19 Storey Building Ethiopia पोलाद, काँक्रिट नसतानाही उंच इमारती; इथिओपियातील प्राचीन वास्तुकलेचे गूढ उलगडले
आदिस अबाबा : Ancient Ethiopian Architecture आजच्या काळात गगनचुंबी इमारती उभारण्यासाठी पोलाद आणि पोलादाच्या जाळीने अधिक मजबूत केलेले काँक्रिटचा (रिइन्फोर्सड काँक्रिट) वापर होतो. मात्र, सुमारे २८०० वर्षांपूर्वी पूर्व आफ्रिकेतील इथिओपियात यापैकी कोणतेही आधुनिक तंत्रज्ञान नसतानाही बहुमजली इमारती उभारल्या जात असल्याचे जर्मन पुरातत्त्व संशोधकांच्या नव्या अभ्यासातून समोर आले आहे. हा अभ्यास हेरिटेज या नियतकालिकात प्रकाशित झाला आहे. संशोधकांनी उत्तर इथिओपियातील टिग्रे भागातील ‘ग्रॅट बिअल गिब्री’ या प्राचीन वास्तूचा पुन्हा अभ्यास केला. इ.स.पू. ८०० मध्ये बांधलेला हा राजवाडा प्राचीन येहा शहराच्या मध्यभागी होता. त्याचा विस्तार सुमारे १९६ बाय १९६ फूट असल्याचे मानले जाते. प्रवेशद्वारावरील एक खांब तब्बल ३३ फूट उंच होता. पायऱ्यांच्या अवशेषांसह विचार केला असता, ही वास्तू किमान तीन मजली असावी, असा अंदाज आहे.
लाकूड, दगडाच्या अनोख्या तंत्राने उभारल्या उंच वास्तू
या काळात पूर्व आफ्रिका आणि दक्षिण अरेबियात मोठ्या बहुमजली वास्तू अस्तित्वात असल्याचे प्राचीन लिखित नोंदी आणि चित्रांमधून संकेत मिळतात. काही पुराव्यांमध्ये २०व्या मजल्यांपर्यंतच्या इमारतींचे उल्लेख आहेत. संशोधकांच्या मते, बांधकामात दगड आणि लाकडाचा विशिष्ट पद्धतीने वापर केला जात होता. या तंत्रात दगडी भिंतींच्या आत लाकडी तुळया आडव्या बसवून त्या संरचनेला मजबुती दिली जात होती. हे तंत्र आजच्या काही ‘हायब्रिड टिंबर हायराईज’ बांधकामांशी आश्चर्यकारकपणे साम्य दाखवते.
‘३-डी’ मॉडेलने दिला धक्कादायक निष्कर्ष
संशोधकांनी भिंतीचे कोपरे, दरवाजे आणि इतर पुरावे वापरून ३-डी संगणकीय मॉडेल तयार केले. वास्तू किती मजल्यांपर्यंत सुरक्षितपणे उभी राहू शकते, हे तपासण्यात आले. एका परिस्थितीत १९ मजली इमारत उभी राहणे शक्य असल्याचे मॉडेलने दाखवले. मात्र, प्राचीन वास्तुविशारदांनी प्रत्यक्षात एवढ्या कमाल उंचीपर्यंत बांधकाम केले होते का, हे अद्याप निश्चित झालेले नाही. तरीही हा अभ्यास प्राचीन आफ्रिकी वास्तुकलेच्या प्रगत क्षमतेवर नवा प्रकाश टाकतो.
Read About : Pune First Marriage Mystery : कोर्टात सिद्ध न झालेल्या पहिल्या लग्नाचे गूढ!
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.