तरुणांसाठी आर्थिक स्वातंत्र्याचा मंत्र; योग्य गुंतवणूक आणि संतुलित पोर्टफोलिओ
Financial Freedom : आजचा तरुण वर्ग नोकरी किंवा व्यवसाय सुरू करताच उत्पन्नानुसार खर्च करण्यास सुरुवात करतो आणि त्याच्या मनात आर्थिक स्वातंत्र्य मिळाल्याची भावना निर्माण होते. मात्र, केवळ स्वत:च्या उत्पन्नातून दैनंदिन खर्च भागवता येणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे. जीवनातील उतारवयातही आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी दीर्घकाळ केलेल्या गुंतवणुकीतून मिळणारा परतावा हा आर्थिक स्वातंत्र्याचा महत्त्वाचा आधार असतो.
सध्या ‘गुंतवणूक’ म्हटले की इक्विटी (शेअर बाजार)मध्ये गुंतवणूक करणे, असा एकच अर्थ घेतला जातो. मात्र, गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. भारतात हमी परतावा देणाऱ्या विविध सरकारी गुंतवणूक योजनाही उपलब्ध आहेत, त्यामुळे तरुण वर्गाने (वय ३५ वर्षांपर्यंत) आपल्या आर्थिक उद्दिष्टांचा, जोखीम घेण्याच्या क्षमतेचा आणि भविष्यातील गरजांचा विचार करून विविध गुंतवणूक पर्यायांमध्ये योग्य प्रमाणात गुंतवणूक करून संतुलित पोर्टफोलिओ तयार केला पाहिजे. या दृष्टीने, तरुणांनी गुंतवणुकीचे नियोजन करताना कोणते महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्यावेत हे आता समजून घेऊया.
कमाईपेक्षा बचत महत्त्वाची
तरुण वयात मिळणारा पहिला पगार किंवा व्यवसायातील पहिली कमाई ही आनंदाची बाब असते. परंतु, या कमाईचे संपूर्ण पैसे खर्च करण्याऐवजी त्यातील काही भाग नियमितपणे दीर्घकाळासाठी गुंतवणूक करावा. गुंतवणुकीमध्ये ‘वेळ’ हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. चक्रवाढीमुळे केवळ मूळ रकमेवरच नव्हे तर त्यातून मिळालेल्या परताव्यावरही पुढील काळात परतावा मिळत असतो, त्यामुळे तरुणांनी ‘माझ्याकडे गुंतवणुकीसाठी मोठी रक्कम नाही’ असे म्हणण्याऐवजी ‘मी आजपासून किती नियमित गुंतवणूक करू शकतो?’ हा विचारला केला पाहिजे. तरुण वयात दर महिन्याला किमान दोन हजार रुपये नियमितपणे गुंतवण्याची सवय निर्माण झाल्यास आर्थिक शिस्त लागण्यास मदत होते आणि संपत्ती निर्मितीस सुरुवात होते.
शेअर बाजार म्हणजे जुगार नव्हे
आज अनेक तरुण सोशल मीडिया आणि इतर डिजिटल माध्यमांवरील टिप्सच्या आधारे शेअर्स खरेदी करतात. तरुण वयात या पद्धतीने शेअरमध्ये केलेली खरेदी-विक्री जुगारी वृत्ती निर्माण करते.
शेअर म्हणजे मालकी हक्क असतो
हा विचार मनात घट्ट धरून शेअर खरेदी केले पाहिजेत. आपले शिक्षण वाणिज्य शाखेतून झालेले नसले तरी उत्तम कार्य करणाऱ्या कंपन्यांची यादी शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांकद्वारे प्राप्त होते. उदाहरणार्थ, सेन्सेक्समधील टॉप ३० कंपन्या किंवा निफ्टीमधील टॉप ५० कंपन्यांची वेगळी ओळख द्यावी लागत नाही. कारण निफ्टी किंवा सेन्सेक्समध्ये सहभागी असणाऱ्या कुठल्याही कंपनीचा मागील पाच वर्षांचा परतावा पाहिल्यास दीर्घकाळ गुंतवणूक करण्याची ओढ निर्माण होते. तात्पर्य, तरुणांनी लार्ज-कॅप कंपनीचा दरमहा एक शेअर विकत घेतला तरी दोन वर्षात भारतीय शेअर बाजाराची ताकत समजून येईल.
नवोदित गुंतवणूकदार आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)
इक्विटी (शेअर्स आणि म्युच्युअल फंड) गुंतवणुकीसंदर्भात मार्गदर्शन करणारे अनेक मोबाईल ॲप्स आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म आता एआयच्या (कृत्रिम बुद्धिमत्तेच्या) मदतीने कार्यरत आहेत. या माध्यमातून तरुणांना कंपन्यांचे शेअर्स निवडताना विविध प्रकारचे विश्लेषण आणि मार्गदर्शन मिळते. तसेच, एआयच्या मदतीने संपूर्ण गुंतवणूक पोर्टफोलिओचे विश्लेषण करून त्यातील जोखीम, परतावा आणि विविध गुंतवणुकीतील संतुलन याबाबतही माहिती मिळवता येते.
मात्र, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) माध्यमातून कितीही जलद निर्णय घेता येत असले, तरी त्याच्या काही मर्यादा कायम आहेत. एआय उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे विश्लेषण करून सल्ला किंवा सूचना देत असते, ही बाब नेहमी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
शेअर बाजारातील अचानक होणारे चढ-उतार अनेक आर्थिक, राजकीय आणि जागतिक घडामोडींवर अवलंबून असतात. भविष्यात घडणाऱ्या प्रत्येक परिस्थितीचा अचूक अंदाज एआयला लावता येत नाही. उदाहरणार्थ, जागतिक स्तरावर दोन देशांमध्ये युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा भारतीय शेअर बाजारावर किती आणि कसा परिणाम होईल, याचा अचूक अंदाज एआयच्या माध्यमातून लावणे शक्य नाही, त्यामुळे एआय हे गुंतवणुकीच्या निर्णयासाठी उपयुक्त साधन ठरू शकते; मात्र केवळ एआयच्या सल्ल्यावर अवलंबून न राहता, स्वत:चे आर्थिक उद्दिष्ट, जोखीम घेण्याची क्षमता आणि बाजारातील परिस्थिती यांचा विचार करून गुंतवणुकीचे निर्णय घेणे अधिक योग्य ठरते.
विमा : आर्थिक सुरक्षेचा एकमेव मार्ग
तरुण वयोगटातील मुला-मुलींनी आर्थिक नियोजनाची सुरुवात करताना विमा संरक्षणाला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. भारतातील विमा क्षेत्राचे खाजगीकरण १९९९ मध्ये झाल्यानंतर या क्षेत्रात झपाट्याने बदल घडून आले. ग्राहकांच्या गरजा आणि बदलती जीवनशैली लक्षात घेऊन अधिक सक्षम व व्यापक विमा संरक्षण योजना विकसित करण्यावर भर दिला जाऊ लागला.
आज भारतात हमी परतावा देणाऱ्या विमा योजनादेखील उपलब्ध आहेत. मात्र, अशा योजनांची निवड करण्यापूर्वी त्यातील अटी, लाभ, परतावा आणि दीर्घकालीन आर्थिक परिणाम यांचा योग्य विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे विमा आणि गुंतवणूक यांचा समतोल साधण्यासाठी आर्थिक नियोजन तज्ज्ञांचा सल्ला घेणे उपयुक्त ठरते.
तात्पर्य, संपत्ती निर्मितीची सुरुवात आर्थिक सुरक्षिततेपासून होते आणि आर्थिक सुरक्षिततेसाठी योग्य विमा संरक्षण हा महत्त्वाचा पाया आहे.
लाख मोलाची बँक मुदत ठेव पर्याय
बँक मुदत ठेव पर्याय (फिक्स्ड डिपॉझिट) द्वारे मिळणारा परतावा इक्विटी (शेअर) परतावाहून कमी वाटत असला तरीही मोलाचा आहे. आपण मुदत ठेवीदार असल्यास बँकेकडून मुदत ठेवी रकमेच्या नव्वद टक्के रक्कम कर्ज स्वरूपात मिळू शकते आणि या कर्जावर आकारले जाणारे व्याज मुदत ठेवीच्या व्याजदराहून एक टक्का अधिक असते. म्हणजेच मुदत ठेवीदाराला वार्षिक एक टक्का दराने कर्ज उपलब्ध होते. उदाहरणार्थ, आपली एक लाखाची मुदत ठेवी ७% दराने आहे. या मुदत ठेवीवर जास्तीत जास्त (कमाल) नव्वद हजाराचे कर्ज ८% दराने देण्यात येईल. तात्पर्य, आपत्कालीन फंड स्वरूपात बँक मुदत ठेव पर्याय लाख मोलाचा आहे.
थोडक्यात, आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे कोट्यधिश होणे एवढेच नाही. आपल्या उत्पन्नापेक्षा खर्चाचे योग्य नियोजन करणे, अनावश्यक कर्ज टाळणे, आपत्कालीन निधी तयार करणे, योग्य विमा संरक्षण घेणे, नियमित गुंतवणूक करणे आणि भविष्यातील उद्दिष्टांसाठी पुरेशी आर्थिक तयारी करणे – ही आर्थिक स्वातंत्र्याची खरी सुरुवात आहे.
कौस्तुभ खोरवाल
Read About : Rent vs buy home India : भाड्याने राहून गुंतवणूक करणे फायदेशीर असते का?
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.