‘टेरर फंडिंग’ ची दहशत दाखवून सायबर गुन्हेगारांनी लुटली घर विकून आलेली रक्कम
छत्रपती संभाजीनगर : ‘Digital Arrest’ Shock for Retired Banker Woman : ७५ वर्षीय वृद्ध आजींना डिजिटल अरेस्ट करून ३ कोटी ८० हजार रुपये लुटल्याची घटना ताजी असतानाच सायबर भामट्यांनी पुन्हा एका ६७ वर्षीय निवृत्त बँकर महिलेला टार्गेट केले. डेटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडियामधून बोलत असल्याची बतावणी करून सायबर गुन्हेगाराने निवृत्त बँकर महिलेला ८ दिवस डिजिटल अरेस्ट केले. या काळात तुमच्या आधार कार्डचा वापर करून दुसरे खाते उघडले असून त्यातून मनी लाँड्रिंग व टेरर फंडिंग होत असल्याची थाप मारून प्रत्यक्ष अटकेची भीती घालत तब्बल १३ लाख रुपये लुटले. हा धक्कादायक प्रकार २३ ते ३० सप्टेंबरदरम्यान घडला. या प्रकरणी ४ ऑक्टोबरला एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भक्ती नगर, एन-१, सिडको भागात राहणाऱ्या ६७ वर्षीय फिर्यादी सिंडिकेट बँकेतून सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यांनी नुकतेच आपले एक जुने घर विकले होते, ज्याचे १३ लाख रुपये त्यांच्या एसबीआय बँकेच्या खात्यात जमा होते. २३ सप्टेंबर रोजी दुपारी त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सॲप कॉल आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने तो डेटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडियामधून बोलत असल्याचे सांगितले. तसेच, तुमच्या आधार कार्डचा नंबर चोरून कुणीतरी दुसरे खाते उघडले आहे आणि त्यातून दहशतवाद्यांना पैसा पुरवला जात आहे. दोन तासांत तक्रार न केल्यास पोलीस तुम्हाला हातकड्या लावून अटक करतील. हा नॅशनल लेव्हलचा विषय असून मीडिया बोलावून तुमची बदनामी करू, अशी थेट धमकी सायबर भामट्याने दिली. या प्रकरणातून सुटायचे असेल तर तुमच्या खात्यातील सर्व पैसे आरबीआयच्या तपासासाठी एका विशिष्ट खात्यात जमा करावे लागतील, असे सांगून त्यांनी शकुंतला यांना प्रचंड घाबरवून सोडले. तसेच, दर दोन तासाला व्हिडिओ कॉल करून पुरावा देण्याची अट त्यांनी घातली होती.
दोन दिवसांत उकळले १३ लाख
अटकेच्या आणि बदनामीच्या भीतीपोटी शकुंतला यांनी २९ सप्टेंबर रोजी ८ लाख रुपये आणि ३० सप्टेंबर रोजी ५ लाख रुपये असे एकूण १३ लाख रुपये भामट्यांनी सांगितलेल्या जहिराबाद येथील कोटक महिंद्रा आणि जामखेडी, कर्नाटकातील येस बँकेच्या खात्यांत आरटीजीएसद्वारे ट्रान्सफर केले. पैसे जमा केल्यानंतरही भामट्यांनी पैशांची मागणी सुरूच ठेवली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. अधिक तपास पोलीस निरीक्षक गणपत राहिरे करत आहेत.
बँकेत नोकरी, तरीही सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात!
सायबर गुन्हेगार लोकांच्या मानसिकतेशी कसे खेळतात, याचे हे अत्यंत प्रातिनिधिक उदाहरण आहे. फिर्यादी महिला स्वत: बँकेतून सेवानिवृत्त झाल्या आहेत. बँकिंग व्यवहारांची त्यांना पूर्ण माहिती आहे. मात्र, तुमच्या नावावर दहशतवाद्यांनी खाते उघडले आहे, पोलीस तुम्हाला अटक करायला येत आहेत, अशी सायकोलॉजिकल दहशत या भामट्यांनी त्यांच्या मनात निर्माण केली. या दबावामुळे बँकिंग क्षेत्रातील त्यांचे ज्ञानही निष्प्रभ ठरले आणि केवळ भीतीपोटी त्यांनी स्वत:च्या हाताने आयुष्याची पुंजी गुन्हेगारांच्या हवाली केली.
फसवणूक झाल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधा
पोलीस किंवा सीबीआय कधीही व्हॉट्सॲपवर कॉल करून पैशांची मागणी करत नाही किंवा कोणालाही डिजिटल अरेस्ट करत नाही. असा कॉल आल्यास तत्काळ १९३० या हेल्पलाइनवर संपर्क साधावा किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती द्यावी, असे आवाहन गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी केले आहे.
Read About : Engineer Robbed in CSN – तुझ्याकडे ड्रग्स आहे म्हणत चाकूच्या धाकावर अभियंत्याला लुटले!
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.