इन्स्टाग्रामचे एआय प्रोफाइलबाबतचे नियम कडक

माहिती लपवणाऱ्या खात्यांचा रीच होणार कमी

नवी दिल्ली : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम ने कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे तयार केलेल्या प्रोफाईल्ससाठी आपले नियम कडक केले आहेत. युजर्सची दिशाभूल रोखण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी इन्स्टाग्रामने जुने एआय क्रीएटर हे लेबल बदलून आता एआय जनरेटेड प्रोफाईल हा नवीन टॅग अनिवार्य केला आहे. जे अकाऊंट्स एआय निर्मित मानवी चेहऱ्यांचा किंवा व्यक्तींचा वापर करूनही त्याची माहिती युजर्सपासून लपवून ठेवतील, अशा खात्यांची रीच (युजर्सपर्यंत पोहोचण्याची क्षमता) इन्स्टाग्रामकडून मर्यादित केली जाणार आहे.

पारदर्शकता वाढवण्यावर भर
इन्स्टाग्रामच्या या नव्या धोरणाचा मुख्य उद्देश युजर्सना हे स्पष्ट करणे आहे की, ते ज्या प्रोफाईलशी संवाद साधत आहेत, ती एक खरी व्यक्ती आहे की एआयच्या मदतीने तयार केलेले एक आभासी पात्र आहे. आजकाल जनरेटिव्ह एआयच्या मदतीने हुबेहूब दिसणारे चेहरे, लाइफस्टाईल इन्फ्लुएंसर्स आणि डिजिटल व्यक्तिमत्त्वे तयार करणे अत्यंत सोपे झाले आहे. हे एआय चेहरे खऱ्या माणसांसारखेच युजर्सशी संवाद साधतात, ज्यामुळे अनेकदा युजर्स फसवले जातात. युजर्सकडून मिळालेल्या फीडबॅकमध्ये अनेकांनी अशा प्रोफाईल्सबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती, ज्या सुरुवातीला खऱ्या वाटतात पण नंतर त्या पूर्णपणे एआय निर्मित असल्याचे समोर येते.

माहिती लपवल्यास शिक्षा, जाहीर केल्यास सवलत
नव्या नियमांनुसार, जे एआय प्रोफाईल्स प्रामाणिकपणे नवीन लेबलचा वापर करतील, त्यांच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई किंवा रीच कमी होण्याची अडचण येणार नाही. मात्र, जे एआय प्रोफाईल्स स्वत:ला मानव म्हणून सादर करतील आणि सत्य लपवतील, त्यांची रीच इन्स्टाग्राम घटवेल. यामुळे अशी खाती इन्स्टाग्रामच्या रिकमेंडेशन पेजवर दिसणार नाहीत आणि त्यांचे फॉलोअर्स वाढणे कठीण होईल.

खऱ्या क्रिएटर्सना काळजी करण्याची गरज नाही
इन्स्टाग्रामने स्पष्ट केले आहे की, हा नियम केवळ एआय टूल्स वापरणाऱ्या खऱ्या मानवी क्रिएटर्ससाठी नाही. जर एखादी वास्तविक व्यक्ती आपले फोटो एडिट करण्यासाठी, बॅकग्राउंड बदलण्यासाठी, ग्राफिक्स तयार करण्यासाठी किंवा कॅप्शन्स सुधारण्यासाठी एआयचा वापर करत असेल, तर त्यांना हे नवीन प्रोफाईल लेबल लावण्याची अजिबात गरज नाही. हा नियम फक्त अशा खात्यांसाठी आहे ज्यांची मुख्य ओळख किंवा चेहऱ्याची संपूर्ण निर्मितीच एआय द्वारे झाली आहे.

चुकीच्या वर्गीकरणाविरोधात अपीलाची सोय
जेव्हा इन्स्टाग्रामला एखादे संशयास्पद एआय प्रोफाईल आढळेल, ज्याने ही माहिती जाहीर केलेली नाही, तेव्हा प्लॅटफॉर्म संबंधित क्रिएटरला नोटीस पाठवून लेबल जोडण्याचा पर्याय देईल. जर एखाद्या खऱ्या मानवी क्रिएटरचे अकाऊंट इन्स्टाग्रामच्या सिस्टम कडून चुकीच्या पद्धतीने फ्लॅग झाले, तर त्या क्रिएटरला या निर्णयाविरोधात अपील करण्याची पूर्ण सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.