Victor Arajs Nazi Collaborator : ५०० ते १५०० लोकांच्या मदतीने स्पेशल ‘अराज’ कमांडो या तुकडीने आधी लॅटव्हिया आणि नंतर दक्षिणेकडील बेलारूस देशात शोधून शोधून २६ हजार लोकांची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली.
आर्यन वंशाचा दुराभिमान बाळगणारा हिटलर जर्मनीत सत्ताधीश झाला आणि जर्मन सत्ता जगभर पसरवण्यासाठी त्याने १९३९ पासून दुसऱ्या महायुद्धास प्रारंभ केला. ज्यू आणि काही अन्य लोकांबद्दल असलेल्या पराकोटीच्या द्वेषातून त्यांना दुय्यम वागणूकच नाही तर पृथ्वीतलावरून नष्ट करायचे असा विडाच उचलला. सद्सद्विवेकबुद्धी जागृत असणाऱ्या कोणाचाही त्याच्या हत्याकांडांना विरोध असेल अशी आपली अपेक्षा असते.
पण, खुनशी वृत्ती आणि स्वार्थ या दोन्हींचा संगम असणाऱ्या अन्य देशातील अनेक लोकांनीही जर्मनीने आपला देश काबीज केलेला असताना हिटलरच्या नाझी फौजांना साथ देऊन आपला मतलब साधला. त्यांनीही दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ज्यू, रोमानी, जिप्सी आणि कम्युनिस्ट यांच्यावर अत्याचार केले, त्यांच्या हत्या घडवून आणल्या. व्हिक्टर अराज हा अश्या लोकांपैकीच एक.
बाल्टिक समुद्राच्या बाजूला असणाऱ्या एस्टोनिया आणि लिथुआनिया यांच्यामध्ये लॅटव्हिया हा बाल्टिक देश आहे. पूर्वी हा सोविएत रशियाचा भाग होता. त्या देशात जानेवारी-१८८८ मध्ये बाल्डोन शहरात व्हिक्टर अराजचा जन्म झाला. वडील लोहारकाम करणारे तर आई बाल्टिक जर्मन वंशातील सधन कुटुंबातील होती. त्याचे शालेय शिक्षण जेलगावा जिम्नॅशियम नावाच्या शैक्षणिक संस्थेत झाले. वयाच्या विसाव्या वर्षी म्हणजे १९३० मध्ये तो रशियन राज्यकर्त्यांच्या नियमाप्रमाणे सक्तीचे लष्करी शिक्षण घेत फौजेत सामील झाला. दोन वर्षांच्या लष्करी सेवेनंतर त्याने रिगा येथे कायद्याचा अभ्यास सुरू केला. हे शिक्षण घेत असतानाच त्याने स्थानिक पोलीस दलात नोकरी करणे सुरू केले.
या नोकरीच्या नियमांप्रमाणे त्याला राजकारणापासून दूर राहावे लागत होते. त्याचा फायदा म्हणजे तो स्थानिक कट्टर उजव्या तरीही जर्मनीविरोधी असणाऱ्या राजकारणाचा भाग बनला नाही. १९३८ साली पोलीस दलातील नोकरी सोडून त्याने पुन्हा अभ्यास सुरू केला आणि १९४१ साली तो कायद्याचा पदवीधर झाला. दरम्यान, हिटलरने आजूबाजूचे देश पादाक्रांत करण्यास धडाक्याने सुरुवात केली होती. लॅटव्हियावर जर्मन फौज चालून आली तेव्हा विरोध न करता रशियन रेड आर्मीने रिगा येथून पळ काढला.
ती संधी साधून अराज स्थानिक पोलिसांचा मुख्य बनला. लॅटव्हियात घुसलेल्या जर्मन लष्करी अधिकाऱ्यांकडे अराजचा मित्र हॅन्स ड्रेसलर दुभाष्याचे काम करत होता. त्याने जर्मन सेना कमांडर फ्रान्झ स्थलेकर याची भेट अराज बरोबर करून दिली. अराजने बोलण्यातून त्याचा विश्वास संपादन केला. आणि जर्मन फौजांना साथ देण्याचे कबूल केले. त्या बदल्यात त्याला मिळालेल्या अधिकारातून आपले मित्र आणि परिचित अश्या शंभर लोकांची त्याने भरती केली.
२ जुलै १९४१ रोजी त्याला सांगण्यात आले की, त्याने अचानक उद्भवलेली परिस्थिती वाटावी अश्या प्रकारे कत्तलींना सुरुवात करावी. स्थानिक वृत्तपत्रात स्वदेशासाठी हानीकारक तत्वांची सफाई करण्यास तयार असणाऱ्या तरुणांच्या भरतीसाठी जाहिरात देण्यात आली. मोठ्या संख्येने आलेल्या तरुणांतून काहींची नेमणूक अराजच्या हाताखाली करण्यात आली. जर्मन अधिकाऱ्यांच्या आज्ञेप्रमाणे या ‘अराज’ स्पेशल कमांडो तुकडीने रिगामधील ज्यू सिनेगॉगमध्ये आश्रय घेतलेल्या २० ज्यूंना सिनेगॉगला बाहेरून आग लावून आणि खिडक्यांतून हँडबॉम्ब टाकून जिवंत जाळले. इतर ज्यूंप्रमाणे हे ज्यू तोपर्यंत रिगातून पळ काढू शकले नव्हते.
या सुरुवातीनंतर गरजेप्रमाणे ५०० ते १५०० लोकांच्या मदतीने स्पेशल अराज कमांडो या तुकडीने आधी लॅटव्हिया आणि नंतर दक्षिणेकडील बेलारूस देशात शोधून शोधून २६ हजार लोकांची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. अराज कमांडो स्त्रियांशी अत्यंत वाईट रितीने वागण्यासाठी बदनाम झालेली होती. स्वत: अराज याने अनेक अत्याचार केले होते. अश्याच अत्याचार झालेल्या ज्यू तरुणींपैकी एक झेल्मा हिने पुढे युद्ध गुन्हेगारांविरुद्ध खटले भरले गेले तेव्हा अराजविरुद्ध साक्ष दिली, जी त्याला अडकवण्यासाठी महत्त्वाची ठरली.
१९४५ मध्ये सर्व आघाड्यांवर जर्मनीचा पराभव होऊ लागला. लॅटव्हियात ब्रिटिश सैन्याने जर्मनीला सामील सैनिकांना युद्धकैदी बनवून जर्मनीतील आपल्या कॅम्पमध्ये ठेवले होते. काहींच्या मते काही वर्षे गेल्यावर युद्धकैदी व्हिक्टर अराज ब्रिटिश फौजेसाठी ड्रायव्हरचे काम करू लागला होता, तर काहींच्या मते त्याच्यावर खटला भरण्यासाठी पुरेसा पुरावा सापडत नसल्याने त्याला सोडण्यात आले आणि नावात व्हिक्टर झीबोट्स असा बदल करून तो जर्मनीतील फ्रॅन्कफर्ट येथील छापखान्यात सहाय्यकाची नोकरी करत होता. पण, अखेरीस १९७९ साली पुराव्यांची जुळणी होऊन त्याला रिगा येथील कत्तलीत १३००० लोकांच्या हत्येसाठी दोषी ठरवण्यात आले आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. शेवटी जर्मनीतील कासेल तुरुंगात एकांतवासाची शिक्षा भोगत असताना १९८८ साली वयाच्या ७८ व्या वर्षी त्याचे निधन झाले.
श्रीराम बापट
संपर्क : ९८१९९७८१३९
Read About : Michel Peiry : सीरियल किलर – मिशेल पेरी
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.