Ad Advertisement Ad Advertisement

Engineer Robbed in CSN – तुझ्याकडे ड्रग्स आहे म्हणत चाकूच्या धाकावर अभियंत्याला लुटले!

आधी बळजबरी लिफ्ट देण्याचा प्रयत्न, नंतर सिडको ते आकाशवाणीपर्यंत पाठलाग करून हिसकावला मोबाइल

छत्रपती संभाजीनगर : Engineer Robbed in CSN आधी बळजबरी लिफ्ट देण्याचा प्रयत्न केला. नकार दिल्यावर लुटारूने सिडको ते आकाशवाणी चौक, असा पाठलाग करून दुचाकीस्वार अभियंत्याला चाकूच्या धाकावर लुटले. ड्रग्जच्या बहाण्याने खिसे, बॅगची तपासणी केल्यावर काहीस न मिळाल्याने मोबाइल घेऊन ऑनलाइन बॅलन्स तपासला. त्यातही काहीच नसल्याचे समजताच चाकूच्या धाकावर मोबाइल हिसकावून त्याने पोबारा केला. ३ ऑक्टोबरच्या मध्यरात्री १ वाजता हा प्रकार घडला. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

केतन बंडू शिंदे (वय ३६, रा. यवती, ता. रिसोड, ह.मु. सिडको महानगर-१, तिसगाव), हे फिर्यादी आहेत. ते लिंबेजळगाव येथील एका कंपनीत वरिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहेत. २ ऑक्टोबरला पहाटे साडेचार वाजता केतन हे मूळ गावी गेले. जाताना त्यांनी सिडको बसस्थानकात दुचाकी उभी केली होती. तेथील काम आटोपून मध्यरात्री १२ वाजता ते शहरात परतले. ट्रॅव्हल्सने येऊन नाईक कॉलेजसमोर उतले. तेथून पायी सिडको बसस्थानकाकडे दुचाकी आणण्यासाठी निघाले. जातानाच लुटारूने त्यांना लिफ्ट पाहिजे का?, असे म्हणून बळजबरी दुचाकीवर बसविण्याचा प्रयत्न केला. मात्र, केतनने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. ते सरळ पायी दुचाकीकडे गेले. तेथून दुचाकीने (एमएच २० ईझेड ६८१२) घरी जात असताना मध्यरात्री १२.२० वाजेच्या सुमारास आकाशवाणी चौकातील सिग्नलजवळ त्यांची दुचाकी अचानक बंद पडली. तेव्हा लिफ्ट देणारा तोच लुटारू तेथे आला. तुझ्याकडे ड्रग्स आहेत, तुझी झडती घ्यायची आहे, असा दम देत त्याने केतनचे खिसे आणि बॅगची झडती घेतली, मात्र त्यात काहीच मिळाले नाही.

ऑनलाइन बॅलन्स तपासले अन् चाकू काढला

ड्रग्जच्या बहाण्याने झडती घेतल्यावर काहीच न मिळाल्याने लुटारूने केतन यांच्या मोबाइलमध्ये फोन पे वर ऑनलाइन बॅलन्स तपासला. त्यात ९५० रुपये असल्याचे पाहून त्याने थेट मोबाइलच मागितला. केतनने नकार देताच लुटारूने खिशातून चाकू काढला. चाकूचा धाक दाखवून त्याने २७ हजार ५०० रुपयांचा मोबाईल हिसकावला. त्यानंतर तो भामटा मोबाईल घेऊन अंधारात पसार झाला.

Read About : SBI ATM Theft : देवघरमध्ये गॅस कटरने एटीएम कापून पळविले
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.