‘इंडिया झूमे छे, गरबे घूमे छे’ ची उत्सुकता
मुंबई: Bhoomi Trivedi AI Navratri Song – नवरात्रीच्या उत्सवाला यंदा आधुनिक तंत्रज्ञानाची खास जोड मिळणार आहे. मुंबईत होणाऱ्या ‘ रंग रास नवरात्रोत्सव २०२६’ मध्ये प्रसिद्ध गायिका भूमी त्रिवेदी आपल्या नव्या एआय आधारित नवरात्री गाण्याचे सादरीकरण करणार आहेत. ‘इंडिया झूमे छे, गरबे घूमे छे’ असे या गाण्याचे नाव आहे.
‘रंग रास नवरात्रोत्सव’चे यंदाचे पाचवे वर्ष असून, मुंबईतील बोरिवली पश्चिम येथील चिकूवाडी परिसरात नऊ दिवस हा उत्सव रंगणार आहे. ११ ते १९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत बालासाहेब मनोरंजन उद्यान येथे संगीत, गरबा, नृत्य आणि भक्तीचा जल्लोष पाहायला मिळणार आहे.
एआय आणि गरब्याचा नवा प्रयोग
भूमी त्रिवेदी यांचे हे पहिल एआय आधारित नवरात्री म्युझिक व्हिडिओ असल्याचे सांगण्यात आले आहे.पारंपरिक गरब्याची ऊर्जा आणि आधुनिक एआयतंत्रज्ञान यांचा मेळ या गाण्यात पाहायला मिळणार आहे. हे गाणे भूमी त्रिवेदी यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित केले जाणार आहे.
याबाबत भूमी त्रिवेदी यांनी उत्साह व्यक्त करत हे गाणे लवकरच प्रदर्शित होणार असून, ‘रंग रास नवरात्रोत्सवा’च्या मंचावर त्यावर प्रत्यक्ष परफॉर्म करण्याचीही संधी मिळणार असल्याचे सांगितले.
नऊ दिवस रंगणार उत्सव
‘रंग रास नवरात्रोत्सव २०२६’चे आयोजन आमदार प्रवीण दरेकर आणि हायटेक इव्हेंटस यांच्या वतीने करण्यात आले आहे. महावीर कन्स्ट्रक्शन्सचे संस्थापक पिनाकिन आणि सुरभी कन्स्ट्रक्शन्सचे संस्थापक मितेश शाह हे या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत.
या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी बोरिवली पश्चिम येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रवीण दरेकर, माजी खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार संजय उपाध्याय उपस्थित होते.
गरब्याचा पारंपरिक ठेका आणि एआय तंत्रज्ञानाची नवी झलक यामुळे यंदाची मुंबईतील नवरात्री खास ठरण्याची शक्यता आहे. भूमी त्रिवेदींच्या गाण्यावर गरबाप्रेमी किती जोशात थिरकणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read About : Jamie Lee Curtis – आईच्या 22 व्या स्मृतिदिनी जेनेट ले यांची आठवण
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.