लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या कारणातून हल्ला केल्याची प्राथमिक माहिती; जखमी विद्यार्थिनीवर खासगी रुग्णालयात उपचार, संशयित पोलिसांच्या ताब्यात
नांदेड (प्रतिनिधी) : Nanded Crime News शहरातील महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेसमुळे वर्दळीच्या असलेल्या भाग्यनगर परिसरात एका १९ वर्षीय विद्यार्थिनीवर तरुणाने खंजीरने हल्ला केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या हल्ल्यात विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून, घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. जखमी १९ वर्षीय तरुणीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या कारणातून हल्ला?
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रोहित शिवाजी पोहरे याने तीच्यावर प्रेम व्यक्त करून लग्नाची मागणी केली होती. मात्र, तिने हा प्रस्ताव नाकारल्याचे सांगण्यात येत आहे. याच कारणातून सोमवारी दुपारी भाग्यनगर रस्त्यावरील अभ्युदय बँकेजवळ दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती आहे.
या वादादरम्यान रोहितने खंजीरने तीच्यावर सलग तीन वार केल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानंतर ती घटनास्थळी कोसळली.
पोलिसांनी जखमी तरुणीला रुग्णालयात दाखल केले
घटनेची माहिती मिळताच भाग्यनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संकेत सवराते यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमी तरुणीला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.
या प्रकरणी भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, संबंधित संशयित पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संतोष तांबे यांनी दिली आहे.
महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेसची मोठी वर्दळ असलेल्या परिसरात भरदिवसा हा प्रकार घडल्याने विद्यार्थी, पालक आणि स्थानिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. घटनेमागील नेमके कारण, हल्ल्याची पार्श्वभूमी आणि पुढील कायदेशीर कारवाई याबाबत पोलिस तपास सुरू आहे.
Read About : Liquor Smuggling – गॅस सिलिंडरमध्ये दारूचा गुप्त कप्पा; बिहारमध्ये 127 बाटल्या जप्त
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.