Ad Advertisement Ad Advertisement

AI Crime Planning – हत्येचा कट रचण्यासाठी आयटी इंजिनिअरने एआयला विचारले प्रश्न; फॉरेन्सिक तपासात धक्कादायक खुलासे

बंगळुरू तिहेरी हत्याकांडात आरोपीने AI आणि Google Search वरून गुन्ह्याची तयारी केल्याचा पोलिसांचा दावा; ५२ लाखांच्या कर्जाच्या वादातून हत्याकांड

बंगळुरू : AI Crime Planning कर्जाच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या करणाऱ्या आयटी इंजिनिअरने या गुन्ह्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि गुगल सर्चचा वापर केल्याची थरारक माहिती समोर आली आहे. बंगळुरूच्या कृष्णराजपुरा परिसरातील सीगेहल्ली येथे जून महिन्यात हे तिहेरी हत्याकांड घडले होते. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीने आरोपी जे. केनेथ (वय २५) याच्या लॅपटॉपची सर्च हिस्ट्री’ तपासली असता, हत्येचे क्रूर नियोजन उघडकीस आले.

एआय कडे विचारले गुन्ह्याचे मार्ग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी केनेथने हत्येपूर्वी गुगल आणि वेगवेगळ्या एआय साधनांवर अत्यंत भयानक गोष्टी सर्च केल्या होत्या. यामध्ये

स्वयंपाकघरातील चाकूने माणसावर प्राणघातक वार कसे करावेत?

व्हिनेगर, मिरची पावडर आणि मिरचीच्या पेस्टचे मिश्रण वापरून समोरील व्यक्तीला तात्पुरते अंध कसे करावे?

एकाच वेळी तीन लोकांचे गुडघे कसे तोडावे किंवा त्यांना निकामी कसे करावे?

घरात घुसलेल्या तीन व्यक्तींना एका निर्जन ठिकाणी कसे संपवावे?

केनेथने गुन्ह्यासाठी लागणाऱ्या शस्त्रांची आणि विषारी मिश्रणाची माहिती गोळा केली होती. पोलिसांनी घटनास्थळावरून मिरची पावडर आणि व्हिनेगर एकत्र केलेली एक बाटलीही जप्त केली असून, आरोपीने एआयच्या सल्ल्यानुसारच ही तयारी केल्याचे स्पष्ट झाले आहे.

५२ लाखांचे कर्ज ठरले हत्येचे कारण

या भीषण हत्याकांडामागे पैशांचा मोठा व्यवहार होता. आरोपी केनेथची लिव्ह-इन पार्टनर श्वेता (ही देखील आयटी प्रोफेशनल आहे) हिच्या नावाने केनेथने बँका आणि नातेवाईकांकडून तब्बल ५२ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. केनेथने हे पैसे न फेडल्यामुळे श्वेताच्या कुटुंबियांना बँकेच्या नोटिसा येत होत्या.

२२ जूनच्या रात्री श्वेताचे वडील सोमसुंदर (५५) यांनी केनेथला या पैशांचा हिशोब विचारला आणि जाब मागितला. याच रागातून केनेथने घरात घुसून वाद घातला आणि जवळ आणलेल्या धारदार चाकूने श्वेताचे वडील सोमसुंदर, आई मुथुलक्ष्मी (५०) आणि बहीण सुप्रिया (२०) यांच्यावर सपासप वार केले. या जीवघेण्या हल्ल्यात तिघांचाही जागीच मृत्यू झाला होता. डिजिटल पुराव्यांच्या आधारे पोलीस आता न्यायालयात भक्कम बाजू मांडण्याची तयारी करत आहेत.

Read About : Triple Murder 2026 : देहरादूनमध्ये भरदिवसा तिहेरी हत्याकांड; वृद्ध दांपत्यासह मोलकरणीची हत्या
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.