भारताच्या चित्ता संवर्धन मोहिमेला मोठे यश
शेओपूर : Cheetah Conservation मध्य प्रदेशातील कूनो नॅशनल पार्कमध्ये भारतात जन्मलेल्या ३२ महिन्यांच्या केजीपी२१ नावाच्या मादी चित्त्याने ५ निरोगी शावकांना (पिल्लांना) जन्म दिला आहे. केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर या नवजात पिल्लांचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली. त्यांनी या ऐतिहासिक घटनेचे वर्णन प्रोजेक्ट चीता साठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आनंदाचा क्षण म्हणून केले आहे.
चित्त्यांची एकूण संख्या ६० वर
कूनो पार्कमध्ये आलेल्या या ५ नवीन पाहुण्यांमुळे आता भारतातील चित्त्यांची एकूण संख्या ६० वर पोहोचली आहे. भारतासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब म्हणजे, या ६० चित्त्यांपैकी ४१ चित्ते हे भारताच्या मातीत जन्मलेले आहेत.
पुढील पिढीचा उदय
मुखी आणि केजीपी १२ या मादी चित्त्यांनंतर, भारतात जन्मलेली केजीपी २१ ही तिसरी अशी मादी चित्ता ठरली आहे, जिने पिल्लांना जन्म दिला आहे. यामुळे भारतातील चित्त्यांची पुढची पिढी तयार होण्याच्या मोहिमेला मोठी गती आहे.
बोत्सवाना वंशाची सुरुवात
या नवजात पिल्लांचे पिता बोत्सवाना देशातील नर चित्ता आहेत. त्यामुळे या पिल्लांच्या जन्मामुळे भारतात बोत्सवाना वंशाची अधिकृत सुरुवात झाली असून, भारतातील चित्त्यांच्या संख्येमध्ये एक नवीन आणि मजबूत अनुवांशिक विविधता जोडली गेली आहे. भारतीय भूमीवर चित्त्यांचे पुनर्वसन करण्याची ही मोहीम आता कमालीची यशस्वी ठरताना दिसत आहे.
Read About : Indian Wolf Satellite Collar लांडग्याला सॅटॅलाइट कॉलर; राज्यातील दुसरा प्रयोग संभाजीनगरात
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.