Ad Advertisement Ad Advertisement

China’s life stand-in economy – आई-वडिलांच्या काळजीसह दैनंदिन कामांचे आउटसोर्सिंग

चीनमध्ये ‘लाइफ स्टँड-इन्स’चा भन्नाट ट्रेंड

बीजिंग : China’s life stand-in economy – ऑफिसची धावपळ, कामाचा सततचा ताण आणि स्वतःसाठी वेळच न मिळणे… अशा परिस्थितीत चीनमधील तरुणांनी एक भन्नाट मार्ग शोधला आहे. आपली दैनंदिन कामे करण्यासाठी ते आता थेट दुसऱ्या व्यक्तींना पैसे देऊन कामावर ठेवत आहेत. एवढेच नाही, तर काही जण वृद्ध आई-वडिलांची भेट घेणे, त्यांच्यासोबत वेळ घालवणे आणि त्यांच्यासाठी स्वयंपाक करण्यासाठीही ‘लाइफ स्टँड-इन’ (Life Stand-in) म्हणजेच दुसऱ्या व्यक्तींची मदत घेत आहेत. चीनमध्ये या नव्या ट्रेंडला ‘स्टँड-इन इकॉनॉमी’ (Stand-in Economy) असे म्हटले जात आहे. २०२४ मध्ये या ट्रेंडची चर्चा सुरू झाली आणि आता त्याचा विस्तार वेगाने होत आहे.

तुमचे काम, दुसरी व्यक्ती करणार

घरातील साधी कामे असोत किंवा वेळखाऊ कामे, पैसे दिले की ती दुसरी व्यक्ती करून देणार. काही लोक लेगोचे (Lego) मोठे आणि अवघड सेट स्वतः जोडण्याऐवजी त्यासाठी तज्ज्ञांची मदत घेत आहेत. यासाठी साधारण २०० ते १,००० युआन आकारले जातात.
लोक लोकप्रिय रेस्टॉरंट्समध्ये रांगेत उभे राहण्यासाठीही इतरांना पैसे देत आहेत. काही जण तर रोजचे घरचे जेवण तयार करून घेण्यासाठी महिन्याला सुमारे २,५०० युआन खर्च करत आहेत.

आई-वडिलांसाठीही ‘स्टँड-इन’

या ट्रेंडचा सर्वात धक्कादायक आणि संवेदनशील भाग म्हणजे वृद्धांची काळजी घेण्यासाठीही अशा सेवा उपलब्ध झाल्या आहेत. काही तरुण स्वतः जाण्याऐवजी भाडोत्री व्यक्तींना वृद्ध पालकांकडे पाठवतात. या व्यक्ती वृद्धांना भेटतात, त्यांच्याशी गप्पा मारतात, स्वयंपाक करतात किंवा त्यांच्या वतीने रुग्णालयात जातात.
शेन्झेनमधील एका सेवा पुरवठादाराकडून वृद्ध व्यक्तीसोबत दोन तास गप्पा मारणे आणि स्वयंपाक करून देण्यासाठी ३०० युआन आकारले जातात.

वेळ वाचतोय की नाती दुरावतायत?

अर्थतज्ज्ञांच्या मते, पैसे देऊन वेळ वाचवणे आणि सोयीस्कर जीवन जगणे हा या ट्रेंडमागचा मुख्य उद्देश आहे. यातून रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होत आहेत. मात्र, यामुळे फसवणूक, गोपनीयतेचा भंग आणि विश्वासाचे प्रश्नही निर्माण होऊ शकतात, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. आयुष्यातील प्रत्येक वैयक्तिक काम जर पैसे देऊन दुसऱ्याकडून करून घेतले, तर माणसाकडे स्वतःचे वैयक्तिक आयुष्य आणि नाती म्हणून शेवटी उरेल तरी काय? चीनमधील या ‘लाइफ स्टँड-इन’ ट्रेंडने आधुनिक जीवनशैलीसमोर हाच मोठा प्रश्न उभा केला आहे.

Read About: Aging heart rejuvenation – युवा शरीरात वृद्धाचे हृदयही होते पुन्हा तरुण!
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.