Ad Advertisement Ad Advertisement

Normal Pressure Hydrocephalus : नॉर्मल प्रेशर हायड्रोसेफॅलसचा आजार जेष्ठांमध्ये वाढता

Normal Pressure Hydrocephalus मुंबई : आजच्या धकाधकीच्या आयुष्यात नॉर्मल प्रेशर हायड्रोसेफॅलस (Normal Pressure Hydrocephalus) रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. हा विकार ज्येष्ठ नागरिकांमध्ये आढळून येतो. या विकाराच्या लक्षणांमध्ये चालताना अडखळणे, कमी स्मरणशक्ती आणि लघवीमध्ये व्यत्यय यांचा प्रामुख्याने समावेश आहे. ज्येष्ठांमध्ये वयोमानानुसार ही सर्व लक्षणे साधारणपणे दिसून येतात. वार्धक्यामुळे अनेकांना चालण्यास अडचणी येतात कारण त्यांना गुडघे अथवा पाठदुखी सुरू झालेली असते. याचबरोबर लघवीवरील नियंत्रण कमी होण्याची समस्या ज्येष्ठांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्यामुळे केवळ लक्षणांच्या आधारे याचे निदान करणे अवघड ठरते. ही तिन्ही लक्षणे असल्यास डॉक्टर निदान करू शकतात. परंतु, काही रुग्णांमध्ये केवळ एकच लक्षण दिसून येते. अनेकवेळा या विकाराचे पार्किन्सन्स किंवा अल्झायमर म्हणून चुकीचे निदान केले जाते. त्यामुळे सीटी स्कॅन किंवा मेंदूचा एमआरआय करून योग्य निदान करता येते.

(Normal Pressure Hydrocephalus) नॉर्मल प्रेशर हायड्रोसेफॅलस हा विकार सेरेब्रोस्पायनल फ्लुईडशी निगडित असतो. सेरेब्रोस्पायनल फ्लुईड हे मेंदू आणि मणक्याच्या भोवती आवरणासारखे असते. मेंदू आणि मणक्याचे संरक्षण करण्यासोबत या अवयवांसाठी पोषणद्रव्यांचे वहन आणि कचरा बाहेर टाकण्याचे काम हा द्रवपदार्थ करतो. सर्वसाधारणपणे हा द्रवपदार्थ डोक्यातील मोठ्या शिरांमध्ये शोषला जातो. एखाद्या व्यक्तीला हा विकार असल्यास ही क्रिया घडत नाही. अशा रुग्णांमध्ये वयोमानानुसार, या द्रवाच्या वहनामध्ये अडथळा निर्माण होतो. ते एकाच ठिकाणी साचले जाते. हे घडण्यामागील नेमके कारण अद्याप संशोधकांना शोधता आलेले नाही. मानवी डोके हे एखाद्या खोक्यासारखे असते. त्यामुळे त्यात हे द्रव साचून राहिल्यास दबाव वाढत जातो. हा दबाव वाढण्याची प्रक्रिया संथपणे सुरू असते आणि त्यामुळेच या विकाराला नॉर्मल प्रेशर हायड्रोसेफॅलस म्हणतात.

उपचारासाठी शस्त्रक्रियेचा पर्याय

मेंदूत साचलेले अतिरिक्त सेरेब्रोस्पायनल फ्लुईड कमी करून दबाव कमी करण्यासाठी शस्त्रक्रियेचा पर्याय असतो. त्यात डोक्याच्या कवटीला छिद्र पाडून त्यातून एक नलिका आतमध्ये टाकली जाते. या नलिकेच्या माध्यमातून मेंदूतील अतिरिक्त द्रवपदार्थ शरीरातील इतर अवयवांकडे वळविला जातो. प्रामुख्याने उदरात हा द्रवपदार्थ नलिकेच्या माध्यमातून पाठविला जातो. तिथे तो शोषला जातो. कारण द्रवपदार्थ बनण्याची प्रक्रिया कायम सुरू असते. त्यामुळे त्याचे प्रमाण नियंत्रित राहण्यासाठी दुसरीकडे तो शोषला जाण्याची प्रक्रियाही कायम सुरू ठेवावी लागते.

शस्त्रक्रियेनंतर रुग्णामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा दिसून येते. त्याला होणारा त्रासही कमी होतो. मात्र, स्मरणशक्ती सुधारण्याची प्रक्रिया ही संथपणे होते. त्यामुळे ती पूर्वपदावर येण्यास खूप कालावधी लागतो. या विकाराच्या निदानास जेवढा उशीर तेवढी लक्षणे अधिक तीव्र होतात. तीव्र लक्षणे असल्यास रुग्ण पुन्हा पूर्वीसारखा होण्यास कालावधीही अधिक लागतो. यासाठी काही महिने अथवा काही वर्षेही लागू शकतात.

Read About : Mobile Phone Radiation : उशीखाली मोबाईल ठेवून झोपणे घातक
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.