Banganga Lake Fish Deaths : मुंबईतील बाणगंगा तलावात पितृपक्षातील विधींनंतर हजारो मासे मृत्युमुखी पडण्याची घटना ही केवळ एका तलावाच्या प्रदूषणाची कथा नाही. कारण या घटनेने गेल्या काही वर्षांपासून याच काळात ऐरणीवर येणाऱ्या एका गंभीर चिंतनाचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. पितृ पंधरवड्याच्या निमित्ताने बाणगंगा तलावाकाठी होणाऱ्या काही धार्मिक विधींमागे श्रद्धेचा भाग आहे यात शंका नाही. अशा पवित्र स्थळी पूर्वजांचे स्मरण करण्याच्या संस्काराची परंपरा पुढे सुरू ठेवण्याकरिता श्रद्धेने केलेल्या धार्मिक विधींचे पर्यावरणीय परिणाम किती गंभीर असू शकतात, याचा अस्वस्थ करणारा एक आरसा मात्र या निमित्ताने पुन्हा एकदा समाजास दाखविला गेला आहे. पितृपक्षाच्या काळात बाणगंगेच्या पाण्यात होणारे बदल, पाण्यातील जैविक भार वाढणे आणि मोठ्या प्रमाणावर मासे मृत्युमुखी पडणे हा प्रकार वारंवार दिसून येतो, त्यामुळे दरवर्षी दुर्घटना घडल्यावर धावपळ करून तात्पुरती मलमपट्टी करण्याऐवजी श्रद्धा आणि विज्ञान यांची सांगड घालून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची वेळ आली आहे; हाच या निमित्ताने पुढे आलेला चिंतनाचा गंभीर मुद्दा असल्याने या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावयास हवी.
मुंबईतील बाणगंगा तलाव हा केवळ पाण्याचा साठा नाही. मुंबईच्या इतिहासाशी, धार्मिक परंपरेशी आणि सांस्कृतिक स्मृतीशी जोडलेला हा महत्त्वाचा वारसा आहे, त्यामुळे या तलावाच्या साक्षीने पार पाडल्या जाणाऱ्या परंपरा थांबविणे हा उपाय व्यवहार्य नाही आणि आवश्यकही नाही. पण, त्या परंपरा पर्यावरणाचा तोल बिघडवण्यास कारणीभूत ठरत असतील तर त्यांचे पालन करण्याच्या प्रथांचा पुनर्विचार करणे गरजेचे आहे. लोकसंख्या मर्यादित होती, जलस्रोतांवरील ताण कमी होता आणि विधींमध्ये वापरल्या जाणाऱ्या सामग्रीचे प्रमाणही आजच्या तुलनेत नगण्य होते, तेव्हा परंपरांनी पर्यावरणाचे प्रश्न निर्माण केले नव्हते. आज मात्र वेगाने विकसित होणाऱ्या नागरी भागातील वाढती लोकसंख्या, धार्मिक कार्यक्रमांचे व्यापारीकरण, मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे साहित्य आणि मर्यादित जलस्रोत, यामुळे बदललेल्या परिस्थितीत परंपरेची पर्यावरणपूरक पुनर्रचना करणे हीच खरी परंपरानिष्ठ भूमिका ठरते. बाणगंगा तलावातील हजारो माशांच्या मृत्यूने याची गरज अधोरेखित केली आहे.
पितृपक्षातील विधींमध्ये जलाशयात श्रद्धेने अर्पण केलेल्या पदार्थांचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग झाला, तर पाण्यात वाढणाऱ्या सेंद्रिय पदार्थांचे विघटन करण्यासाठी पाण्यातील सूक्ष्म जीवांना ऑक्सिजनचा अतिरिक्त वापर करावा लागतो, त्यामुळे जलचरांना जगण्यासाठी आवश्यक असलेल्या प्राणवायूची कमतरता निर्माण होऊन जलचरांच्या जिवावर बेतू शकते, हेच बाणगंगा तलावातील या घटनेने दाखवून दिले आहे. याशिवाय पाण्याच्या गुणवत्तेत बदल, विसर्जित होणारे पदार्थ कुजल्याने दूषित घटकांचे वाढते प्रमाण आणि इतर रासायनिक-जैविक प्रक्रिया यांचा परिणाम जलचरांवर होऊ शकतो. गेल्या वर्षीदेखील बाणगंगेतून तीन दिवसांत टनावारी मृत मासे, फुलांचे अवशेष आणि अन्य सेंद्रिय कचरा काढावा लागला होता. त्या वेळीही पाण्यातील प्राणवायूची पातळी घटल्याचे आणि जैविक प्रदूषण वाढल्याचे निदर्शनास आले होते. यंदाही त्याचीच पुनरावृत्ती झाली आहे, त्यामुळे श्रद्धा आणि विज्ञान यांच्यातील संघर्ष टाळून तोडगा काढण्यासाठी संवादातून समन्वय साधावा लागेल. धार्मिक भावना दुखावणारे आदेश, उपदेश किंवा कोणत्याही कायदेशीर कारवायांतून अशा समस्या सुटत नसतात. त्याऐवजी धार्मिक संस्था, प्रशासन, पर्यावरणतज्ज्ञ, वारसा संवर्धन संस्था यांनी एकत्र येऊन पर्यावरणपूरक तोडगा काढणारी परंपरा प्रस्थापित करण्यावर भर द्यावयास हवा.
बाणगंगेचा प्रश्न आणखी एका व्यापक वास्तवाकडे लक्ष वेधतो. भारतातील असंख्य नद्या, तलाव, विहिरी आणि समुद्रकिनारे धार्मिक विधींच्या विविध स्वरूपांमुळे प्रदूषित होतात. गणेशोत्सवातील मूर्ती विसर्जन, पूजा साहित्याचा विसर्ग, धार्मिक मेळ्यांतील कचरा, नदीकाठावरील विधी अशा बाबी म्हणजे श्रद्धा आणि विज्ञान व पर्यावरण यांच्यातील संघर्ष नाही, तर व्यवस्थापनातील त्रुटी हे त्याचे महत्त्वाचे कारण आहे. श्रद्धा हा सामाजिक संवेदनशीलतेचा मुद्दा असल्याने समाजास सहभागी करूनच पर्यावरणीय व्यवस्थापनाचा नवा पायंडा पाडला तर ही समस्या सुटू शकेल. बाणगंगेतील प्रदूषणाने तीच गरज पुन्हा एकदा ऐरणीवर आणली आहे. अन्यथा, आपल्या प्रिय पूर्वजांचे स्मरण करण्याच्या पवित्र भावनेपोटी हजारो जीवांना आपल्या अस्तित्वाची किंमत मोजावी लागत असेल, तर ती समाजाच्या संवेदनशीलतेला घातलेली करूण साद ठरेल, त्याला प्रतिसाद द्यायला हवा.
बाणगंगेतील मृत मासे केवळ पर्यावरणीय इशारा नाही, तो आपल्या धार्मिक आचरणासमोर उभा राहिलेला एक नैतिक प्रश्न आहे. आपल्या श्रद्धेमुळे एखाद्या जलस्रोताचा जीव धोक्यात येत असेल, तर त्या श्रद्धेच्या अभिव्यक्तीची पद्धत बदलण्याची जबाबदारी ओळखावी लागेल. विज्ञान श्रद्धेचा शत्रू नाही आणि श्रद्धा विज्ञानाची विरोधक नाही. परंपरेशी संबंधित असलेल्या बाबी जशाच्या तशा पुढे सुरू ठेवणे म्हणजे वारसा वाचविणे नव्हे. सामाजिक मूल्ये, संस्कार आणि स्मृतींचे आदरपूर्वक जतन करणे हेच वारशाचे जतन ठरते. काळानुसार परंपरा, रीती बदलत असल्या तरी श्रद्धेचा गाभा कायम ठेवून परिवर्तनाचा प्रयोग केला तर परंपरांचे पावित्र्य कायम राखून प्रत्येक जीवाच्या जगण्याच्या हक्काचेही संरक्षण करावेच लागेल, त्यामुळे श्रद्धा जपायची असेल तर जलस्रोतही जपावे लागतील. पितरांचे स्मरण करताना पाण्याचा जीव घेणे ही श्रद्धेची अपरिहार्यता नाही. उलट, पाणी जिवंत ठेवणे हाच कदाचित पुढच्या पिढीला देता येईल असा सर्वांत मोठा सांस्कृतिक वारसा आहे.
Read About : Chukchi People : चुकची लोक
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.