AI Revolution : ‘एआय’ अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेने मानवी जीवनावर समग्र परिणाम झाला काय? या प्रश्नाचे उत्तर आगामी काळात मिळणार आहे. मात्र त्यापूर्वी त्याची कोणाला दहशत तर कोणाला संधी वाटत आहे. कोणत्याही तंत्रज्ञानाचा वापर मानवी प्रगतीसाठी केला, तर त्याचे सकारात्मक परिणाम भविष्याला दिशा देतात; परंतु संधीच्या नावावर धोके मिळणार असतील, तर डोळे उघडे असले पाहिजे. ‘एआय’संदर्भात जगभरातून जी माहिती मिळते ती ज्ञानाचा अथांग महासागर असला, तरी हे ज्ञान मानवी चेतनेचा भुंगा करणारा नाही काय? तुमच्या विचार आणि कल्पना करण्याच्या पद्धतीचा कोळसा करणारा नाही काय? एखाद्या गोष्टीची किंमत कष्ट केल्याशिवाय मिळत नाही; परंतु कष्ट न करताच एखादी गोष्ट मिळत असेल, तर तिला मूल्य नाही. व्यक्ती, समाज आणि राष्ट्र हे स्वप्नरंजन नव्हे, तर वर्तमानाला भविष्याकडे घेऊन जाणारी साखळी आहे. या साखळीने मानवाच्या अप्रगत अवस्थेपासून तंत्रज्ञानाच्या महाजाळाचे युग बघितले आहे; पण ही साखळी कधीच कोलमडली नाही; परंतु काही दिवसांपूर्वीच मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अनियंत्रित वापरामुळे सायबर आणि जैविक दहशतवादातून तब्बल एक अब्ज लोकांचा जीव धोक्यात येऊ शकतो, असा गंभीर इशारा दिला होता, तर हे तंत्रज्ञान मानवी नियंत्रणाबाहेर गेले तर काय घडू शकते, असे धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारे वास्तव नुकतेच समोर आले आहे.
ओपनएआयच्या एका एजंट्सने ऑस्ट्रेलिया सरकारच्या ‘मेडिकेअर’ आरोग्य डेटाबेसवर सायबर हल्ला करून पोर्टलच हॅक केले. ही घटना जूनमध्ये घडली अन् सप्टेंबरमध्ये उघडकीस आली. तीन महिन्यांपर्यंत ही घटना कोणाच्या लक्षात आली नाही. त्यामुळे या तंत्रज्ञानाच्या सुरक्षाभिंतीचे काय? एवढेच नव्हे, तर ओपनएआयच्या एजंट्सने जगभरातील शंभरावर संस्थांच्या संकेतस्थळांवर अनधिकृत घुसखोरी केल्याचा प्रकार उघडकीस येणे जगाला अंधारात ठेवण्यासारखे आहे. ही केवळ एक तांत्रिक चूक नाही, तर भविष्यातील धोक्याची पूर्वसूचना आहे. त्यामुळे संत कबीर यांच्या ‘कबिरा कहे हे जग अंधा, अंधी जैसी गाय, बछडा था सो मर गया, झुठी चाम चटाय’ या दोह्याची आठवण होते. अर्थात एक आंधळी गाय होती. तिचे वासरू मरण पावले. मालकाने त्याच्या कातड्यात भुसा भरून वासराचा पुतळा तयार केला. गाय आंधळी होती, ती वासराला चाटत होती. पूर्वीप्रमाणेच पुतळ्याला चाटून दूध देत होती.
आजचे जगसुद्धा आंधळ्या गाईसारखे आहे. ‘एआय’ भविष्याला आकार देणार असला, तरी आंधळा करून ठेवणार आहे. तुमची आर्थिक प्रगती म्हणजे सर्वस्व नव्हे, तर शारीरिक आणि मानसिक आरोग्य मेंदूला बळकट करीत असते. मात्र तंत्रज्ञानाच्या जगात कोण बळकट राहणार? हा पुन्हा पुन्हा विचारला जाणारा प्रश्न आहे.
सध्याच्या काळात कठीण प्रश्नांची उत्तरे देण्यापासून ते वैद्यकीय संशोधन, अर्थकारण आणि अंतराळ संशोधनापर्यंत एआयने उपयुक्तता सिद्ध केली; परंतु हेच तंत्रज्ञान मानवी नियंत्रणाच्या पलीकडे जाऊन अनपेक्षित डिजिटल कृती करू लागते, तेव्हा समृद्धीचा मार्ग वाटणारा हा प्रवास धोकादायक वळणावर असल्याचे दिसणे म्हणजे ‘आंधळे बनू नका, डोळस बना’, हा संदेश देणारा आहे. पारंपरिक संगणकीय प्रणाली ठरवून दिलेल्या नियमांनुसार काम करते; परंतु एआय एजंट्सची कार्यपद्धती यापेक्षा भिन्न असते. त्यांना एखादे अंतिम उद्दिष्ट दिले की, ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मधले सर्व टप्पे स्वत:च्या बुद्धीने ठरवितो. काम काय करायचे, हे ठरविण्यासोबतच ते कसे करायचे याबाबत निर्णय घेण्याचे काही स्वातंत्र्य एआय स्वत:कडे घेतो. या प्रक्रियेत एआयने दिलेला आदेश किंवा कमांड चुकीच्या पद्धतीने समजून घेतली, तर तो उद्दिष्ट गाठण्यासाठी अशा काही अनपेक्षित आणि डिजिटल कृती करतो ज्या मानवी सुरक्षेसाठी आव्हान आहे.
नुकतेच ओपनएआयच्या एजंट्सने १०० हून अधिक सरकारी व खासगी संस्थांच्या डेटाबेस व सिस्टीममध्ये घुसखोरी केली. जर एआय एजंट्स सरकारी यंत्रणा, संरक्षण, बँक आणि वित्तीय संस्थांच्या सिस्टीममध्ये असे अनियंत्रित वर्तन करू लागले, तर डेटा चोरी, आर्थिक गैरव्यवहार आणि सुरक्षेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. अशावेळी गरीब, अप्रगत आणि विकसनशील देश काय करणार? या माध्यमातून जगाच्या व्यवस्थेची कोंडी केली जाणार काय? एआय पडद्यामागे कोणती कृती करतो हे २४ तास कोण लक्ष ठेवणार आहे? अर्थात एआय एजंट्सना मर्यादित अधिकार देणे आणि त्यांच्या प्रत्येक डिजिटल कृतीची नोंद ठेवून कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ ‘शटडाउन’ करता आले पाहिजे.
एआयला मानवी हस्तक्षेपाशिवाय स्वत:हून डिजिटल कृती करण्याचे स्वातंत्र्य दिले जाते, हीच स्वायत्तता आता गंभीर समस्या ठरत आहे.
उद्या एआय स्वत:च्या तर्काने मानवी हितसंबंधांनाच धोका ठरेल अशा कृती करू शकतो. तंत्रज्ञानाचा विकास रोखणे शक्य नाही. मात्र प्रगतीच्या शर्यतीत सुरक्षेकडे दुर्लक्ष करणे विनाशाशिवाय दुसरे काही मिळणार नाही. ओपनएआयने स्वत: ही चूक मान्य करून संबंधित १०० संस्थांना सतर्कतेचा इशारा दिला; परंतु केवळ इशारा देऊन भागणार नाही. भविष्यात एआय तंत्रज्ञानाचा वापर करताना ‘ह्युमन-इन-द-लूप’ ही संकल्पना सक्तीची करावी लागणार आहे. अन्यथा हे जगही त्या आंधळ्या गाईसारखे ठरेल. त्यामुळे तंत्रज्ञान आणि एआय क्रांतीचा महाधोका प्रत्येकाने लक्षात घेतला पाहिजे.
Read About : Financial Freedom : आर्थिक स्वातंत्र्याची वाटचाल
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.