Ad Advertisement Ad Advertisement

AI Revolution : ‘एआय’ क्रांतीचे वास्तव!!

AI Revolution : लाकूडतोड्याला झाडे कापण्यासाठी इलेक्ट्रिक करवत मिळाली. त्याला प्रचंड भीती वाटली अन् त्याच्या मनात दहशत निर्माण झाली की, नवीन करवत त्याचे काम संपवेल. मात्र मालकाने त्याला समजावले, ‘ही करवत तुझे काम संपविण्यासाठी नाही तर तुझा थकवा कमी करून तुझी कार्यक्षमता वाढविण्यासाठी आहे.’ लाकूडतोड्या तिचा योग्य वापर करू लागला आणि दुप्पट वेगाने, न थकता काम करू लागला. अर्थात तंत्रज्ञानामुळे मानवी श्रम नष्ट होत नाहीत, तर ते माणसाची क्षमता वाढविणारे एक शक्तिशाली साधन ठरते. जगात आजपर्यंत आलेल्या नवनव्या तंत्रज्ञानाने मानवी जीवन सुखकरच केले आहे.

लोकांनीही त्याचा स्वीकारच केला आहे. परंतु जगाच्या पाठीवर कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयची जेवढी चर्चा रंगताना दिसत आहे, ही चर्चा बघून निश्चितच निष्कर्षापर्यंत पोहोचता येत नाही, कारण एआयच्या दहशतीने पर्यावरण, नोकरी, रोजगार, शिक्षण, उद्योग, व्यापार, श्रम आणि मानवी हितसंबंधांना धोका पोहोचण्याचा अंदाज बांधला जात आहे. मात्र ही दहशत कायम राहणार काय? ही केवळ मनातील भीती आहे आणि वास्तव वेगळेच आहे? एआयने अशा अनेक प्रश्नांना जन्म दिला आहे. लाखो नोकऱ्या जातील, मानवी श्रम निरुपयोगी ठरेल आणि बेरोजगारीची नवी लाट येईल, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. परंतु नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ दारॉन ॲसेमोग्लू यांनी या भीतीला पूर्णविराम दिला आहे. पुढील १० वर्षांत एआयमुळे केवळ पाच टक्के मानवी कामे बदलतील किंवा विस्थापित होणार आहेत. त्याच्या अतिरंजित प्रभावापेक्षा त्याची खरी क्षमता माणसांची जागा घेण्यात नाही तर मानवी कार्यक्षमता वाढविण्यात आहे.

अर्थशास्त्रज्ञ ॲसेमोग्लू यांनी निदर्शनास आणून दिले की, सध्या ५२ टक्के अमेरिकन नागरिक एआयमुळे नोकरी जाण्याच्या भीतीने चिंताग्रस्त आहेत. मात्र ही भीती अतिरंजित आहे. मानवी समाजात तंत्रज्ञानाबद्दलचा हा प्रकार नवीन नाही. परंतु या अवास्तव भीतीमुळे एआयच्या विकासाच्या नैसर्गिक आणि सकारात्मक दिशेवर नाहक परिणाम पडत आहे. ‘मायक्रोसॉफ्ट एआय’चे सीईओ मुस्तफा सुलेमान यांनी ‘एक्स’वर ‘द ह्युमॅनिस्ट रिव्ह्यू’चा पहिला अंक सादर करताना ॲसेमोग्लू यांच्या महत्त्वाच्या भाष्याचा उल्लेख केला आहे. अनेक तंत्रज्ञानप्रेमींकडून दावा केला जातो की, एआयमुळे जागतिक अर्थव्यवस्थेत तत्काळ क्रांती घडणार आहे. परंतु ॲसेमोग्लू यांच्या मते ही प्रक्रिया संथ राहणार आहे. आगामी १० वर्षांत जागतिक जीडीपीमध्ये एआयमुळे केवळ दीड टक्के भर पडणार आहे.

सध्याच्या वास्तवाचा विचार केल्यास, ज्या बहुतांश कंपन्यांनी या तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे, त्यांना अद्याप कोणताही मोठा आर्थिक फायदा झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे एआयचा अर्थव्यवस्थेवरील प्रभाव संथगतीनेच दिसणार आहे. तंत्रज्ञान स्वीकारण्याच्या या संथ गतीचे स्पष्टीकरण देताना ॲसेमोग्लू यांनी विजेच्या शोधाचे ऐतिहासिक उदाहरण दिले आहे. सन १८८१ मध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क आणि इंग्लंडची राजधानी लंडनमध्ये पहिले वीजनिर्मिती केंद्र सुरू झाले. मात्र प्रत्यक्ष औद्योगिक वापर आणि घरात वीज पोहोचण्यासाठी पुढचा ४० वर्षांचा काळ लोटला. एआयचा अवलंब करण्यासाठी जगभरातील कंपन्यांना आपल्या पायाभूत सुविधा, कामाची पद्धत आणि व्यावसायिक मॉडेल्समध्ये मूलभूत परिवर्तन करावे लागणार आहेत.

पर्यायाने विजेच्या वापराप्रमाणेच एआयचे नागरी आणि सामाजिकीकरणही पुढचे ५० वर्षे होणार नाही? हा केवळ अंदाज आहे. त्यामुळे निष्कर्षापर्यंत पोहोचता येणार नाही. अर्थात ॲसेमोग्लू यांचे विचार आशादायी आणि दिलासा देणार असले तरी भविष्यात त्याचा धोका पोहोचणार नाही काय? लाकूडतोडीमुळे पर्यावरणाचे नुकसान झाले. आज हवामान बदलाचा परिणाम जगावर दिसतो आहे. एआयमुळेही पर्यावरणाला नुकसानच होणार आहे. एआय आभासी वाटत असले तरी भौतिक आणि पायाभूत सुविधांचा ताण पृथ्वीवर पडणार नाही काय? वीज-पाणी कुठून येणार? कार्बन उत्सर्जन, ई-कचरा, खाणकाम वाढणार नाही काय?

काळाच्या ओघात एआय टूल्स प्रगत झाले तरी मानवी मेंदूची जागा घेऊ शकत नाही, हेच सत्य आहे. एखादी एआय यंत्रणा ९९ टक्के अचूक असली तरी शिल्लक एक टक्के भाग हाताळणे कठीण राहणार आहे. औद्योगिक किंवा वैद्यकीय क्षेत्रासारख्या ठिकाणी एक टक्के चुकीची किंमत मोठी असू शकते. त्यामुळे मानव समूहाला पूर्णत: बाजूला करण्याचे स्वप्नरंजन करण्याऐवजी माणसांच्या कामाचा वेग आणि दर्जा सुधारणाऱ्या ‘प्रो-वर्कर एआय’ टूल्सची निर्मिती आवश्यक वाटते. ॲसेमोग्लू यांनी केवळ तांत्रिक बाजूंवरच नव्हे, तर आर्थिक धोरणांमधील त्रुटींवरही बोट ठेवले आहे. अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रांत श्रमावर २५ टक्क्यांपेक्षा अधिक कर आकारला जातो, तर भांडवलावर शून्य कर आहे. या कररचनेमुळे कंपन्या एआयसारख्या तंत्रज्ञानाकडे आकर्षित होतात. तसेच जगातील सात मोठ्या टेक कंपन्यांचा अमेरिकेच्या ‘नास्डॅक’ निर्देशांकात ६० टक्क्यांपेक्षा अधिक वाटा आहे.

या अफाट मक्तेदारीमुळे बाजारातील नवीन कल्पना, प्रयोग आणि नवीन स्टार्टअप्स दाबले जाण्याचा धोका आहे. तंत्रज्ञानातील असुरक्षा, फसवणूक आणि अशांतता आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. मात्र एआयमुळे रोजगार-नोकऱ्या संपुष्टात येतील, ही भीती काल्पनिक असेल काय? एआय हे माणसांच्या श्रमाला पर्याय असू शकत नाही, कारण तंत्रज्ञानाच्या वापरातूनच श्रमाला नवी प्रतिष्ठा मिळत असते. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करताना वास्तविकतेला सक्षम करण्याचा दृष्टिकोन असला तरच एआय क्रांतीचा खरा फायदा मानवी समाजासह जागतिक अर्थव्यवस्थेला मिळू शकेल.

Read About : left brain right brain myth – उजवा मेंदू सर्जनशील, डावा तर्कशील हा समज किती खरा?
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.