Nana Patekar – नियतीच्या मनात काय दडलेले असते हे सांगता येत नाही; आयुष्याच्या वाटेवर चित्रविचित्र अनुभव पदोपदी भेटत असतात. असाच एक काळजाचा ठोका चुकवणारा आणि मन विदीर्ण करणारा अनुभव (Nana Patekar) नाना पाटेकर यांच्या अकाली जाण्याच्या कल्पनेनेच अंगावर काटा आणतो. जो माणूस वयाच्या पंचाहत्तरव्या वर्षीसुद्धा तितकाच फिट अँड फाईन असतो, मित्रांच्या-परिचितांच्या पोटाला मायेने चिमटे काढत,’काय रे तुम्ही, जरा व्यायाम करा..’ म्हणून पाठीवर मायेचा हात फिरवतो, त्याच्याविषयी ‘तो होता…’ असं म्हणण्याची वेळ येणे हा खरोखरच एक दुर्दैवी विचार आहे.
अगदी काल-परवापर्यंत नाना मनोहर पर्रीकर यांच्या निधनावर बोलताना सहज म्हणाले होते,’आपल्या सगळ्यांनाच एक दिवस जायचंय, मीही जाईन… पण जाताना या समाजासाठी काहीतरी ठोस करून जायला हवं.’ त्यांच्या या शब्दांत एका संवेदनशील माणसाचं तळमळणारं काळीज स्पष्ट दिसत होतं.
कोकणातल्या मुरुडच्या एका अत्यंत साध्या घरात जन्मलेला विश्वनाथ पाटेकर नावाचा मुलगा… हातात काहीही नसताना, फक्त जिद्द आणि अथांग संघर्षाच्या जोरावर त्याने चित्रपटसृष्टीत स्वत:चं एक अढळ साम्राज्य उभं केलं. पण या ग्लॅमरच्या खूप आधीपासून नानाचा खरा संघर्ष सुरू झाला होता. मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचा विद्यार्थी, हाताक्षरात सौंदर्य जपणारा एक उत्कृष्ट सुलेखनकार, आणि मराठी साहित्याचं दांडगं वाचन असलेला हा अवलिया तरुण रंगमंचावर काम मिळावं म्हणून धडपडत होता.
विजय तेंडुलकरांचं ‘पाहिजे जातीचे’ हे नाटक जेव्हा सुलभा आणि अरविंद देशपांडे यांनी बसवायला घेतलं, तेव्हा त्यातल्या ‘बबन्या’ या गावरान पात्राचं नानाने सोनं केलं. या एका भूमिकेने व्यावसायिक रंगभूमीचे दरवाजे त्याच्यासाठी सताड उघडे केले.
अनेक नामवंत कवींच्या कविता त्यांना मुखोद्गत असायच्या. फोनवर तास-तासभर आपल्या गर्द आवाजात कविता ऐकवण्याइतका हा माणूस मनस्वी होता. कलंदर, फटकळ आणि आतून प्रचंड हळवा… ही नानाची वेगळीच रूपं होती. त्यांनी स्वत:चा अभिनय मेहनतीने घडवला, पण त्यांच्यातील माणसाला आणि संवेदनशीलतेला खरी पैलू पाडले ते त्यांच्या अफाट वाचनाने! म्हणूनच नाना पाटेकरांबद्दल लिहिताना, त्यांच्यातल्या कसलेल्या अभिनेत्याबद्दल आधी लिहावं की समाजाचं दु:ख पाहून व्याकुळ होणाऱ्या हळव्या माणसाद्दल, हा प्रश्न पडतो.
चित्रपटातल्या यशाची शिखरं गाठणाऱ्या नानाचा प्रवास हा मराठी रंगभूमीच्या मुशीत घडला होता. नटसम्राटच्या शूटिंगदरम्यान नेपथ्यकार एकनाथ कदम यांनी उभारलेला एलफिन्स्टन रोडचा हुबेहूब सेट पाहून भारावलेल्या नानाने ज्या आपुलकीने त्यांची पाठ थोपटली होती, त्यावरून रंगभूमीविषयीचं त्यांचं प्रेम दिसून येतं. ‘हमीदाबाईची कोठी’, ‘महासागर’, ‘पुरुष’ या नाटकांमुळे नानांमधील अभिनेत्याचं नाणं खणखणीत वाजलं.
कॅमेऱ्यासमोर उभे राहिल्यावर त्यांना मोठ्या हालचालींची गरजच पडायची नाही. संवादाच्या मधली एखादी शांतता, ओठांचा किंचित थरथरणारा कोपरा किंवा डोळ्यांतला एक कटाक्ष… एवढ्यातच ते तो सीन आपलसा करायचे. विजयाबाईंसारख्या दिग्गजांच्या तालमीत घडलेल्या या नटाचा अभिनय प्रेक्षकांना पूर्णपणे कचाट्यात पकडायचा.
‘गमन’ पासून सुरू झालेला हा प्रवास ‘अंकुश’, ‘प्रतिघात’, ‘सलाम बॉम्बे’ करत ‘परिंदा’मधील ‘अण्णा’पर्यंत पोहोचला आणि त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ‘क्रांतिवीर’मधला ‘आ गए मेरी मौत का तमाशा देखने…’ हा कडाडणारा आवाज असो, ‘यशवंत’मधला ‘एक मच्छर…’ असो, ‘अब तक छप्पन’मधला ताठर साधू आगाशे असो, किंवा ‘खामोशी’तल्या मूक-बधिर बापाची फक्त डोळ्यांनी बोलणारी भूमिका… प्रत्येक रूपात नाना वेगळेच जगले. आजच्या पिढीला ‘प्रहार’ कदाचित ठाऊक नसेल, पण ‘वेलकम’मधला ‘कंट्रोल उदय…’ म्हणणारा नाना नव्या पिढीच्या मीम्समध्येही राज्य करतोय.
पण नानांच्या कारकिर्दीचा खरा कळस होता तो म्हणजे ‘नटसम्राट’ मधला गणपतराव बेलवलकर. ‘कुणी घर देता का घर?’ अशी कातर हाक जेव्हा त्यांच्या आवाजातून उमटली, तेव्हा ती देशातल्या हजारो उपेक्षित ज्येष्ठांच्या आयुष्यातील सांजपर्वाची आर्त हाक बनली.
पडद्यावरचा हा सक्षम अभिनेता खऱ्या आयुष्यात कमालीचा भावूक आणि हळवा होता. २०१५ मध्ये जेव्हा महाराष्ट्र भयानक दुष्काळाने होरपळत होता आणि शेतकरी आत्महत्या करत होते, तेव्हा नाना गप्प बसू शकले नाहीत. मकरंद अनासपुरे यांच्यासोबत त्यांनी ‘नाम फाउंडेशन’ उभी केली. स्वत:च्या पुरस्कारांची रक्कम, गाडी घेण्यासाठी साठवलेले पैसे त्यांनी शेतकरी कुटुंबांच्या झोळीत टाकले. विदर्भ-मराठवाड्यात २,१०० हून अधिक गावांमध्ये पाण्याचे बंधारे बांधले, नद्या खोल केल्या, शहीद जवानांच्या कुटुंबांना आधार दिला. एका अभिनेत्याने समाजाचं देणं कसं फेडायचं असतं, याचा वस्तुपाठच त्यांनी घालून दिला.
नाना पाटेकर ( Nana Patekar) हे फक्त एक नाव किंवा अभिनेता नाहीत; तर तो संघर्षातून निर्माण झालेला एक जिताजागता निखारा आणि तरीही आतून तितकाच शांत, शीतल वाहणारा पाझर होता!
Read Also: Nana Patekar Death : रात्री २.३० वाजता मित्राला मेसेज; पहाटे घरात बेशुद्धावस्थेत आढळले
E-Paper : Punyanagari E-Paper
Instagram: पडद्यावर आवाज होता… अन्यायाविरुद्धची आग होती… आणि पडद्याबाहेर माणुसकी होती.
Facebook:पडद्यावर आवाज होता… अन्यायाविरुद्धची आग होती… आणि पडद्याबाहेर माणुसकी होती.


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.