Yamashita’s Gold : यामाशिताचा खजिना म्हणजे दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानी साम्राज्यवादी सैन्याने आग्नेय आशियातून केलेली युद्धकालीन लूट. त्यांनी ती फिलिपिन्सच्या विविध शहरांमधील गुहा, बोगदे किंवा भूमिगत संकुलांमध्ये लपवून ठेवली होती. फिलिपिन्सचे शेवटचे जपानी लष्करी गव्हर्नर आणि मलयचा वाघ म्हणून ओळखले जाणारे जनरल टोमोयुकी यामाशिता यांच्या नावावरून याला हे नाव देण्यात आले आहे. त्यांनी अवघ्या ७० दिवसांत ब्रिटिशांकडून मलय आणि सिंगापूर जिंकून घेतले होते. फिलिपिन्समध्ये तो खजिना दडलेला असल्याचा दावा करणाऱ्या अनेक कथा अजूनही सांगितल्या जातात. ५० वर्षांहून अधिक काळापासून जगभरातील खजिन्याच्या शोधकांना या कथांनी आकर्षित केले आहे.
यामाशिताच्या सोन्याच्या अस्तित्वाचा दावा करणाऱ्यांमध्ये स्टर्लिंग सीग्रव्ह आणि त्यांची पत्नी पेगी हे प्रमुख आहेत. त्यांनी या विषयाशी संबंधित दोन पुस्तके लिहिली आहेत: ‘द यामाटो डायनॅस्टी: द सिक्रेट हिस्टरी ऑफ जपान्स इम्पीरियल फॅमिली’ (२०००) आणि ‘गोल्ड वॉरियर्स: अमेरिकाज सिक्रेट रिकव्हरी ऑफ यामाशिताज गोल्ड’ (२००३). सीग्रव्ह यांचा असा दावा आहे की, सहा हजार टनांहून अधिक सोन्याची झालेली ही लूट नियोजनपूर्वक आयोजित केली गेली होती. यात योशिओ कोडामासारखे याकुझा टोळीचे गुंड आणि सम्राट हिरोहितो यांच्यासह जपानी समाजातील सर्वोच्च स्तरावरील व्यक्तींचा सहभाग होता. आग्नेय आशियातून मिळवलेल्या लूटमारीच्या संपत्तीतून जपानचे युद्ध चालवायचे, असा जपानी सरकारचा प्रयत्न होता. सीग्रव यांचा असा आरोप आहे की, हिरोहिताने आपल्या भावाला, प्रिन्स यासुहितो चिचिबु यांना गोल्डन लिली नावाच्या एका गुप्त संस्थेचे प्रमुख म्हणून नेमले होते. या संस्थेचे नाव सम्राटाने लिहिलेल्या एका कवितेवरून ठेवण्यात आले होते.
असे म्हटले जाते की, लुटलेल्या मालाची ठिकाणे माहीत असलेल्यांपैकी अनेकांना युद्धादरम्यान ठार मारण्यात आले किंवा नंतर मित्र राष्ट्रांनी त्यांच्यावर युद्धगुन्ह्यांसाठी खटले चालवून त्यांना फाशी किंवा कारावासाची शिक्षा दिली. यामाशिता यांच्यावरसुद्धा युद्ध गुन्हे सिद्ध झाले. अमेरिकेच्या लष्कराने २३ फेब्रुवारी १९४६ रोजी लोस बानोस, लगुना, फिलिपिन्स येथे त्यांना फाशी दिली.
सीग्रव्हज यांच्या मते, एडवर्ड लॅन्सडेल आणि सेव्हेरिनो गार्सिया डियाझ सांता रोमाना यांना मनिलाच्या उत्तरेकडील उंच दऱ्यांमधील गुहांमध्ये गोल्डन लिलीचे अनेक साठे सापडले. सांता रोमानाने यामाशिताचा ड्रायव्हर मेजर कोजिमा काशी याचा लुटीची ठिकाणे मिळविण्यासाठी छळ केला. लॅन्सडेल विमानाने टोकियोला गेले आणि त्यांनी मॅकआर्थर व त्यांचे गुप्तचर प्रमुख चार्ल्स विलोबी यांना माहिती दिली. त्यानंतर अमेरिकेत जाऊन क्लार्क क्लिफर्ड यांना माहिती दिली आणि शेवटी रॉबर्ट अँडरसन यांच्यासोबत परत येऊन डग्लस मॅकआर्थर यांच्यासमवेत फिलिपिन्समधील अनेक गुहांची पाहणी केली. तेथे असे १७० हून अधिक बोगदे आणि गुहा सापडल्या. अमेरिकेच्या भविष्यातील मोहिमांना पाठिंबा देण्यासाठी रॉबर्ट अँडरसन आणि पॉल हेलिवेल यांनी जहाजाद्वारे ती लूट हलवल्यानंतर ४२ देशांमध्ये १७६ ब्लॅक गोल्ड बँक खाती उघडली होती.
लुटलेल्या मालमत्तेत बँका, डिपॉझिटरीज, इतर व्यावसायिक परिसर, संग्रहालये, खाजगी घरे आणि धार्मिक इमारतींमधून लुटण्यात आलेल्या विविध प्रकारच्या मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे. विविध वृत्तांनुसार ती लूट सुरुवातीला सिंगापूरमध्ये जमा करण्यात आली होती. नंतर ती फिलिपिन्सला हलवण्यात आली. युद्ध संपल्यानंतर फिलिपिन्सहून तो खजिना जपानच्या मुख्य भूमीवर नेण्याचे जपानी लोकांचे नियोजन होते, पण पॅसिफिकमधील युद्ध जसजसे पुढे सरकले, तसतसे अमेरिकेच्या नौदलाच्या पाणबुड्यांनी आणि मित्रराष्ट्रांच्या लढाऊ विमानांनी जपानच्या जहाजांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करून ती बुडवली. या बुडालेल्या जहाजांमध्ये लूट घेऊन जाणारीसुद्धा काही जहाजे होती.
सीग्रव्हज आणि इतर काहींनी असा दावा केला आहे की, अमेरिकन लष्करी गुप्तचरांनी लुटीचा बराचसा भाग शोधून काढला, त्यात भागीदारी मिळवण्यासाठी त्यांनी हिरोहितो आणि इतर वरिष्ठ जपानी व्यक्तींशी हातमिळवणी केली. नंतर शीतयुद्धादरम्यान जगभरातील अमेरिकन गुप्तचर ऑपरेशन्सला वित्तपुरवठा करण्यासाठी त्यांनी ब्लॅक गोल्ड म्हणून त्याचा वापर केला. कित्येक देशी परदेशी शोधक अजूनही तो खजिना शोधतच आहेत. या प्रयत्नात अनेक शोधकांचे अपघाती मृत्यू, दुखापती आणि आर्थिक नुकसान झाले आहे. फिलिपिन्सचे राष्ट्रीय संग्रहालय अशा प्रकारे खजिना शोधण्यासाठी परवाने जारी करतात.
युनिव्हर्सिटी ऑफ द फिलिपिन्सचे इतिहास प्राध्यापक रिकार्डो ट्रोटा जोस यांनी मात्र आग्नेय आशियातून फिलिपिन्समध्ये खजिना आणला गेला होता या सिद्धांतावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. १९४३ पर्यंत समुद्रावरील जपानी नियंत्रण संपले होते. अमेरिकेकडे तो खजिना शेवटी जाणारच आहे हे माहीत असताना इतकी मौल्यवान गोष्ट इथे आणण्यात काहीच अर्थ नव्हता. त्याऐवजी तो तैवान किंवा चीनला पाठवणे ही अधिक तर्कसंगत कृती ठरली असती. फिलिपिन्सच्या नॅशनल हिस्टॉरिकल इन्स्टट्यिूटचे अध्यक्ष आणि इतिहासकार अंबेथ ओकाम्पो यांनी लिहिले आहे, गेल्या ५० वर्षांत अनेक लोकांनी, मग ते फिलिपिनो असोत वा परदेशी, यामाशिताच्या त्या न सापडणाऱ्या खजिन्याच्या शोधात आपला वेळ, पैसा आणि ऊर्जा खर्ची घातली आहे. मला नवल वाटते ते याचेच की, गेल्या ५० वर्षांत खजिना शोधणारे अनेक लोक, त्यांचे नकाशे, तोंडी माहिती आणि अत्याधुनिक मेटल डिटेक्टर्स असूनही कोणालाही काहीच सापडलेले नाही.
डिसेंबर १९६९ मध्ये मनिलापासून सुमारे ४० किमी अंतरावर असलेल्या पर्वतांमध्ये सोन्याच्या विटा सापडल्या असे सर्वत्र बोलले जाऊ लागले. जून २०१८ मध्ये कपोन्स बेटावर खजिन्याच्या शोधात बेकायदेशीर उत्खनन केल्याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी १७ जणांना अटक केली. यामध्ये चार जपानी, त्यात एका १५ वर्षांच्या मुलाचा समावेश होता आणि १३ फिलिपिनो नागरिकांचा समावेश होता.
खजिना शोधणे हेच आपल्या आयुष्याचे एकमेव इतिकर्तव्य अशा भावनेतून कित्येक लोक त्यांच्या जीवनातील अनेक बहुमोल वर्षे, एक मोठा काळ एका दुर्दम्य इच्छाशक्तीतून सखोल अभ्यास आणि प्रत्यक्ष शोधकामासाठी देतात. काही मोजक्या लोकांच्या हाती प्रत्यक्ष खजिना किंवा त्याचा काही भाग लागतोही. बाकीच्यांच्या हाती येते अनेकानेक वेगवेगळ्या अनुभवांचे मौल्यवान संचित आणि ध्येयाच्या पाठीमागे जीव तोडून धावल्याची कृतार्थ भावना.
नितीन साळुंखे
संपर्क : ९९७५६७०६१२
Read About : Captain Tatsunosuke Ariizumi : कॅप्टन तात्सुनोसुके अरिझुमी
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.