Wuppertal Schwebebahn : कल्पना करा की एक ट्रेन रुळांवर धावत नाही, तर त्यांच्या खाली – एका नदीवर – लटकत आहे. जर्मनीतील वुपरटालमध्ये! हा रोजचा प्रवास आहे. आपण खाली पाहतोय आणि आपल्याला दिसतहेत डोंगर, दऱ्या, घरं, झाडं, नदी; अगदी स्वप्नात पहावं असं. शिवाय बऱ्याच लहान मुलांच्या हातात दिसतो आहे एक हत्ती.
खालून जमिनीवरून पाहिलं तर आपल्याला नदीपासून १२ मीटर वर, सरकणारी एक गोंडस निळी गाडी दिसेल, जी एकाच स्टील रेलला लटकते आहे. आत प्रवासी वर्तमानपत्र वाचताहेत, गप्पा मारताहेत, कामावर जात आहेत; सगळं कसं अगदी रोजच्याप्रमाणे चालू आहे. हे गेली १२५ वर्षांपासून दर ३ मिनिटांनी होतंय. याची सुरुवात १ मार्च १९०१ रोजी झाली होती, त्यामुळे २०२६ मध्ये ही १२५ वर्षांची झाली. १९९० चे दशक यासाठी महत्त्वाचे होते, जर्मनीच्या पुनर्मिलनानंतर त्याचे आधुनिकीकरण करण्यात आले. जर्मनीतील वुपरटालमध्ये ही ट्रेन आहे. ‘वुपरटाल श्वेबबान’ – शब्दश: ‘वुपरटाल सस्पेन्शन रेल्वे’ – जगातील सर्वांत जुनी, लटकत्या डब्यांची इलेक्ट्रिक उन्नत रेल्वे. जेव्हा आपण ती चालत असताना त्यात बसतो, तेव्हा खाली आपल्याला फक्त वुपरटाल दिसत नाही तर आपल्याला घरामागील अंगणं, अंगणातील झाडं, कारखान्याच्या खिडक्या, स्वयंपाकघर, चर्चचे छप्पर आणि आपल्या पायाच्या खाली नदी दिसते. ही ट्रेन जर्मनीतील सर्वांत जिव्हाळ्याचे सार्वजनिक परिवहन आहे.
१८८० च्या दशकात, वुपरटल शहर अस्तित्त्वात नव्हतं, त्याऐवजी तिथे होतं ‘वुपर रिव्हर व्हॅली’ हे एल्बरफेल्ड आणि बार्मेनसह अनेक लहान खेड्यांचं गाव. हे जर्मनीच्या भरभराटीच्या कापड उद्योगाचं केंद्र होतं. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात, लोकसंख्येत वाढ झाली आणि घोडे व डबे यांना वाहतूक हाताळणं कठीण होवू लागलं. इतर जर्मन शहरांनी ट्राम बांधल्या, पण इथे ते अशक्य होतं. दरी अरुंद व उंच टेकड्यांनी वेढलेली होती. अगदी नदीच्या काठापर्यंत कारखाने आणि घरं बांधली गेली होती. रस्ते किंवा रेल्वेचे रूळ बांधण्यासाठी जागाच नव्हती आणि जमिनीखाली खोदकाम करणं खडकाळ आणि पूर-प्रवण भागामुळे कठीण होतं. नदीवरची जागा ही एकच जागा उरली होती.
त्यावेळी ‘कार्ल युजेन लँगेन’ नावाच्या एका जर्मन उद्योगपती अभियंत्याला एक कल्पना सुचली. त्यांच्याकडे व्हील बोगीच्या मदतीने ओव्हरहेड स्टील ट्रॅकवर गाड्या टांगल्या जात असत. त्याने ती कल्पना बर्लिन, म्यूनिक आणि ब्रेस्लाऊ यांना दिली खरी, पण सगळ्यांनाच ती खूप धोकादायक वाटल्याने त्यांनी ती नाकारली. परंतु एल्बरफेल्ड, बार्मेन आणि वोहविंकेल – वुपरच्या बाजूने असलेली तीन शहरे – रहदारीचे वेगवेगळे उपाय शोधून अगदी निराश झाली होती; म्हणून त्यांनी ती स्वीकारली. ‘वुपर्टलर श्वेबेबान’ला मूळत: ‘सिंगल रेल हँगिंग रेल्वे, सिस्टम ऑफ युजेन लँगेन’ असं म्हटलं जात असे. ही जगातील सर्वांत जुनी इलेक्ट्रिक एलिव्हेटेड रेल्वे आहे, ज्यात ‘हँगिंग कार’ आहेत.
१८९४ मध्ये याचं बांधकाम मंजूर झालं. इमारत १८९८ मध्ये सुरू झाली आणि १ मार्च १९०१ रोजी पहिला विभाग लोकांसाठी उघडला, जेव्हा स्टील अद्याप नवीन होतं. लँगेन स्वत: हे यश पाहण्यासाठी जगला नाही, परंतु त्याने त्याचं नाव ठेवलं होतं – श्वेबेबान, निलंबित रेल्वे! २४ ऑक्टोबर, १९०० रोजी राजघराण्यातील कैसर विल्हेम दुसरा आणि त्याच्या पत्नीने कैसरवॅगन म्हणून या १३.३ किलोमीटरची चाचणी राइड घेतली. (ओबरबार्मेन आणि सोनबोर्नर स्ट्रेसदरम्यान वुपर नदीच्या वर सुमारे १२ मीटर उंचीवर आणि सोनबोर्नर स्ट्रेस आणि वोहविंकेलदरम्यान व्हॅली रोडच्या सुमारे ८ मीटर वर. एका ठिकाणी तर रेल्वे ए ४६ मोटर वे ओलांडते.) सुमारे ३० मिनिटांच्या या प्रवासात पश्चिमेकडील वोहविंकेल ते पूर्वेकडील ओबरबार्मेनपर्यंत २० स्थानके आहेत. यात ट्रेनची चाकं वरच्या बाजूला असलेल्या पोलादी रूळांच्या आतून चालतात आणि ट्रेन खाली गोंडोलासारखी लटकलेली असते. दरवर्षी २५ दशलक्ष व रोज सुमारे ८०,००० प्रवासी प्रवासासाठी ही ट्रेन वापरतात. २०१६ पासून एक नवीन बनवलेली रेल्वेगाडी तिच्या निळ्या, वातानुकूलित व मोठ्ठ्या खिडक्यांसह सेवेत आहे.
एका सर्कशीच्या मालकाने १९५० मध्ये जाहिरातीसाठी म्हणून टफी नावाच्या एका लहान हत्तीणीला या ट्रेनमधे बसवलं. परंतु, ट्रेन हलू लागल्यावर हत्तीण घाबरली व बाजूची खिडकी तोडून तिनं खाली वूपर नदीत उडी मारली. मात्र, खालच्या चिखलात पडल्यानं ती वाचली. नंतर इथल्या लोकांनी टफीची पुस्तकं, मग्ज व खेळणी अशा वस्तू विकायला सुरूवात केली. टफीचा एक पुतळाही उभारला. टफी १९८९ पर्यंत जगली. आता टफीचं नाव वुपरटेलला कायमचं जोडलं गेलेलं आहे. श्वेबेबान दुसऱ्या महायुद्धातूनही वाचली, पण बॉम्बवर्षावामुळे बरचसं वुपरटल उद्ध्वस्त झालं होतं व रेल्वेच्या पोलादी चौकटीचं नुकसान झालं होतं. १९४६ मध्ये श्वेबेबान परत धावू लागली. पण, जुन्या आधार संरचनांचे नूतनीकरण करण्यासाठी १५ डिसेंबर २००९ रोजी श्वेबेबानने सुरक्षिततेच्या कारणांमुळे आपलं कामकाज स्थगित केलं. ही प्रक्रिया १९ एप्रिल २०१० रोजी पूर्ण झाली. नोव्हेंबर २०१८ मध्ये एक बस बार तुटून जमिनीवर पडली, पण कोणीही जखमी झालं नाही. या अपघातानंतर श्वेबेबान जवळपास नऊ महिन्यांसाठी बंद करण्यात आलं होतं; ते १ ऑगस्ट २०१९ रोजी पुन्हा सुरू झालं.
२०२६ मध्ये ही सेवा १२५ वर्षांची होईल, पण १९९० चे दशक याच्या विकासासाठी महत्त्वाचं होतं, जर्मनीच्या एकत्रिकरणामुळे त्या सेवेचं आधुनिकीकरण करण्यात आलं. एखाद्या पुलाने वा त्यामुळे चालू असलेल्या सोयीने किती मजबूत असावं याचं हे खास उदाहरण आहे.
मंगल गोगटे
mangalgogte@gmail.com
Read About : Why Naval Ships Are Grey : सैन्यांच्या जहाजांसाठी राखाडी रंग महत्वाचा
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.