Ad Advertisement Ad Advertisement

Rare Earth Metals : धातुकोषाचा नवा अध्याय -रेअर अर्थ

Rare Earth Metals : तांबं, सोनं, चांदी, ॲल्युमिनियम हे धातू आपल्या ओळखीचे आहेत, पण नुकत्याच पार पडलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेनंतर ‘रेअर अर्थ मेटल’ हा विषय चर्चेला आला आहे. काय आहेत हे धातू? या धातूंची सगळेच देश का चर्चा करत आहेत? या धातूंच्या सोन्यासारख्या विटा मिळत असतील तर भाव भडकण्यापूर्वीच गुंतवणूक करायची का? फारच महाग असतील तर काही तोळे घेऊन काही दागिने वगैरे करायचे का? आपल्या देशात या खाणी असतील तर त्या कंपनीचे शेअर घ्यावे का? असे अनेक प्रश्न मनात आलेच असतील. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण मिळवू या!

पिरिऑडिक टेबलमधल्या १७ घटकांना रेअर अर्थ मेटल्स लिंवा एलिमेंट म्हटलं जातं. हे म्हणजे- स्कँडियम, इट्रियम, लॅन्थेनम, सीरियम, प्रेसीओडिमियम, निओडिमियम, प्रोमेथियम, सॅमेरियम, युरोपियम, गॅडोलिनियम, टर्बियम, डिस्प्रोसियम, होल्मियम, एर्बियम, थूलियम, येटरबियम आणि लुटेटियम. या सर्वांचा वापर प्रत्येक इलेक्ट्रॉनिक उपकरणातील छोट्या सर्किट्समध्ये होतो.

ही सर्वच अत्यंत दुर्मीळ नसली तरी त्यांचे खाणीतून उत्खनन आणि शुद्धीकरण अत्यंत गुंतागुंतीचे असते, त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात त्यांचे महत्त्व प्रचंड आहे. निओडिमियम आणि प्रॅसिओडिमियम कायमस्वरूपी शक्तिशाली चुंबकांसाठी वापरले जातात. इलेक्ट्रिक वाहनांच्या मोटारी, ड्रोन, स्पीकर्स, हार्डडिस्कमध्ये त्यांचा वापर होतो. डिस्प्रोसियम आणि टर्बियम उच्च तापमानातही कार्यक्षम राहणाऱ्या चुंबकांसाठी महत्त्वाचे आहेत. युरोपियम आणि टर्बियम एलएडी, टीव्ही, डिस्प्ले आणि रंगीत प्रकाशासाठी, गॅडोलिनियम एमआरआय आणि अणुऊर्जा क्षेत्रात, तर एर्बियम ऑप्टिकल फायबर आणि लेसर तंत्रज्ञानात वापरले जाते. लॅन्थॅनम आणि सेरियम कॅमेऱ्याच्या लेन्स, विशेष काच, काच पॉलिशिंग आणि पेट्रोलियम शुद्धीकरणासाठी उपयुक्त आहेत.

या मूलद्रव्यांचे महत्त्व आता आंतरराष्ट्रीय राजकारणात कसे तर यांच्या डिस्ट्रब्यिुशन चॅनेलवर (पुरवठा साखळी) ज्यांचा प्रभाव असेल तेच येत्या काळात अर्थव्यवस्था चालवतील असे समजले जाते. खाणीतून धातू काढणे ही तर केवळ पहिली पायरी आहे, त्यानंतर त्यांना वेगळे करणं, शुद्धीकरण आणि चुंबकांसारख्या उच्च-मूल्य उत्पादनांमध्ये रूपांतर करणंं यामध्ये जगातले १० वेगवेगळे देश गुंतलेले असतात. त्यांच्या पुरवठ्यावर नियंत्रण म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाच्या अनेक क्षेत्रांवर अप्रत्यक्ष प्रभाव!! आता भारताकडे या अर्थ एलिमेंट्सचा जगातला चौथा सर्वात मोठा साठा आहे, तरीही आपण देशांतर्गत उत्पादन वाढवण्याऐवजी आयातीलाच प्राधान्य देतो आणि यामागे खास कारण आहे. भारतात या रेअर अर्थ एलिमेंट्सना ‘अणु खनिज’ (Atomic Minerals) असा दर्जा दिला आहे. कारण हे खनिज पृथ्वीच्या त्या स्तरांमध्ये आढळतात, जिथे थोरियम आणि युरेनियमसुद्धा सापडतात.

थोरियम आणि युरेनियम हे रेडिओ ॲक्टिव्ह खनिज आहेत – म्हणजे त्यांचा वापर अणुबॉम्ब तयार करण्यात केला जाऊ शकतो. याच कारणामुळे भारतात या खनिजांच्या खाणकामाचा अधिकार फक्त दोन सरकारी कंपन्यांकडे आहे – इंडियन रेअर अर्थ्स लिमिटेड आणि केरल मिनरल्स अँड मेटल्स लिमिटेड. त्यांची उत्पादन क्षमता मर्यादित आहे आणि तांत्रिक संसाधनेही कमी आहेत म्हणूनच भारत या दुर्मीळ घटकांच्या पुरवठ्यासाठी आजही आयातीवर अवलंबून आहे. रेअर अर्थ मेटलच्या उत्पादनाबाबत भारतातही अचानक चर्चा सुरू झाली आहे. कारण या घटकांचा वापर अनेक अत्यावश्यक वस्तूंमध्ये आणि तंत्रज्ञानात होतो. उदाहरणार्थ – सेल्युलर फोन, कॉम्प्युटर हार्ड ड्राइव्हस्, इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनं – या सगळ्यात हे घटक महत्त्वाचे आहेत.

संरक्षण क्षेत्रातदेखील त्यांचा वापर होतो. इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले, गाइडन्स सिस्टिम्स, लेझर्स, रडार आणि सोनार सिस्टिम्स यांमध्ये हे अत्यावश्यक असतात. वजनाच्या दृष्टीने पाहता हे घटक अतिशय सूक्ष्म प्रमाणात वापरले जातात, पण त्याशिवाय वर लिहिलेली उत्पादनं काम करूच शकत नाहीत. जशी-जशी तंत्रज्ञानात प्रगत होत आहे, तशी या घटकांची मागणी आणखी वाढणार आहे. जपानमध्ये तर या घटकांना ‘सीड्स ऑफ टेक्नॉलॉजी’- म्हणजेच तंत्रज्ञानाची बीजे – असंही म्हटलं जातं. हे घटक पृथ्वीमधून काढण्यापासून ते त्यांच्या पुरवठ्यापर्यंतच्या स्पर्धेत अमेरिका आणि चीन दोघेही पूर्ण ताकदीने उतरले आहेत.

अमेरिकेचं ऊर्जा विभाग या घटकांना ‘टेक्नॉलॉजी मेटल्स’ असं नाव देतं. संरक्षण क्षेत्रातील गरजा पाहता, अमेरिका स्वत:कडे नव्या रेअर अर्थ एक्स्ट्रॅक्शन युनिट्सना परवानगी देत आहे. अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशांनी या घटकांचं उत्पादन वाढावावं हे चीनला अजिबात नको आहे – कारण त्यामुळे त्याचं वर्चस्व कमी होईल. अमेरिकेने काही कंपन्यांना या घटकांचे उत्खनन करण्यासाठी प्रोसेसिंग युनिट्स सुरू करण्याची परवानगी दिल्यानंतर काहीच दिवसांत ट्विटर आणि फेसबुकवर काही बनावट खाते सक्रिय झाली – जी या प्रोसेसिंग युनिट्सविरुद्ध लोकांना भडकवण्याचं काम करू लागली. याचा तपास केला तेव्हा समजलं की या बनावट खात्यांचे संबंध चीनशी आहेत. हीच ती खाती होती, जी याआधी चिनी सरकारच्या विरोधकांवर टीका करणारी होती. जरी या अकाउंट्सच्या प्रचाराचा अमेरिकन नागरिकांवर फारसा परिणाम झाला नाही, तरीही ही गोष्ट दुर्लक्षित करता येणार नाही -कारण ती दाखवते की या रेअर अर्थ एलिमेंट्सवरील वर्चस्व टिकवण्यासाठी चीन किती आक्रमक आणि धोरणी आहे.

आपलं प्रभुत्व कायम राखण्यासाठी चीन कोणत्याही टोकाला जाऊ शकतो, हे यावरून स्पष्ट दिसतं. थोडक्यात सांगायचं झालं तर येत्या काळात ‘ज्याच्या हाती ससा तो पारधी’ अशी वेळ येणार आहे.

रामदास
संपर्क : ८७७९६९७९७०

Read About : Yamashita’s Gold : यामाशिताचा खजिना

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.