Ad Advertisement Ad Advertisement

Maharashtra Board 10th 12th exam registration दहावी-बारावीच्या अर्जासाठी ३० ऑक्टोबरची डेडलाइन

उशीर केल्यास बसणार खिशाला कात्री

Maharashtra Board 10th 12th exam registration छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी ऑनलाइन आवेदनपत्रे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळाच्या बारावीच्या परीक्षेसाठी १ लाख २७ हजार १२१, तर दहावीच्या परीक्षेसाठी १ लाख २७ हजार ८०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत ३० ऑक्टोबरपर्यंत असल्याने विद्यार्थ्यांनी अंतिम दिवसाची वाट न पाहता अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन मंडळाचे विभागीय सचिव आर. बी. वाणी यांनी केले आहे.

यंदा परीक्षेच्या शेवटच्या दिवसापर्यंत अर्ज भरण्याची मुदत देण्यात आलेली नसल्याने विद्यार्थ्यांना निर्धारित वेळेत नोंदणी करणे आवश्यक आहे. मुदतीनंतर अर्ज भरल्यास विलंब शुल्काचा आर्थिक भार विद्यार्थ्यांवर पडू शकतो. त्यामुळे शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनीही प्रलंबित अर्जांचा आढावा घेऊन वेळेत प्रक्रिया पूर्ण करण्यावर भर देण्याची गरज आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, नियमित शुल्कासह आवेदनपत्रे भरण्याची मुदत १४ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. ३० ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.

त्यानंतर विलंब शुल्कासह अर्ज भरण्यासाठी १ ते १५ नोव्हेंबर हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या कालावधीत प्रति विद्यार्थी २५ रुपये विलंब शुल्क आकारले जाणार आहे. त्यानंतर १६ ते ३० नोव्हेंबरदरम्यान अतिविलंब शुल्कासह अर्ज स्वीकारले जाणार आहेत. या कालावधीत प्रति विद्यार्थी प्रतिदिन ५० रुपये अतिविलंब शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे अर्ज भरण्यास उशीर झाल्यास विद्यार्थ्यांना अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सहन करावा लागू शकतो.

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना शुल्कमाफी

राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी पात्र विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कातून सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील २६५ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. मंडळाने संबंधित विभागीय मंडळांना पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज परीक्षा शुल्क न आकारता स्वीकारण्याच्या सूचना दिल्या आहे. ही सवलत फेब्रुवारी-मार्च २०२७ च्या परीक्षांसाठी लागू करण्यात आली आहे.

मात्र, परीक्षा शुल्कमाफीचा लाभ आणि विलंब शुल्क किंवा अतिविलंब शुल्क यांची अंमलबजावणी याबाबत अद्याप स्पष्टता नाही. शुल्कमाफीचा निर्णय नियमित परीक्षा शुल्कापुरता मर्यादित राहिल्यास मुदतीनंतर अर्ज भरणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना अतिरिक्त शुल्क भरावे लागू शकते. दुष्काळग्रस्त भागातील अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असताना विलंब शुल्काचा अतिरिक्त भार पालकांवर पडण्याची शक्यता आहे. तसेच अर्ज भरण्याची प्रक्रिया शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्तरावर प्रलंबित राहिल्यास विद्यार्थ्यांनाही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारीपासून

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारी ते १६ मार्च २०२७ या कालावधीत होणार आहे. तर दहावीची लेखी परीक्षा १५ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२७ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत होतील. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या याच प्रकारच्या परीक्षा २८ जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत होणार आहेत.

Reab About: Karnika Movie 2027 – माँ करणी मातेची गाथा आता रुपेरी पडद्यावर

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.