आंतरराष्ट्रीय बैठकीत प्रस्तावावर चर्चा; डिजिटल यंत्रणांमधील संभाव्य बिघाड टाळण्यासाठी UTC आणि पृथ्वीच्या फिरण्याच्या वेळेतील फरकाची मर्यादा वाढवण्याची योजना
लॉस एंजेलिस : Leap Second Abolition आपण दर चार वर्षांनी फेब्रुवारी महिन्यात एक दिवस वाढवून ‘लीप वर्ष’ साजरे करतो, हे सर्वांनाच ठाऊक आहे. पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ आणि कॅलेंडरचा ताळमेळ बसवण्यासाठी हे केले जाते. परंतु, अगदी याच धर्तीवर वेळ अचूक ठेवण्यासाठी वापरला जाणारा ‘लीप सेकंद’ आता लवकरच इतिहासजमा होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर २०२६ मध्ये आंतरराष्ट्रीय कालमापन संस्था याबाबत अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेणार आहे.
शेकडो वर्षांपासून पृथ्वीच्या एका संपूर्ण फेरीला ‘एक दिवस’ मानले जाते. परंतु, चंद्र-सूर्याचे गुरुत्वाकर्षण आणि समुद्राच्या लाटांमुळे पृथ्वीचा स्वत:भोवती फिरण्याचा वेग नेहमी स्थिर राहत नाही. १९६७ मध्ये शास्त्रज्ञांनी ‘सिझियम-१३३’ अणूच्या लहरींवर आधारित यूटीसी (कोआॉर्डिनेटेड युनिव्हर्सल टाइम) हे अत्यंत अचूक अणू घड्याळ विकसित केले. अणू घड्याळाची वेळ आणि पृथ्वीच्या प्रत्यक्षातील फिरण्यावर आधारित वेळ यांमध्ये दरवर्षी काही मिलिसेकंदांचा फरक पडतो. हा ताळमेळ राखण्यासाठी १९७२ पासून आजपर्यंत २७ वेळा घड्याळात अतिरिक्त १ सेकंद म्हणजेच ‘लीप सेकंद’ जोडण्यात आला आहे.
‘ऋणात्मक लीप सेकंद’ची भीती : २०१५ पासून पृथ्वीचा वेग वाढला आहे. २९ जून २०२२ हा आधुनिक काळातील सर्वांत लहान दिवस नोंदवला गेला. पृथ्वीचा वेग असाच वाढत राहिला, तर ‘ऋणात्मक लीप सेकंद’ लागू करावा लागेल.
तंत्रज्ञान क्षेत्राला का नकोय ‘लीप सेकंद’? : आजच्या डिजिटल युगात ‘लीप सेकंद’ जोडणे मोठी डोकेदुखी ठरत आहे. बहुतेक संगणक प्रणाली आणि ऑपरेटिंग यंत्रणा दिवस हा ८६,४०० सेकंदांचाच असतो असे गृहीत धरून चालतात. अचानक १ सेकंद वाढवल्यामुळे यंत्रणा क्रॅश होतात. २०१२ मध्ये लीप सेकंद जोडल्यामुळे ‘रेडीट’सह अनेक संकेतस्थळांची सेवा विस्कळीत झाली होती.
सर्वसामान्यांवर काय परिणाम? : मोबाइल, लॅपटॉप किंवा मनगटी घड्याळात सेकंद दिसत नसल्यामुळे नागरिकांच्या जीवनावर परिणाम होणार नाही. मात्र, खगोलशास्त्रज्ञ, अंतराळ संशोधक, जहाजांच्या दर्यावर्दींना आकाशातील तारे व ग्रहांच्या स्थानावरून दिशा ठरवताना या वेळेतील फरकाचे गणित स्वतंत्रपणे मांडावे लागेल.
आता होणार मोठा निर्णय
जनरल कॉन्फरन्स ऑन वेट्स ॲण्ड मेजर्स’ची बैठक १३ ते १५ ऑक्टोबर २०२६ दरम्यान होत आहे. या बैठकीत एक नवीन प्रस्ताव मंजूर केला जाण्याची शक्यता आहे:
- या प्रस्तावानुसार, २० मे २०२७ पासून घड्याळात मधूनच अतिरिक्त सेकंद जोडण्याची पद्धत कायमची बंद केली जाईल.
- अणू घड्याळ (यूटीसी) आणि पृथ्वीची प्रत्यक्ष वेळ (यूटी१) यांमधील फरक १ तासापर्यंत (३,६०० सेकंद) वाढू दिला जाईल.
Read About: Senses AI Attendance System – विद्यार्थ्यांची हजेरी अवघ्या 1 सेकंदात!
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.