Ad Advertisement Ad Advertisement

Rare Two-Headed Snake : गुजरातमध्ये दोन तोंडे, चार डोळ्यांचा दुर्मिळ साप आढळला

दाहोदमधील अगसवाणी गावात वुल्फ स्नेकचे पिल्लू आढळले; वन विभागाच्या देखरेखीखाली सुरक्षित

दाहोद : Rare Two-Headed Snake गुजरातच्या दाहोद जिल्ह्यातील धानपूर तालुक्यात असलेल्या अगसवाणी गावातील एका शेतात दोन तोंडे आणि चार डोळे असलेला एक अत्यंत दुर्मिळ साप स्थानिक नागरिकांना आढळून आला आहे. ही घटना समोर आल्यानंतर सोशल मीडियावर या सापाचे व्हिडिओ आणि फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत. वन्यजीव रक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, हा साप बिनविषारी वुल्फ स्नेक प्रजातीचा आहे. हा साप अवघ्या ६ इंच लांबीचे एक लहान पिल्लू आहे. या सापाची शारीरिक रचना अतिशय वेगळी असून त्याला दोन स्वतंत्र तोंड आणि चार डोळे आहेत, तर मानेच्या खालचा संपूर्ण शरीराचा भाग एकच आहे.

वन विभागाच्या देखरेखीखाली सुरक्षित

शेतकऱ्याला हा अनोखा साप दिसल्यानंतर त्यांनी स्थानिक वन्यजीव संस्थेला याची माहिती दिली. त्यानंतर ‘दाहोद प्रकृति मित्र मंडल’ आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत या सापाला सुखरूप रेस्क्यू केले. सध्या या सापाला वन विभागाच्या देखरेखीखाली सुरक्षित ठिकाणी निरीक्षणासाठी ठेवण्यात आले आहे.

वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, शास्त्रीय भाषेत या दुर्मिळ अवस्थेला बायसेफली किंवा पॉलिसेफली असे म्हटले जाते. गर्भधारणेदरम्यान जेव्हा जुळे भ्रूण पूर्णपणे वेगळे होऊ शकत नाहीत, तेव्हा अशी अनुवंशिक विकृती निर्माण होते. साधारणपणे लाखो सापांमध्ये एखाद्याच जीवात असा प्रकार पाहायला मिळतो.

गुजरात राज्यातील ही पहिलीच घटना

दोन तोंडांचा जिवंत ‘वुल्फ स्नेक’ आढळण्याची गुजरात राज्यातील ही पहिलीच घटना आहे. तर संपूर्ण भारताचा विचार केला असता, अशा दुर्मिळ सापाची देशातील ही केवळ ५ वी नोंद मानली जात आहे. या सापाचे दोन्ही मेंदू स्वतंत्रपणे काम करत असून, त्याच्या या अनोख्या रचनेमुळे हा साप देशभरात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.

Read About : Normal Pressure Hydrocephalus : नॉर्मल प्रेशर हायड्रोसेफॅलसचा आजार जेष्ठांमध्ये वाढता
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.