Ad Advertisement Ad Advertisement

Groundwater Level Decline – पावसाळ्यानंतरही भूजल पातळीत मोठी घट; जिल्ह्यात सरासरी 5.40 मीटरने पाणी खोल

पैठणमध्ये सर्वाधिक ७.१५ मीटरची घसरण; कमी पावसामुळे आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता

छत्रपती संभाजीनगर : groundwater level decline- यंदाच्या पावसाळ्यानंतरही जिल्ह्यातील भूजल पातळीत अपेक्षित वाढ झालेली नसून उलट मोठी घट नोंदविण्यात आली आहे. सप्टेंबर २०२६ मधील भूजल पातळीची मागील पाच वर्षांच्या सरासरीशी तुलना केली असता जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये सरासरी ५.४० मीटरने पाणीपातळी खोल गेल्याचे समोर आले आहे. पैठण तालुक्यात सर्वाधिक ७.१५ मीटर, तर सोयगावमध्ये तुलनेने कमी घट नोंदविण्यात आली आहे. भूजल पातळीतील या घसरणीमुळे आगामी उन्हाळ्यात ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील १४१ निरीक्षण विहिरींच्या माध्यमातून दर चार महिन्यांनी भूजल पातळीची नोंद घेतली जाते. या नोंदींच्या आधारे भूजल साठ्याची स्थिती आणि संभाव्य पाणीटंचाईचा अंदाज बांधला जातो. यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात ४५३.८० मिलिमीटर पाऊस झाला. अपेक्षित पावसाच्या तुलनेत हे प्रमाण ७७ टक्के असून सुमारे २२ टक्के पावसाची तूट नोंदविण्यात आली आहे.

कमी पावसामुळे जमिनीवरील जलसाठ्यांमध्ये अपेक्षित वाढ झालेली नाही. दुसरीकडे पिण्याचे पाणी, शेती आणि विविध कामांसाठी भूगर्भातील पाण्याचा उपसा सुरूच असल्याने भूजल पातळीवर परिणाम झाला आहे. मागील पाच वर्षांतील जिल्ह्याची सरासरी भूजल पातळी ४.४८ मीटर होती. सप्टेंबर २०२६ मध्ये ती ९.८७ मीटरपर्यंत खोल गेली आहे. त्यामुळे पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत यंदा भूजल पातळीत ५.४० मीटरची घट झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते.

तालुकानिहाय स्थिती पाहता पैठणमध्ये भूजल पातळीची सर्वाधिक घसरण झाली आहे. त्यापाठोपाठ कन्नडमध्ये ६.१८ मीटर, खुलताबादमध्ये ६.०२ मीटर, सिल्लोडमध्ये ५.६२ मीटर, गंगापूरमध्ये ४.५० मीटर, फुलंब्रीमध्ये ४.५६ मीटर आणि छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ४.०५ मीटरने पाणीपातळी खोल गेली आहे.

पाणी बचतीच्या उपाययोजनांची गरज

दरम्यान, ग्रामीण भागात यापूर्वीपासूनच काही ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. विहिरी आणि बोअरवेलच्या पाणीपातळीत घट होत असल्याने उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. आगामी उन्हाळ्यापूर्वी भूजल पुनर्भरण, जलसंधारण आणि पाणी बचतीच्या उपाययोजनांना गती देण्याची गरज व्यक्त होत आहे.

पाणीटंचाई निवारणासाठी आराखडा तयार

जून ते सप्टेंबर हा पावसाळ्याचा कालावधी गृहीत धरून या काळातील पर्जन्यमान आणि भूजल पातळीचा तुलनात्मक अभ्यास केला जातो. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये बुडक्या घेणे, विहिरी खोल करणे, विहिरींमधील गाळ काढणे, खासगी विहिरींचे अधिग्रहण करणे आणि आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे अशा उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे. भूजल पातळीत सर्वाधिक घट झालेल्या तालुक्यांमध्ये जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे.

तालुकानिहाय भूजल पातळीतील घट (मीटरमध्ये)


तालुका घट
पैठण -७.१५
कन्नड – ६.१८
खुलताबाद – ६.०२
वैजापूर – ५.९४
सिल्लोड – ५.६२
फुलंब्री – ४.५६
गंगापूर – ४.५०
सोयगाव – ४.५७
छत्रपती संभाजीनगर – ४.०५
जिल्ह्याची सरासरी -५.४०

PDF : संभाव्य टंचाई अहवाल_GSDA_सन २०२६-२७

Read About : Asian Games 2026 : ट्रीसा-गायत्रीचा वर्ल्ड नंबर-3 जोडीला धक्का
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.