Ad Advertisement Ad Advertisement

Madagascar Albinism Attacks : मादागास्करमध्ये डोळ्यांसाठी ‘अल्बिनिझम’ असलेल्या १३ मुलांचे हत्यासत्र

अंधश्रद्धा आणि अवयवांच्या तस्करीच्या संशयामुळे अल्बिनिझम असलेल्या व्यक्तींमध्ये भीती; मानवाधिकार संघटनांकडून गंभीर चिंता

टोलिआरा : Madagascar Albinism Attacks मादागास्करमध्ये त्वचा, केस व डोळे जन्मापासून अंशत: किंवा पूर्णत: रंगहीन असणाऱ्या (अल्बिनिझम) व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अंधश्रद्धा, आर्थिक लालसा आणि मानवी अवयवांच्या तस्करीमुळे अशा व्यक्तींना लक्ष्य केले जात असल्याचे मानवाधिकार संघटनांचे म्हणणे आहे. अल्बिनोज मादागास्कर या संस्थेनुसार, यंदा आतापर्यंत अल्बिनिझम असलेल्या १३ जणांची हत्या झाली असून सर्वांचा शिरच्छेद करण्यात आला. यातील १० जण मुले होती; मृतांमध्ये ९ महिन्यांपासून १४ वर्षांपर्यंतच्या मुलांचा समावेश आहे.

मे महिन्यात टोलिआराच्या बाहेरील भागात निकोल सोआलाला यांच्या घरात तीन हल्लेखोर घुसले. पतीवर कुऱ्हाड आणि लाकडी दांड्याने हल्ला केल्यानंतर त्यांनी निकोलच्या १८ महिन्यांच्या मुलीला, लँड्रिशियाचे अपहरण केले. काही दिवसांनी तिचा शिरच्छेद केलेला मृतदेह एका कथित जादूटोणावाल्याच्या घरात सापडला. तिचे डोके दुसऱ्या ठिकाणी प्लास्टिकमध्ये गुंडाळलेल्या सुटकेसमध्ये आढळले.
लँड्रिशियाच्या हत्येप्रकरणी १८ जणांना अटक करण्यात आली असून त्यात दोन महिलांचा समावेश आहे. मानवाधिकार संघटनांच्या मते, गरिबी, अन्नटंचाई, राजकीय अस्थिरता आणि अंधश्रद्धा यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे.

अंधश्रद्धेमुळे मुलांना सर्वाधिक धोका

अल्बिनिझम ही अनुवंशिक स्थिती असून शरीरात मेलॅनिनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे त्वचा, केस, डोळे रंगहीन होतात. याशिवाय दृष्टीदोष आणि त्वचेच्या कर्करोगाचा धोका वाढतो. आफ्रिकेतील काही भागांत मात्र अल्बिनिझम असलेल्या व्यक्तींच्या शरीराच्या अवयवांमध्ये संपत्ती, सौभाग्य किंवा राजकीय यश मिळवून देण्याची शक्ती असल्याची अंधश्रद्धा आहे. मादागास्करमध्ये विशेषत: त्यांच्या डोळ्यांना मागणी असल्याचे सांगितले जाते.

हल्ल्यांचे जाळे आता देशभर

संयुक्त राष्ट्रांच्या तज्ज्ञांच्या मते, २०२० ते २०२२ दरम्यान अल्बिनिझम असलेल्या व्यक्तींवर २८ हून अधिक हल्ले नोंदवले गेले. हल्ल्यांमागे नातेवाईक, स्थानिक व्यक्ती, इतर भागांतून आलेले लोक आणि गुन्हेगारी टोळ्यांचा सहभाग असल्याचे अहवालात नमूद आहे. काही हल्ले खाणी आणि मौल्यवान रत्नांच्या क्षेत्रांजवळ घडल्याचेही संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Read About: AI Palm Reading Trend 2026- आता थेट एआय कडूनच भविष्य जाणून घेण्याची क्रेझ
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.