करणं शक्य झालं आहे, त्यामुळंच या वर्षाच्या अखेरीस येणाऱ्या चक्रीवादळांची सूचना आपल्याला मिळाली आहे.
श्रीराम शिधये
shriramshidhaye@gmail.com
Read About : Financial Freedom : आर्थिक स्वातंत्र्याची वाटचाल
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.