Ad Advertisement Ad Advertisement

Nashik Kumbh Mela 2026 – सिंहस्थाचे मंगलपर्व आजपासून

नाशिकमध्ये राष्ट्रपती मुर्मू, तर त्र्यंबकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण

Nashik Kumbh Mela 2026 : नाशिक : नाशिक व त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा धर्मध्वजारोहण सोहळा शनिवार, ३१ रोजी दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी पार पडणार आहे. रवी आणि गुरू सिंह राशीत प्रवेश करताच तब्बल २१ महिने चालणाऱ्या या कुंभपर्वाचा महाप्रारंभ होईल. नाशिकमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते, तर त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.

नाशिक येथील पूजनात इंद्रार्व देवता, दशदिक्पाल व ध्वजांच्या उपांग देवतांचे पूजन होईल. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, रामानंदाचार्य नरेंद्रगिरी महाराज यांच्यासह दिगंबर, निर्मोही व निर्वाणी या तिन्ही आखाड्यांचे प्रमुख उपस्थित राहतील. या वेळी उपस्थित सर्व नेते व साधू-महंत राष्ट्रहिताचा संकल्प करतील.

याचप्रमाणे, याचवेळी त्र्यंबकनगरीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते तीर्थराज कुशावर्तावर धर्मध्वजारोहण होणार असून, या ऐतिहासिक सोहळ्याला शैव पंथाच्या दहा आखाड्यांचे प्रमुख उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी ३ वाजता राष्ट्रपती मुर्मू या कुशावर्त तीर्थाला भेट देऊन त्र्यंबकराजाचे दर्शन आणि पूजाविधी करणार आहेत.

धर्मध्वजाचे वैशिष्ट्य
  • नाशिकचा मुख्य धर्मध्वज : हा ध्वज १५ फूट लांब आणि ५ फूट रुंद असून, तो वर्षभर फडकत राहील. भगव्या रंगाच्या या एम्ब्रॉयडरी केलेल्या ध्वजावर शौर्य व देवगुरुंचे वाहन असलेला सिंह, अमृतकुंभ आणि गोदावरीचे प्रतीक असलेल्या कुंभाचे चित्र रेखाटले आहे.
  • पुरोहित संघाचा धर्मध्वज : हा ध्वज साडेसात बाय अडीच फुटांचा आहे. यावर गंगा-गोदावरीचे वाहन असलेली मगर आणि ‘श्रीराम’ हा शब्द कोरलेला आहे.

त्र्यंबकेश्वरचा धर्मध्वज : हा ध्वज ६ बाय ३ फुटांचा आहे.
या ध्वजावर १२ घंट्या, सूर्य, चंद्र आणि मगरीचे चित्र आहे.

गंगा-गोदावरी मंदिर उघडणार
  • दर १२ वर्षांनी कुंभमेळ्यात उघडणारे रामकुंडावरील गंगा-गोदावरी मंदिर शनिवारपासून २१ महिन्यांसाठी खुले होणार, ते पुन्हा जुलै २०२८ मध्ये बंद होईल.
    रामकुंड परिसर झळाळला
  • सोहळ्यनिमित्त रामकुंड, गांधी तलाव आणि परिसरातील मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. पात्रातील रंगीबेरंगी दिव्यांचे प्रतिबिंब भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.
‘जय सियाराम’च्या जयघोषात धर्मध्वजाची नगरपरिक्रमा

दरम्यान, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाच्या पूर्वसंध्येला (दि. ३०) ‘जय सियाराम’च्या जयघोषात तपोवनातून धर्मध्वजाची भव्य नगरपरिक्रमा काढण्यात आली. या शोभायात्रेत साधू-संत, महंतांसह सुमारे ४० हजार भाविक सहभागी झाले. चार तास चाललेली शोभायात्रा रामकुंड येथे विसर्जित झाली. भगवे ध्वज, आकर्षक चित्ररथ आणि ढोल-ताशांच्या गजराने शहर भगवेमय झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी यांच्या वेशभूषांनी लक्ष वेधले. आदिवासी बांधवांनी पारंपरिक नृत्य, वेशभूषा आणि पर्यावरण संवर्धनाच्या संदेशातून सांस्कृतिक वैविध्याचे दर्शन घडविले.

Read About : Nashik Conch Shell Blowing World Record – कुंभनगरीत सिंहस्थाचा विश्वविक्रमी शंखनाद!
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.